'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

निर्माणच्या चौथ्या बॅचच्या शेवटच्या शिबिराचे समापन


दीपप्रज्वलन करून निर्माण शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. राणी बंग (अम्मा)
निर्माणच्या चौथ्या बॅचचे शेवटचे शिबिर 30 जून ते 8 जुलै या कालावधीत शोधग्राममध्ये पार पडले. शिबिरात सातारा, सांगली, सोलापूर, यवतमाळ, जळगाव, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, पुणे, नाशिक, मुंबई, रत्नागिरी येथून आलेली सुमारे 70 मुले सहभागी झाली होती. समाजातल्या विविध समस्यांमागील आर्थिक, राजकीय व वैचारिक पार्श्वभूमी समजून घेणे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी काय योगदान देऊ शकतो या अनुषंगाने प्रत्येकाने स्वत:च्या पुढील दिशेविषयी विचार करून पाच वर्षांचा कृती कार्यक्रम आखणे ही या शिबिराची मध्यवर्ती कल्पना होती. यासाठी मार्गदर्शन करायला अनेक मान्यवरांना या दरम्यान आमंत्रित करण्यात आले होते. 

ग्रामीण गरिबी आणि त्याचा शेतीशी असणारा संबंध यावर वर्ध्याचे ‘श्री विजय जावंधिया’ यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधीनी 1909 साली लिहिलेल्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकाचे सद्यपरिस्थितीतील महत्त्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी ‘हिंदस्वराज्य आणि नवे मन्वंतर’ या पुस्तकाचे लेखक ‘सुरेश पांढरीपांडे’ यांनी दोन दिवस आपल्या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग़डचिरोलीतील ‘मेंढा लेखा’ या गावात ग्रामस्वराज्याची संकल्पना विविध प्रयोगांमधून प्रत्यक्षात आणणारे ‘देवाजी तोफा’ यांनी मुलांशी संवाद साधला. लोकसहभागातून ग्रामसभेच्या मदतीने ‘देवाजी तोफा’ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या प्रयोगांविषयी त्यांचे अनुभव ऐकणे हा विद्यार्थांसाठी विलक्षण अनुभव ठरला. तसेच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ‘अभिषेक कृष्णा’यांनीही शिबिरादरम्यान आमंत्रित केले होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात काम करताना प्रशासनासमोर येणारी आव्हानं या विषयावर ते मुलांशी बोलले. भांडवलशाही व्यवस्थेतला बाजार नेमका कसा काम करतो हे नंदा खरेंनी समजावून सांगितले तर अनिल अवचटांनी उपेक्षित वर्गातील लोकांसोबतच्या त्यांच्या अनुभवांचे निर्माणींसोबत शेअरिंग केले.  

निर्माणींना मार्गदर्शन करताना डॉ. अभय बंग (नायना) व सु. श्री. पांढरीपांडे
निर्माण 4 मधील प्रत्यक्ष कामात उतरलेल्या मुलांनी घेतलेली सत्रं हे शिबिराचे विशेष आकर्षण ठरले. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात गट्टा व पेंढरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या निर्माण 4 च्या डॉ. विक्रम सहाने आणि डॉ. शिवप्रसाद थोरवे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास ऐकणे हा सर्वांसाठी प्रेरणादायी अनुभव होता. या दोन डॉक्टरांबरोबरच नाशिक येथील ‘प्रगती अभियान’ या संस्थेबरोबर रोजगार हमी योजनेवर काम करणारा अजय होले, गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये सिव्हिल इंजिनीयरींगच्या अंगाने स्वच्छतेचे काम करणारा रंजन पांढरे, आरोग्य आणि टेलिकम्युनिकेशन यांची सांगड घालू पाहणारा निखिल जोशी, ग्रामीण भागात पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणारा शरद आष्टेकर, सांगलीतील खेड्यांमधल्या स्त्रियांसोबत सोशल आंत्रप्रुनरशिपचा प्रयोग करणारे संदीप ढोले व भाग्यश्री अग्निहोत्री, ‘प्रथम’ संस्थेबरोबर शिक्षणाबाबत काम करणार्‍या महेश लादे यांचीही सत्रे शिबिरादरम्यान आयोजित करण्यात आली होती. या सर्वांनी आत्तापर्यंत केलेले काम, यासंबंधीचे त्यांचे अनुभव आणि मुलांची प्रश्नउत्तरे यामुळे ही सत्रे खूप रंगली. 
     
पुढील दिशेबाबत स्पष्टता येण्यासाठी डॉ. अभय बंग, अमिताभ खरे व अमृत बंग यांनी विविध सत्रे घेतली आणि शेवटी प्रत्येक शिबिरार्थ्याने स्वत:चा पाच वर्षांचा कृती कार्यक्रम निश्चित केला. शिबिर संपण्याच्या आदल्या रात्री धमाल सांस्कृतिक कार्यक्रम झाला व शेवटच्या दिवशी सकाळी डॉ. राणी बंगांकडून आपापला “लर्निंग स्टोन” घेऊन सर्व शिबिरार्थी पुढील प्रवासाला निघाले!

No comments:

Post a comment