'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

नयी तालीम समजून घेण्याच्या दृष्टीने पुढचे पाउल


मंदार देशपांडेचा पवनार मित्रमिलन व नयी तालीम राष्ट्रीय संमेलनात सहभाग

निर्माण ४ चा मंदार देशपांडे याने नयी तालीमशिक्षणपद्धती समजून घेण्याच्या उद्देशाने १५-१८ नोव्हेंबर दरम्यान वर्ध्यात पार पडलेल्या पवनार मित्रमिलन व नयी तालीम राष्ट्रीय संमेलनात सहभाग घेतला.
पवनार येथील ब्राम्हविद्या मंदिरात (विनोबा आश्रमात) दरवर्षीप्रमाणे १५ नोव्हेंबर या विनोबांच्या निर्वाण दिनाचे औचित्य साधून १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मित्रामिलनाचे आयोजन केले गेले. विनोबांचा सहवास, मार्गदर्शन लाभलेली मित्रमंडळी भारत व विदेशातून एकत्र आली होती. शिक्षण विचार: जीवनाच्या समग्रतेच्या संदर्भातया विषयाच्या अनुषंगाने नयी तालीमचे विचार, अनुभव, प्रयोग व त्यायोगे झालेले शिक्षण याबद्दल मांडणी करण्यात आली.
नयी तालीम हि गांधींनी मांडलेली एक अभिनव संकल्पना. इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीचा विचार स्वतंत्र भारतासाठी पूरक ठरणार नाही हे ओळखून गांधींनी नयी तालीमची संकल्पना मांडली. नयी तालीम संकल्पनेला मांडून ७५ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात १७-१८ नोव्हेंबर दरम्यान नयी तालीम राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन नयी तालीमच्या आनंद निकेतन शाळे तर्फे व नयी तालीम समिती तर्फे करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संमेलनात श्री नारायणभाई देसाई व न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र संमेलनाचे अध्यक्ष श्री सामदोंग रिंपोछे (ज्येष्ठ विचारवंत व तिबेटच्या भूमिगत सरकारचे माजी पंतप्रधान) व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री अनिल सद्गोपाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्माणचे मेंटॉर श्री विवेक सावंत संमेलनात त्यांच्या नयी तालीमवर आधारित प्रयोगाबद्दल बोलले.  महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यात डोंगरांवर कंटूर मार्किंग करून पाणी अडवण्याचा व तेथे झाडे लावून वाढवण्याचा प्रयोग आणि त्यातून मुलांचे विविध विषयांचे झालेले शिक्षण अशी विवेक काकांनी मांडणी केली. विवेक काकांसोबत इतर १० जणांनी त्यांच्या नयी तालीमवर आधारित प्रयोगांची मांडणी केली.
      संमेलनादरम्यान वाचनासाठी पुढील साहित्य सुचवले गेले:
·         शिक्षा समाज और संस्कृती- आचार्य कृपाल राममूर्ती
·         शिक्षण विचार- विनोबा भावे
·         नयी तालीम: एक विहंगावलोकन- शिवदत्त
·         नयी तालीम- रमेश पानसे
·         २२ ऑक्टोबर १९३७ चे वर्धा शिक्षण परिषदेतील गांधीजींचे भाषण.

No comments:

Post a Comment