'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

निर्माण अखंड शिक्षण प्रक्रियेची आणखी एक पायरी: ऑक्टोबर कार्यशाळा संपन्ननिर्माण ही शैक्षणिक प्रक्रिया फक्त शिबीरांच्या मालिकेपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जीवनभराचीच आहे. हे सूत्र ध्यानी घेऊन दि. 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक विषयांवर काम करत असणर्‍य़ा महाराष्ट्रातील 40 निर्माणींची कार्यशाळा सर्च इथे पार पडली. निर्माणींची आर्थिक, राजकीय व वैचारिक समज वाढावी, आर्थिक व राजकीय विचारांचा दैनंदिन जीवनाशी संबंध कळावा, विविध विषयांवर सद्य कार्यरत असलेल्या निर्माणींचा परस्पर संवाद व्हावा व झेप घेऊ पाहणार्‍या निर्माणची भविष्यातील दिशा काय असावी अशा मध्यवर्ती कल्पनांचा या कार्यशाळेत सामावेश होता.  

प्राध्यापक खांदिवाले सरांनी कार्यशाळेचा प्रारंभ भांडवलशाहीचे तत्वज्ञान, त्याची सद्य समाजजीवनातील भूमिका व विविध मर्यादा या विषयाने केला. त्यानंतर आपल्यापैकीच एक निर्माणी अमृता प्रधान हीने गांधीविचारांचे अर्थशास्त्रज्ञ कुमारप्पा लिखित Economy of Permanence या पुस्तकावर आधारित मांडणी केली. या सत्रानंतर अनेक निर्माणींनी हे पुस्तक विकत घेऊन वाचण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण कार्यशाळेमध्ये श्री. अशोक भार्गव यांची उपस्थिती होती. त्यांनी निर्माणींच्या दैनंदिन जीवनात आर्थिक नियोजन अणि बचत कसे असावे याचे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. हितेश भट्ट यांनी नवे काम सुरु करताना पैसा कसा उभा करावा यावर मार्गदर्शन केले. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर सुरु झालेल्या या कार्यशाळेत अर्थशास्त्राच्या विचार सुरू होऊन त्या दृष्टीने सीमोल्लंघनच घडले आहे.

श्री.विवेक सावंत यांनी त्यांचा MKCL चा व्यक्तिगत व संस्थेच्या पातळीवरचा प्रवास सांगितला. सरकारी, खाजगी व सामाजिक क्षेत्रांना एकत्र घेऊन काम कसे करावे यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. यानंतर खूप समृद्ध असे प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. विवेककाका व नायनांनी निर्माणींच्या जीवनात प्रत्यक्ष उभे असणार्‍या प्रश्नांना खूप सुंदर असे उत्तरे दिली.

रचनात्मक कामाबरोबरच संघर्षात्मक कामाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत झाला. अण्णा हजारेंचे ज्येष्ठ सहकारी श्री. विश्वंभर चौधरी यांनी त्यांचा लवासाविरोधी संघर्ष व आण्णा हजारेंची भ्रष्टाचार विरोधी अंदोलन यावर एक सत्र घेतले. नंतरच्या प्रश्नोत्तरांमधून निर्माणींनी सध्या सुरु असणार्‍या भ्रष्टाचार मुक्ती अंदोलनात आपण सहभाग घ्यावा अशी इच्छा प्रकट केली. विश्वंभर चौधरी यांनी निर्माणच्या गटाने अण्णांशी भेटून पुढील दिशा ठरवावी असे सुचवले.

डॉ. अभय बंग यांनी (नायनांनी) व्यक्तिगत जीवन हेच राजकीय जीवन कसे असू शकते यावर सत्र घेतले. आपल्या देशासमोरच्या समस्या पाहून बऱ्याचदा हतबल व्हायला होते.  अशावेळी व्यक्ति मधील शक्तीची जाणीव करून देणारे हे सत्र होते.

या कार्यशाळेतील शैक्षणिक प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्व निर्माणींचा व्यक्तिगत प्रवास व जडणघडण यांचे सादरीकरण. सहकाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपातील विविधता, व्यक्तिगत व सामाजिक पातळीवरील प्रगल्भता निर्माणींना अनुभवता आली.

भविष्यात निर्माणची दिशा काय असावी? या संदर्भात सर्व निर्माणी, नायना, विवेक काका व अशोक काका यांच्या उपस्थित चर्चा झाली. या चर्चेतून बर्‍याच निर्माणींनी विविध विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्याची जबाबदारी घेतली.
 


दुष्काळावर काम करण्यासाठी फेलोशिपची घोषणा:
श्री. विकेक सावंत यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाचा अभ्यास व त्यावरती उपाय शोधण्यासाठी फेलोशिप ची घोषणा केली. ही फेलोशिप दर वर्षी १७ जणांना देता येऊ शकते. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या फेलोशिपच्या माध्यमाने तेथील पाणी प्रश्नावर काम करावे असे अपेक्षित आहे. यासाठी लागणारे मार्गदर्शन व साधनांची व्यवस्था MKCL कडून होईल. लवकरच या फेलोशिप चे संपूर्ण स्वरुप सर्वांना कळवण्यात येईल.


अशोक भार्गव, नायना व विश्वंभर चौधरी यांच्यासोबत निर्माणचा गट

No comments:

Post a Comment