'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

रेखा देवकुळेच्या प्रयत्नांनी अनाथ चिमुकल्यांच्या जीवनात हसूसोलापूर जिल्ह्यातील बी बी दारफळ गावची रेखा देवकुळे (निर्माण ४) हिच्या प्रयत्नांतून तिच्याच वस्तीतल्या ४ चिमुकल्या अनाथ मुलांना हक्काचा निवारा मिळाला आहे. गोपाळ समाजातील या मुलांच्या आई-वडीलांचा मृत्यू काही महिन्यांपूर्वी दारूच्या व्यसनापायी झाला. खेळ करून उपजीविका करणाऱ्या या समाजात दारू पिण्याचे पुष्कळच प्रमाण आहे. ताप आला तरी देवाचे नाव घेऊन दारू पिण्याची रीत आहे. आईवडील जिवंत असताना खेळ करणे, लोकांकडून पैसे व जेवण मागून आणणे, त्याच पैशांची दारू आणून आई-वडीलांना देणे असे या मुलांचे जीवन होते. हळूहळू २ नंबरच्या मुलीलाही दारूची सवय लागण्यास सुरुवात झाली होती. पालकांना वारंवार सांगूनही त्यांनी रेखाकडे दुर्लक्ष केले. मात्र आईवडील गेल्यानंतर मुलांशी जवळीक साधण्यास रेखाने सुरुवात केली. त्यांना घरी बोलावणे, पाटी-पेन्सिल देऊन शिकवणे, जेवण देणे अशा कृतीतून तिने मुलांचा विश्वास संपादन केला. पुढे कुत्रा चावल्यानंतर छोट्या मुलाला जेव्हा जिल्हा रुग्णालयात नेण्याची वेळ आली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही मुलं जगात असण्याची कोणतीही नोंद सरकार दरबारी नाही. रेखाने त्यांचा जन्मदाखला तसेच रेशन कार्ड बनवून घेतले. स्वतःच्या मोजक्या कमाईवर मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने तिने मुलांना सांभाळू शकेल अशा निवासी शाळेत घातलं. मात्र मुलांची अस्वच्छता व आजारपण यामुळे तिला मुलांना परत नेण्यास सांगण्यात आले. दरम्यान तिला सोलापूर निर्माण गटाची भावनिक व आर्थिक पातळीवर खूप मदत झाली. निर्माणच्या डॉक्टरांनीही मुलांना वेळच्या वेळी आरोग्य सेवा मिळतील याची काळजी घेतली. सध्या या मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी पंढरपूरच्या एका बालकाश्रमाने घेतली आहे. दर रविवारी रेखा तिथे जाऊन मुलांचे केस धुणे, नखं कापणे, स्वच्छता याकडे लक्ष देत असते.

आपल्या सर्वांच्या भोवती व्यसन, अस्वच्छता, रोग यांचा चिखल असतो. मात्र स्वतःच्या अंगावर चिखल उडण्याची खात्री असतानाही रेखाने चिखलात पाय टाकण्याचे धाडस दाखवलंय. रेखाच्या प्रयत्नांना दाद देण्यासाठी आणि तिच्या मदतीसाठी जरूर संपर्क साधा.

No comments:

Post a Comment