'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 4 December 2012

पुस्तक परीक्षण: एक गोंड गाव मे जीवन (अनुवाद लेखक: नरेन्द्र वशिष्ठ)


मूळ पुस्तक- Leaves from the jungle: Life in a Gond village (Author: Verrier Elwin)
प्रकाशन: राजकमल प्रकाशन पृष्ठ संख्या: 136 

  आपल्यापैकी अनेक जण ग्रामीण भागात काम करतात. काम करताना ग्रामीण संस्कृती समजून घेण्याची, तिच्याशी एकरूप होण्याची आपल्याला सुवर्णसंधी असते. एखादा परक्या संस्कृतीतून आलेला माणूसही इच्छाशक्ती असेल तर आदिवासी संस्कृतीत कसा मिसळून जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेरियर एल्विन. नुकत्याच पार पडलेल्या ऑक्टोबर कार्यशाळेत नायनांनी एल्विन यांचे ‘Leaves from the jungle’ हे पुस्तक वाचण्यास सुचवले होते.
वेरियर एल्विन हे मूळ इग्लंडचे. भारतात ते 1927 साली आले. ते चर्च ऑफ इग्लंडचे पाद्री होते. 1928 साली त्यांची भेट गांधीजींशी झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्य़ाला कलाटणी मिळाली, असे ते आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात. आपल्या देशवासीयांनी भारत देशाची केलेली हानी भरून काढण्यासाठी काही करायला हवे, असा विचार त्यांच्या मनात रुजला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.
1936 साली त्यांनी मैकल जंगलातील करंजिया गावी जाउन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी शामराव हिवाळे हे सुद्धा होते. त्यानुसार त्यांनी 1932 ते 1936 काळात प्रत्यक्ष करंजिया गावात आश्रम स्थापन करून आपल्या सहकाऱ्यांसोबत आदिवासी लोकांसाठी काम केले.   
एल्विन यांचे मानववंशशास्त्र (अँन्थ्रोपोलॉजी) विषयात व्यावसायिक शिक्षण नव्हते, पण त्यांचे कार्य हे या विषयातील भारतातील पहिल्यावहिल्या कार्यांपैकी एक व भारतात मानववंशशास्त्राचे पाया रचणारे समजले जाते. 1932 ते 1936 या काळातील अनुभवांचे डायरी रुपाने लेखन त्यांनी केले व त्याचेच प्रकाशित स्वरूप म्हणजे हे पुस्तक.
वेरियर पुस्तकाची सुरूवात पंडा बाबा या आदिवासी व्यक्तीबद्दल बोलुन करतात. त्यातून आपल्याला गोंड आदिवासींचा इतिहास, त्यांच्या मान्यता, दंतकथांबाबत कळते. प्रत्यक्ष डायरीची सुरूवात 28 जानेवारी, 1932 तारखेपासून होते. गावात येतानाचा प्रवास इथपासून ते आश्रम स्थापन करणे, तिथले जंगल, आदिवासी लोक, त्यांची जीवनशैली, आश्रमातील व्यक्ती, गावातील व्यक्ती, आश्रमातील कुत्रा, आदिवासींच्या अंधश्रद्धा, त्यांच्यातले व्यवहार व हेवेदावे, स्त्री-पुरूषांमधील नाते, गांधीजी, राष्ट्रीय लढा इत्यादी विषयांवर त्यांचे निरीक्षण व विचार त्यांनी मांडले आहेत. सोबत त्यांच्यामधे असलेली मिश्किल लेखनशैली आपल्याला पुस्तक हातात घेतल्यावर अधाशीपणे वाचण्यास भाग पाडते. त्यांचा मिश्किलपणा अगदी नैसर्गिक वाटतो. “होस्टल खुल जाता हैं। उसमे ये बच्चे रहते हैं – हजारी, सेपाया, रन्नू, रत्तन और ढोली। वे सब ‘एलिस इन वंडरलैंड’ के निवासी लगते हैं।”, तसेच “पंडा बाबा के कारण शाम अच्छी गुजरती हैं जब वह संसार की उत्पत्ती के बारे मे जानकारी देते हैं। यह जानकारी बाइबिल के जेनेसिस से थोडी अलग है किंतु इसमे चार्ल्स डारविन और एच.वि. वेल्स की खामियाँ नही हैं।”   
एखाद्या व्यक्तीने आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांचे एवढे बारीक निरीक्षण करणे, लक्षात ठेवणे व त्यांची नोंद डायरीत करून ठेवणे याचेच आपल्याला आश्चर्य वाटत राहते. अगदी घरात खूप झुरळे आहेत असे निरीक्षणसुद्धा ते लिहितात. अनेकदा न दिसणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करणाच्या त्यांच्या क्षमतेची प्रचिती येते. एका ठिकाणी ते लिहितात, “कई बच्चे आत्म-निर्भरता के विरोध मे स्कूल छोडकर जा रहे हैं। वे अपना पानी भरकर नही लाना चाहते। वे अपना दिमाग इस्तेमाल करना चाहते हैं, हाथ नही।”    
   त्या काळातील गोंड आदिवासींचे जीवनदर्शनही होते. गोंड आदिवासींचे जीवनदर्शन करता करता ते व त्यांचे साथीदार करत असलेल्या कामाचे महत्त्वही आपणास हलकेच लक्षात येते. वेरियर कधी कामानिमित्त शहरात जात तर भारतातील शहरांचे, राष्ट्रीय लढ्यासंबंधीचे तसेच काही व्यक्तिंचे त्यांनी केलेले मिश्किल निरीक्षण आपल्याला दिसते. काही वेळेस ते आपले धर्माविषयीचे विचारसुद्धा प्रामणिकपणे मांडतात. 
पुस्तकाचा शेवट अगदी सहज डायरी लिखाण संपल्या सारखा होतो. कुठेही डायरी हेतूपूर्वक लिहिली गेली होती व मुद्दाम ती रंजक करण्याचा प्रयत्न करून काही स्टोरी निर्माण केल्याचा भास मुळीच होत नाही.          
एकूण हे पुस्तक आपल्याला निरीक्षक मनोवृत्तीचे, सेवेचे व विनोदबुद्धीचे उदाहरण म्हणून वाचणास अगत्याचे ठरते.

वैभव आगवणे


No comments:

Post a Comment