'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 2 च्या प्रियदर्श तुरेच्या काठकुम्भ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी वाचनालय सुरु


प्रियदर्श तुरे
निर्माण 2 चा प्रियदर्श तुरे गेले दोन वर्ष मेळघाटमध्ये काठकुम्भ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. आपल्या केंद्राचा दर्जा सर्वतोपरी सुधारावा म्हणून मागच्या दोन वर्षात त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे प्रयोग केले. याचाच एक भाग म्हणून 25 फेब्रूवारीला त्याने निर्माण 4 च्या शरद अष्टेकरच्या मदतीने पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. याला केंद्रातील कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, आणि गावातील इतर नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला. त्याचवेळी आपल्या केंद्राजवळ एक कायमस्वरुपी वाचनालय असावे असे त्याच्या मनात आले. एका महिन्याच्या आत ‘संत गाडगेबाबा वाचनालय’ उभे राहिले असून त्याच्यात अधिकाधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने तो झटत आहे. वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढावी म्हणून त्याने सर्व निर्माणींना विविध प्रकारच्या पुस्तकांच्या प्रती किंवा जुन्या मासिकांचे अंक पाठवावेत असे आवाहन केले आहे. प्रियदर्श आणि त्याचे सहकारी सध्या रीडींग रुमसाठी ग्रामपंचायतीतर्फे एखादी खोली मिळवण्यासाठी धडपड करत आहेत, तसेच एखाद्या चांगल्या ग्रंथपालाच्याही ते शोधात आहेत. विविध स्पर्धापरिक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकही येथे उपलब्ध व्हावीत अशी प्रियदर्शची इच्छा आहे. प्रियदर्शच्या या ‘ग्रंथ’दौडेबद्द्ल त्याचे मनापासून अभिनंदन!! 

शरद अष्टेकरच्या सहाय्याने मांडलेले पुस्तक प्रदर्शन

No comments:

Post a Comment