'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या गौरी चौधरीचा पाठ-कंबरदुखीवरील प्री- पायलट उपक्रम पूर्ण


गौरी चौधरी
निर्माण 4 ची गौरी चौधरी शिक्षणाने फिजिओथेरपीस्ट असून गेले दहा महिन्यापासून सर्चमध्ये पाठ कंबरदुखीच्या अभ्यासात सहभागी आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात गडचिरोलीच्या गैरआदिवासी गावांमध्ये पाठ कंबरदुखीची समस्या मोठया प्रमाणावर आहे हे लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून गावपातळीवर पाठ कंबरदुखीसाठी औषध आणि व्यायाम यांच्या एकत्रित वापरावर संशोधन चालू आहे. गावातील लोक पाठदुखीवर इलाज म्हणून व्यायामाचा स्विकार करतात का हे तपासण्यासाठी गौरी आणि तिची सहकारी सिंधू गेला एक महिना सर्चपासून 1 किमी अंतरावर असणार्‍या ‘सावरगाव’ या गैरआदिवासी गावात  प्री पायलट उपक्रम राबवत होते. हा उपक्रम महिन्याअखेरी संपला असून त्यातून लोक व्यायाम नियमित करतात का, भविष्यात करू शकतील का, कुठल्या प्रकारचे व्यायाम करणे त्यांना सोपे जाते, ते लक्षात राहतात का किंवा व्यायामाचे काही दुष्परिणाम होतात का यासंबंधीची अनेक निरिक्षणे पुढे आली आहेत. या अभ्यासादरम्यान आरोग्य शिक्षण आणि व्यायामाचे महत्त्व पटवण्यासाठी तिने विविध खेळ, चित्रं आणि गोष्टींचा उपयोग केला. चर्चेदरम्यान वापरण्यात आलेले हे साहित्य योग्य आहे का याविषयीही महत्त्वाचे मुद्दे बाहेर आले आहेत. जूनपासून या अभ्यासाचा पायलट उपक्रम सुरु होणार असून या निरिक्षणांचा टीमला पुढील आयोजनात नक्कीच फायदा होईल. पाठ- कंबरदुखीचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, आणि तो टाळण्यासाठी मानसिक स्वास्थ कसे सांभाळावे याविषयीच्या सत्रांमध्ये वेंकीचाही सहभाग होता. पुढील संशोधनासाठी या संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा!

No comments:

Post a comment