'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या वृंदन बावनकरचा महाराष्ट्रातील प्रायोगिक शिक्षण संस्थांचा अभ्यासदौरा

निर्माण 4 ची वृंदन बावनकर गेली दोन वर्ष भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात आपल्या स्वत:च्या शाळेत शिकवत आहे. ही शाळा पूर्णत: खाजगी असून नर्सरी ते नववीपर्यंत एकूण 350 विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत. शिकवण्याबरोबरच ती या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनही सांभाळते. या शाळेत ‘नई तालीम’ पध्दतीचा अभ्यासक्रम कसा आखता येईल यासाठी गेले एक वर्ष ती प्रयत्नशील आहे. याचे पहिले पाऊल म्हणून महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग करणार्‍या शाळा जवळून अभ्यासण्यासाठी तिने नुकतीच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईतील काही निवडक शाळांना भेटी दिल्या. यात प्रामुख्याने नाशिक मधील अरुण ठाकुरांची ‘आनंद निकेतन’ आणि ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’, मुंबईतील ‘प्रथम’, पुण्यातील ‘अक्षर नंदन’, ‘आयुका’ आणि गुणवत्ता’, पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’ आणि कोल्हापूर येथील ‘सृजन आनंद’ या शाळांचा समावेश होता. या  भेटीदरम्यान प्रायोगिक शिक्षणाची संकल्पना, त्याची उद्दिष्टे, पध्दती, येणार्‍या अडचणी या सर्व बाबींची त्या त्या व्यक्तीबरोबर सविस्तर चर्चा करण्याची संधी वृंदनला मिळाली. या भेटीचे फलित म्हणजे प्रथम संस्थेने ‘रीड इंडिया’ या उपक्रम पवनीला घ्यायचे कबूल केले आहे. तसेच या सर्व शाळांनी शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी तयार केलेले शैक्षणिक साहित्यही पवनीच्या शाळेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आले. जूनमध्ये पवनीच्या शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण सुरु होणार असून त्यानंतर अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरु होईल. या संपूर्ण दौर्‍यादरम्यान निर्माणच्या त्या त्या विभागातील मुलांची वृंदनला खूप मदत झाली. त्यामुळे या भेटी तिच्यासाठी आनंददायी अनुभव ठरला. या प्रयत्नासाठी वृंदनचे निर्माण परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a Comment