'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माणच्या मुलांची शिक्षणादरम्यान कार्यानुभव घेण्यासाठी गडचिरोलीची निवड


निर्माण 4 च्या रंजन पांढरे आणि आसावरी पाटील यांनी नुकतीच सर्चमध्ये आपली पाच आठवडयांची इंटर्नशिप पूर्ण केली. रंजन नागपूरमध्ये सिव्हिल इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असून आसावरी मुंबईमध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. रंजनने केलेले काम आदिवासी आणि गैरआदिवासी गावांमधील बांधकामाच्या संदर्भातील असून नई तालीम पध्दतीने शिकण्याचा हा उत्तम प्रयत्न मानता येईल. 2003 साली आदिवासी भागातील कुपानेर या गावात अचानक मलेरियाचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. मातीच्या गोठ्यात साचणारे पाणी हे मच्छरांच्या पैदाशीचे एक कारण असू शकते या विचारातून नंदा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपानेरमध्ये सिमेंटचे गोठे बांधण्याचा एक पायलट उपक्रम राबवण्यात आला. परंतु ही योजना इतर गावांमध्ये सुरु करण्याच्या दृष्टीने याचा प्रभाव किती झाला यासंबंधी कोणतेही सर्वेक्षण 2003 नंतर झाले नाही. सिमेंटच्या गोठ्याबाबत गावकर्‍यांचा अनुभव कसा आहे, अडचणी काय आहेत, फायदा काय आहे, त्यांच्यानुसार मलेरियाच्या रुग्णांमध्ये फरक पडला आहे का याचे सर्वक्षण रंजनने केले. या अभ्यासातून पुढे आलेल्या निरिक्षणानुसार गावकर्‍यांच्यामते मलेरिया आणि गुरांना होणार्‍या रोगाचे; खुरीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गोमुत्राचा ते आता फवारणीसाठी वापर करत असल्यामुळे गोमुत्र साचून राहण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. रंजनने केलेल्या सर्व्हेवर अधिक काम केले जाऊन इतर गावांमध्ये असे गोठे बांधायचे का हा निर्णय घेतला जाईल.
सर्च काही निवडक गैरआदिवासी गावांमध्ये स्थानिक गावकर्‍यांना प्रशिक्षित करुन नालेस्वच्छतेचा उपक्रम लवकरच सुरु करणार आहे. हे सुरु करण्याच्या आधी नालेस्वच्छतेविषयीची लोकांची मतं, त्यामुळे होणारा फायदा यासंबंधीची प्राथमिक आकडेवारी गोळा करण्याच्या दृष्टीने रंजनने ‘आंबेशिवणी’ आणि ‘बोधली’ येथे सर्वक्षण केले. नाले स्वच्छ केल्यास मलेरिया आणि फायलेरियाच्या प्रमाणात घट होईल असे गावकर्‍यांचे मत बनले. या योजनेनुसार प्रत्येक गावात एक आरोग्यसेवक नेमला जाणार असून, त्याला प्रशिक्षण देणे व इतर खर्च सर्चतर्फे केला जाईल.
निर्माण 4 ची आसावरी ही सध्या मुंबई येथे व्यवस्थापनशास्त्राची विद्यार्थी असून तिच्या एक महिन्याच्या वास्तव्यात तिने सर्चमध्ये विविध उपक्रमांवर काम करण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार करण्याच्या कामात मदत केली. तसेच सर्चच्या आदिवासी विभागाअंतर्गत मच्छरदाण्यांसाठी लोकांकडून अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक वेबपेजही तयार केले.
निर्माण 1 च्या सचिन बारब्देचा भाऊ ‘आशिष बारब्दे’ही निर्माण परिवाराचा भाग बनला आहे. त्याने अकोल्याहून आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले असून तो गेली तीन महिने गडचिरोली जिल्ह्यातील ‘कुरखेडा’ तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात इंटर्नशिप करत होता. आता त्याने आपल्या इंटर्नशिप च्या पुढच्या काळासाठी धानोरा तालुक्यातील पेंढरीची निवड केली आहे. सचिनही गेले एक पेंढरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होता. कार्यानुभवासाठी गडचिरोलीची निवड केल्याबद्दल या तिघांचे मन:पूर्वक अभिनंदन!

No comments:

Post a comment