'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

रंजन पांढरे, मुक्ता नावरेकर आणि संतोष गवळे यांचे दिल्लीमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या परिषदेत सादरीकरण

रंजन, संतोष व मुक्ता
रंजन, मुक्ता आणि संतोष यांनी नुकताच गांधी स्मृती आणि दर्शन समिती- दिल्ली यांनी आयोजित केलेल्या कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता याविषयावरील एका परिषदेमध्ये सहभाग घेतला. गांधीजींच्या ग्रामस्वच्छतेच्या संकल्पनेशी साधर्म्य साधणारी जीवनशैली विकसित करण्यासाठी कचर्‍याचे व्यवस्थापन कसे करावे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्यात, त्यातून रोजगाराची निर्मिती कशी करावी, गावपातळीवरील स्वच्छता उपक्रमांमध्ये युवक- युवतींचा सहभाग कसा वाढवावा यासारख्या विषयांवर परिषदेदरम्यान चर्चा करण्यात आली. याप्रसंगी रंजन, मुक्ता आणि संतोष या तिघांनीही या विषयावर आपल्या कामाच्या अनुभवावर आधारित काही सादरीकरण केले. निर्माण 2 चा संतोष गवळे यवतमाळ जिल्ह्यातील स्वत:च्या मन्याळी या गावात गेल्या 2 वर्षापासून गावपातळीवरील विकासाच्या कामात प्रामुख्याने पाणी व्यवस्थापनाच्या कामात सक्रिय आहे. निर्माण 4 चा रंजन पांढरे गेले एक वर्ष गडचिरोली जिल्ह्यातील धानोर्‍या तालुक्यात मलेरिया नियंत्रणासाठी ‘सांडपाण्याचा योग्य निचरा’ या विषयावर काम करत आहे. तर निर्माण 3 च्या मुक्ताला टाकाऊ कागदापासून उपयोगी वस्तूनिर्मितीत रस आहे. या परिषदेस पुण्याचे तज्ञ डॉ. मापुसकर, आणि नाशिकचे निर्मल ग्राम संस्थेचे श्रीकांत नावरेकर हे मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. संतोष, रंजन आणि मुक्ता या तिघांनाही भविष्यात याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला. मे महिन्यात याच कामाच्या संदर्भात या तिघांना प्रशिक्षणासाठी अहमदाबाद येथील Environment Sanitation Institute तेथे जाण्याची संधी मिळणार आहे. पुढील कामासाठी या तिघांनाही मन:पूर्वक शुभेच्छा!   

No comments:

Post a comment