'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

डॉ. स्वप्नील गिरीवर पेशंटच्या नातेवाईकांना शिवीगाळ करण्याची खोटी केस दाखल


निर्माण 4 चा स्वप्नील गिरी हा एम.बी.बी.एस. डॉक्टर असून सध्या यवतमाळच्या रुरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. मागच्या महिन्यात एका सात महिन्यांच्या गर्भवती स्त्रीला पायावर सूज येते म्हणून, तिचा नवरा व ब.स.पा. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तपासणीसाठी दाखल केले.  मात्र त्यांनी आल्याआल्याच अरेरावी सुरु केली व तेथील सिस्टर्सशी हुज्जत घातली. गर्भवती महिलेला सलाईन लावावे असे तिच्या नवऱ्याचे मत होते. त्याकडे लक्ष न देता स्वप्नीलने त्या स्त्रीला तपासले असता असे लक्षात आले कि तिचे हिमोग्लोबीन अत्यंत कमी (३ ते ४ ह्या दरम्यान) असून अशा परिस्थितीत सलाईन लावल्यास तिच्या हृदयावर अतिरिक्त दाब येऊ शकतो. या कारणास्तव स्वप्नीलने सलाईन लावण्यास नकार दिला व याची खात्री करून घेण्यासाठी तिचे रक्ततपासणीचे कागदपत्र नातेवाईकांकडे मागितले. तेव्हा रिपोर्ट घरी राहिले व घर दूर आहे असे त्याला सांगण्यात आले. यावर तिच्या रक्ताची पूर्ण तपासणी करण्याचे स्वप्नीलने सुचवले. 

मात्र त्या दिवशी रविवार असल्याने रुरल हॉस्पिटल मधील टेक्निशियन रजेवर होते. म्हणून खाजगी दवाखान्यात तपासणी करून घेण्याचे स्वप्नीलने सुचवले. यावर त्याचे खाजगी डॉक्टर्स बरोबर लागेबांधे असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दुसरीकडे ती स्त्री गर्भवती असल्यामुळे तिच्या गर्भाशयाचे तोंड किती उघडले आहे ही तपासणी करण्याचा तेथील सिस्टर्सने प्रयत्न केला असता त्या स्त्रीने तपासणीस साफ नकार दिला. “माझा नवरा व नातेवाईक माझी फक्त तपासणी करून पुढे काहीही करत नाहीत. नांदेडला नेण्याचा सल्ला ह्याआधीच्या डॉक्टर्सने दिला तो देखील त्यांनी धुडकावून लावला. फक्त सलाईन लावतात. त्यामुळे मी तपासणी करू देणार नाही” असे तिने स्पष्टपणे सांगितले.   
     
शा दुहेरी कात्रीत अडकलेल्या स्वप्नीलने नातेवाईकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ‘सलाईन लावा’ हे त्यांचे मत कायम होते. स्वप्नीलने त्यांना लेखी लिहून द्या असे म्हणल्यास त्यासही ते तयार झाले नाहीत. अशातच त्यांनी हॉस्पिटलमध्ये शिवीगाळ सुरु केला व सोबत आलेल्या ब.स.पा. कार्यकर्त्याने स्वप्नीलला मारहाण करायला सुरुवात केली. यावर एकच गदारोळ माजला व सर्व हॉस्पिटलचा स्टाफ मदतीस धावून आला. मारणारे पळून गेले. याची एफ.आय.आर. स्वप्नीलने पोलीस मध्ये नोंदवली. मात्र दुसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांनी उलट डॉक्टर ने आम्हाला धक्के देऊन हाकलून काढले व इलाज केला नाही तसेच जातीवाचक शिवी दिली” अशी फिर्याद नोंदवली. सुदैवाने चौकशीअंती atrocity act  न लावता पोलिसांनी फक्त ‘शिवी दिली’ एवढीच तक्रार नोंदवली. त्याची केस आता कोर्टात उभी राहणार आहे. स्वप्नीलने आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलेले काम बघता उमरखेड येथील सर्व डॉक्टर्सने त्याला पाठिंबा म्हणून दवाखाने एक दिवस बंद ठेवले.   
स्वयंप्ररणेने ग्रामीण भागात काम करणार्‍या आपल्या डॉक्टर मित्रांना काय प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे हे याचे एक उदाहरण आहे.

मात्र स्वप्नीलने बोलताना याची अजून एक बाजू मांडली. लोकांना सरकारी यंत्रणेबद्दल, तेथील लोकांबद्दल पराकोटीचा अविश्वास वाटतो, त्यांना लुबाडले जाते असा ठाम समज त्यांच्या मनात घर करून आहे व यासाठी अनेक वर्ष निष्काळजीपणे काम करणारे सरकारी डॉक्टर्स व वैद्यकीय यंत्रणा जवाबदार आहे. स्वप्नीलच्या मते त्या नातेवाईकांचा राग त्याच्यावर नसून तो बसत असलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर होता. ह्यासाठी काय करता येईल हा विचार केला पाहिजे.
या प्रकरणातील गैरवर्तनाला आणि मनस्तापाला वैयक्तिक मानापमानाचा मुद्दा न बनवता तटस्थ दृष्टीने बघणार्‍या व आपले काम नेटाने पुढे नेणार्‍या स्वप्निलचे अभिनंदन!  


No comments:

Post a Comment