'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

मां दंतेश्वरी दवाखान्यातील काही विशिष्ट आजारांचा फॉलोअप (पाठपुरावा) वाढवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संशोधनाचा प्राथमिक टप्पा पूर्ण

शहरात आढळून येणार्‍या उच्च रक्तदाब, मधुमेह या रोगांचे रुग्ण सर्चमधील मां दंतेश्वरी दवाखान्यातही हळूहळू वाढत आहे. या सर्व आजारांना नियमित पाठपुराव्याची गरज असते. हे प्रमाण वाढावे म्हणून निर्माण 4च्या निखिल जोशी याने एक वर्षापूर्वी एक संशोधन हाती घेतले होते. या संशोधनाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला असून त्याचे निष्कर्ष नुकतेच समोर आले आहेत. या प्रयोगात ज्यांना वेळोवेळी पाठपुराव्याची गरज आहे असे उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक आजारांचे रुग्ण आणि गरोदर स्त्रिया यांचा समावेश करण्यात आला होता. अशा रुग्णांचे तीन गट करण्यात आले होते. पहिल्या गटातील रुग्णांना पाठपुराव्याची आठवण करून देण्यासाठी भेटीच्या ठरलेल्या दिवसाआधी ३ दिवस फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. दुसऱ्या गटातील रुग्णांच्या औषधांच्या चिठ्ठ्यांवर पुढील भेटीची तारीख असणारे शिक्के मारण्यात आले. तिसऱ्या गटातील रुग्णांसाठी कोणताही नवा उपाय करण्यात आला नाही. सहा महिने केल्या गेलेल्या पाहणीत असे आढळून आले की तिसऱ्या गटाच्या तुलनेत दुसऱ्या व पहिल्या गटातील रुग्णांमध्ये वक्तशीर पाठपुराव्याचे प्रमाण अनुक्रमे १०% व २०% नी अधिक आहे.  फोन कॉलचा परिणाम शिक्क्यापेक्षा अधिक असला तरी एका कॉलची किंमत शिक्क्याच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. तसेच खराब नेटवर्कमुळे पहिल्या गटातील केवळ ६०% रुग्णांशी संपर्क साधता आला आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक लोकांसाठी अधिक परिणाम देणारा उपाय म्हणून फोन कॉल व शिक्का यांचा एकत्र वापर असाही नवा पर्याय समोर आला आहे. या प्रयोगाचा पुढचा भाग म्हणून सर्चला हा प्रयोग आर्थिक दृष्ट्या परवडेल का याचा अभ्यास निखिल करेल.या प्रयोगात संशोधनाची बाजू प्रामुख्याने संशोधन विभागातील निखिल, अतुल, अश्विन यांनी सांभाळली. त्यांना दवाखान्यातील कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली.

No comments:

Post a Comment