'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

लिहिते व्हा.....


निर्माणमधे विशिष्ठ समस्येवर प्रत्यक्ष काम करणार्‍या तरुणांची संख्या हळूहळू वाढत आहे. या कामादरम्यान किंवा कामाच्या निमित्ताने येणारे विविध अनुभव ते वेगवेगळ्या प्रकारे टिपून ठेवतात. पण ते निर्माण परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. अनेकदा ते अनौपचारिक गप्पांच्या स्वरुपात सिमीत राहतात. हे सर्व अनुभव सीमोल्लंघनची टीम दर महिन्याला ‘लिहिते व्हा’ या सदराअंतर्गत निर्माणच्या सर्व तरुणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या अंकात आपल्याला निर्माण 4 च्या रंजन पांढरेचे अनुभव वाचता येतील.

मूळचा नागपूरचा रंजन पांढरे हा सिव्हील इंजिनियरींगचा विद्यार्थी. आपल्या पुढील करियरसंबंधी थोडासा गोंधळलेला. निर्माणमध्ये समविचारी मित्रमैत्रिणींच्या सहवासात त्याला हळूहळू आपल्या भविष्याविषयी स्पष्टता येऊ लागते. शिबिरादरम्यान ग्रामीण आरोग्याचा प्रश्न जवळून पाहताना सिव्हील इंजिनियरींगच्या ज्ञानाचा उपयोग मलेरिया, फायलेरिया आणि डायरिया या रोगांवर उपाय शोधून काढण्यासाठी करायचा या निर्णयाप्रत तो अखेर येतो. एका सिव्हील इंजिनीयरची आरोग्याच्या समस्यांवर interdisciplinary पध्दतीने उत्तर शोधण्याची धडपड त्याच्याच शब्दात! 
     
सिव्हील इंजिनीयरींगच्या शिक्षणाला आता 3 वर्ष पूर्ण होत आली आहेत. गेल्या 3 वर्षात स्ट्रक्चर, सिमेंट, सर्व्हे, ट्रॅफीक इंजिनीयरींग याबाबत भरपूर वाचलं, ऐकलं, लिहिलं, परीक्षा दिल्या आणि सिमेंटच्या जंगलामध्ये आपली पण शक्ती आणि बुद्धी लावायची तयारी सुरू झाली. त्याच त्या पैसे शोधायच्या गोष्टी आणि प्लेसमेंटची चिंता, परिक्षा! आणि हे सगळं स्थापत्य अभियांत्रिकीचा कोणताही प्रत्यक्ष  अनुभव न घेता, आज पर्यंत कधीच field वर पाय न ठेवता! अशा परिस्थितीत अचानक आपले कार्यक्षेत्र निवडणं खरचं इतकं सोप आहे का? या विचारांचा मनात कोलाहल चालू असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आरोग्याच्या भीषण समस्येबद्दलचा अग्रलेख वाचला. ग्रामीण भागात काम करणा-या काही व्यक्तींची त्यात नावे होती, घरापासून; नागपूरहून जवळ गडचिरोलीच्या आरोग्य समस्यांबद्द्ल माहिती मिळाली, मनात तेव्हाच प्रश्न पडला, एका बाजुला लोक आरोग्याच्या तीव्र समस्येने ग्रासलेले आहेत तर दुस-या बाजुला शहरीकरण, चंगळवाद हे पण दिसतयं! तर मग आपण काय करावं, काय निवडावं? शहरातल्या सिमेंटच्या जंगलात आपली इमारत उभी करावी की नैसर्गिक जंगलात फोफावणा-या रोगांना आळा घालावा? आपल्या शिक्षणाचे खरे प्रयोजनशोधण्याची ती वेळ होती. त्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न होता की मी तर डॉक्टर नाही. मग मी आरोग्याच्या समस्या कसा सोडवणार? मला माझ्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सोडवायला करता येईल का? आणि कसा करता येईल? या प्रश्नांची उत्तरं शोधत मी पोचलो डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ या वैद्यकीय क्षेत्रातील एक नावाजलेल्या संशोधन संस्थेत! नायनांनी (डॉ. अभय बंग) मला ग्रामीण भागातील रोगांची आणि तिथल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती दिली. आरोग्याच्या समस्या सोडवायला डॉक्टर असणे गरजेचे नाही. आपण डॉक्टर नसूनही आरोग्याचे प्रश्न कसे सोडवु शकतो याचे उत्तर मी हळूहळू शोधत होतो. नायनांबरोबरच्या चर्चेत अतिदुर्गम भागात मलेरीया, फायलेरीया आणि डायरीयाचे प्रमाण खूप जास्त आहे हा मुद्दा पुढे आला. या तीन समस्या आणि आपले शिक्षण याचा ताळमेळ कुठे जुळतो आहे का याचा शोध घेणे सुरु झाले.

‘लॅन्सेट’ या जगप्रसिध्द जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरात मलेरीयामुळे एकूण 12 लाख लोकांचा मृत्यू होतो. तर जगभरात पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूला डायरिया हे प्रमूख कारण आहे.  मलेरिया स्वच्छ पाण्यामध्ये तयार होणा-या ऍनाफेलस  मच्छरांमुळे होतो, तलावं, शेततळे, वापरात नसलेल्या पाण्याच्या जागा ही मच्छरांच्या पैदाशीची प्रमुख ठिकाणे.  चौफेर भातशेती आणि घनदाट जंगल यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरिया समस्या भयानक! या भागात प्रत्येक 100 तापाच्या रुग्णांमागे 10–12 रुग्ण हे मलेरीयाचे असतात. फायलेरीया हा रोग सांडपाण्यामध्ये तयार होणा-या क्युलेक्स मच्छरांमुळॆ होतो, हे मच्छर मुख्यत: नाल्यांचे पाणी, सांडपाणी यामध्ये आढळतात. हायड्रोसील आणि हत्तीपाय या फायलेरीयाच्या प्रमुख समस्या या भागातील पुरुषांमध्ये आढळतात. डायरीया हा रोग अस्वच्छ पाण्य़ामध्ये तयार होणा-या जंतुंमुळे होतो. पिण्य़ाचे पाणी जर सांडपाणी किंवा इतर जंतुंच्या संपर्कात आले तर त्याचे जीवाणु पिण्य़ाच्या  पाण्यामध्ये मिसळून डायरीया होतो. 

या सर्व आजारांमागील मूळ कारणांचा विचार केल्यास घराच्या परिसरातील अस्वच्छता हे ठळक कारण दिसतं. आणि ही अस्वच्छता कुठेतरी योग्य बांधकामाचा अभाव किंवा सदोष बांधकामाशी संबंधित आहे. हळूह्ळू या समस्येच्या मूळापर्यंत जाण्याचा मार्ग मला माझ्या क्षेत्राशी; सिव्हिल इंजिनीयरींगशी निगडित आहे याची स्पष्टता येऊ लागली. माझा निर्णय ठाम झाला. आपल्या सिव्हिल इंजिनीयरींगच्या कौशल्यांचा वापर करुन मलेरीया, फायलेरीया, डायरीया या रोगांवर उत्तर शोधणे हेच आपले यापुढील कार्यक्षेत्र! पण मी आत्तापर्यंत शिकलेले ज्ञान या प्रश्नाच्या उकलासाठी पुरेसे नव्हते. आपल्याला जर मोठे परिवर्तन करायचे असेल तर आपल्याला संघटन, संशोधन या मार्गाने जायला हवे, ते शिकायला हवे, विषय समजून घ्यायला पाहिजे, ज्या लोकांनी त्या विषयात काम केले आहे त्यांना भेटून तो विषय समजून घ्यायला पाहिजे.  
असेच एक ठिकाण म्हणजे पर्यावर्णीय स्वच्छ्ता संस्था, अहमदाबाद- देशातली एक नामवंत संस्था. स्वच्छतेचे शिक्षण घेताना तिथे होम सॅनिटेशन शिकायला मिळाले. ग्रामीण भागातील घरांची व्यवस्था बघता तिथे मलेरीया, डायरीयापासून बचाव व्हावा म्हणुन घरातील व बाहेरील स्वच्छता कशा प्रकारे चांगली राखता येईल, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, स्वच्छ पाण्यासाठी प्रक्रियेसाठी स्वस्त पध्दती, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मच्छरदाण्य़ा व फवारणीची माहिती लोकांना देणे, लहान मुलांना आपला फोकस ग्रुप बनवून त्यांना रोगांचे प्रतिबंधात्मक शिक्षण देणे, हे सर्व कसे घडवून आणायचे हे   इथे शिकायला मिळाले. अशाच प्रकारची पण थोड्यावेगळ्या पद्धतीने काम करणारी संस्था म्हणजे निर्मल ग्राम निर्माण केंद्र,नाशिक. ही संस्था मुलत: स्वच्छ्ता, कच-याचे व्यवस्थापन, खत निर्मितीची प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर काम करते. कच-याचे अशा प्रकारचे व्यवस्थापन समजून घेताना ग्रामीण भागातील शौचालय, त्यांच्या वापराची समस्या हेही समजून घेतले. 

या संस्था भेटीदरम्यान स्वच्छ्ता’ हा विषय किती व्यापक आणि मोठा विषय असू शकतो हे समजले. आज स्वच्छ्तेला प्रतिष्ठा नाही. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी स्वच्छ्तेला आपल्या जीवन शैलीचा भाग म्हटले आहे, तरी स्वच्छ्ता दुय्यम का असावी? निर्मलग्राम योजनेसारख्या सर्वोत्तम योजना आपल्या देशात आमलात आणल्या जात असताना मलेरीया, डायरीयाचे प्रमाण कमी होत  नाही. सरकारने कोटयावधी रुपये खर्चुन बांधलेल्या संडासांच्या स्टोअर रुम्स होतात! आपली  कार्यपध्दती नक्कीच  कुठेतरी चुकत आहे.
माझ्या पुढच्या कामाची दिशा ही Technical इंजिनीयरींगला Social इंजिनीयरींगची जोड अशी असेल.  स्वच्छता हा कामाच्या दृष्टीने जितका व्यापक मुद्दा आहे तितकाच संशोधनाच्या द्रुष्टीने Rigorous आहे. यामध्ये काम करताना प्रचंड मेहनत आणि धैर्य लागणार आहे. जे मला ‘निर्माण’ सारख्या कार्यक्रमांमधून कायम मिळत राहील याची मला खात्री आहे. 

मंजिल तो मिल ही जाएगी चाहे भटकते भटकते
गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं

No comments:

Post a Comment