'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

लिहिते व्हा: एका दिशेचा शोधमला सतत असे वाटत राहते की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा एका खूपच सुंदर चित्राला फाडून टाकले गेले आणि त्याचे तुकडे तुकडे करून सर्वत्र पसरविले गेले. माझ्या जीवनाचे कार्य आहे ते सर्व तुकडे शोधून काढणे व आयुष्याचे हे Jig-saw puzzle सोडविणे. येथे गेल्यावर कुठेतरी वाटून गेले की एक कोणतातरी तुकडा मला येथे सापडला आणि मी माझ्या आयुष्याचे ते सुंदर चित्र पूर्ण करण्याच्या जवळ पोहचलो.

मानवी मन... उत्तुंग, प्रचंड ताकदवान, समंजस, कठोर, हळवे, प्रेमळ, अनाकलनीय, गूढ, फसवे, राक्षसी, घातकी आदि आदि. एकाच व्यक्तीमध्ये या सर्व आणि इतरही बऱ्याच रंगछटा सोबतच नांदत असतात. सर्व काही होत राहतं, सर्व काही घडत राहतं... काही हवं हवंसं, काही नकोसं! पण हे मन अतृप्तच राहतं... सतत काही शोधतच राहतं, सतत कशात ना कशात गुंततच राहतं. कदाचित पूर्णत्वाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत राहतं. रोज मनात अनेक संघर्ष सुरु असतात. रोजच जय पराजय होत राहतो. मनच जिंकते, मनच हरते, आयुष्य सुरु राहते, प्रवास सुरु राहतो.
अशाच मनाच्या अनेक अवस्था घेऊन स्वतःच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याकरिता, भविष्याचा वेध घेण्याकरिता गेला एक महिना या ना त्या कारणाने प्रवास करीत होतो, लोकांना भेटत होतो, बोलत होतो. स्वतःची उत्तरे शोधत होतो. स्वतःचे मत तपासत होतो आणि बरेच काही. या प्रवासात प्रामुख्याने बिलासपूर येथील जन स्वास्थ्य सहयोग, दल्ली राजारा येथील शहीद हॉस्पिटल, सर्च (गडचिरोली), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (कुरखेडा, गडचिरोली), नंदा खरे(नागपूर) या ठिकाणी जाता आलं, मित्रांना भेटता आलं .

जन स्वास्थ्य सहयोग, बिलासपुर (छत्तीसगढ)
AIIMS ही भारतातील आग्रगण्य वैद्यकीय संस्था. किमान २५-३० वर्षांपूर्वी MBBS करता करता विद्यार्थ्यांचा एक गट सामाजिक जाणीवा शोधू लागला. त्यांच्या मधल्या परिसंवादात जे.एन.यु. मधील दिग्गजांना बोलावू लागला. हळूहळू त्यांनी ठरविले की पदवी घेतल्यानंतर कधीतरी असा एक दवाखाना असेल जो आज होणाऱ्या चर्चेचं फलित असेल. त्यांच्यातल्या सर्वांनी Post graduation (PG) साठी वेगवेगळ्या शाखा निवडल्या. पण PG झाल्यानंतरही योग जुळून येत नव्हता. सर्व एकाच वेळी होकार देत नव्हते. दवाखाना कुठे असावा, कोण काय जबाबदारी घेईल, पैसे कुठून जमवावे, घरच्यांना कसे समजवावे असे अनेक प्रश्न समोर होते. पण काही ठोकताळे निश्चित होते. गरज आहे तेथेच दवाखाना उभारायचा, रुग्णांना सर्वोच्च प्राधान्य, ज्या-ज्या अंगाने रुग्णाचे आयुष्य सुधारण्यास मदत करता येईल ते सर्व प्रयत्न करणे इत्यादी.
मग शेवटी काही वर्षांनी छत्तीसगढ मधील गानियारी या बिलासपूर जवळच्या गावात एकूण ९ डॉक्टरांनी जन स्वास्थ्य सहयोग या दवाखान्याची सुरवात केली. रुग्णांना प्राधान्य, त्यांचे प्रश्न समजून घेत हळू-हळू दवाखाना मोठा होऊ लागला. रुग्णांना आधी अजिबात विश्वास नव्हता पण हळूहळू त्यांचा विश्वास वाढू लागला. दवाखान्यात मग टीबी, रक्ताच्या तपासणीपासून तर मोठमोठे operations होऊ लागले. आज या दवाखान्यात सामान्य रुग्णांवरील उपचारासोबतच टीबी, डायबेटीस, कॅन्सर या रुग्णांवरसुद्धा औषधोपचार केले जातात. आठवड्याचे ३ दिवस ऑपरेशन ठरलेले असतात व इतर ३ दिवस ओपीडी. दिवसाला किमान १०-१५ ऑपरेशन केले जातात. कमी खर्चात दर्जेदार रुग्णसेवा आणि औषधे उपलब्ध असल्यामुळे लांबवरच्या  गावातील लोकसुद्धा इकडे गर्दी करू लागले आहेत. रुग्णसंख्या दिवसाला २००-४०० च्या घरात असते. अनेक तज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवा उपलब्ध करून देत असतात.
उपचारांव्यतिरिक्त येथे आरोग्य सेवकांकरिता प्रशिक्षण केंद्रे सुद्धा आहेत. रुग्णांच्या राहण्याची सोय, एक सुसज्ज वाचनालय, बाग, आयुर्वेदिक औषधी निर्मिती केंद्र, औषधालय, रक्त-लघवी तपासणी केंद्र, भोजनालय इत्यादी सर्व रुग्णालयाच्या आवारात आहे.
सोबतच ३ वेगवेगळ्या गावात कम्युनिटी क्लिनिक स्थापन करून तेथे दर शनिवारी रुग्णांची तपासणी असते. अनेक शासकीय प्रकल्प जनसमूहात पोहोचविण्यासाठी जन स्वास्थ्य सहयोग प्रयत्न करते.
वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी अवघड भाषा सामान्यांना समजत नाही म्हणून जन स्वास्थ्य संघाद्वारा ही सर्व माहिती सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुद्धा केले जाते. काही अवघड उपकरणे त्यांनी किंचित बदल करून रुग्णांना वापरण्यास सोपी करण्याची अभियांत्रिकी सुद्धा केली आहे. अशा नानाविध प्रकारे जन स्वास्थ्य सहयोग आज छत्तीसगढ मधील ग्रामीण भागात एक आशेचा किरण दाखवत आहे व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना अशाच प्रकारचे काम करण्यास प्रोत्साहित करत आहे.
जन स्वास्थ्य संघाला भेट देण्यासाठी मी, रश्मी अकोदे, पवन मिल्खे, कौशल्या शिंदे, धनश्री बागल असे ५ जण गेलो होतो. १८ ऑक्टोबरला आम्ही तेथे पोहचलो. आपल्यातीलच डॉ. सचिन बारवदे, डॉ. अश्विनी महाजन, डॉ. अभिजित गादेवार ही तरुण मंडळी या दवाखान्यात रुग्णसेवा देण्याकरिता व बरेच काही शिकण्याकरिता बऱ्याच महिन्यांपासून रुजू झाली होती.
सुरवातीच्या संस्थापकांपैकी डॉ. योगेश आणि डॉ. रतन यांनी आम्हाला बराच वेळ दिला आणि आमच्या स्वैर प्रश्नांना समर्थ अशी उत्तरे दिली. स्वतःचे अनुभवविश्व उलगडून दाखविले. आमच्या किमान काही प्रश्नांना उत्तर देता देता आम्हांला योग्य ते मार्गदर्शन केले.
हे सर्व बघत असताना, ऐकत असताना माझ्या व पवनच्या मनात सतत हेच प्रश्न उठत  होते की हे लोक जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांचे प्रश्न आणि भावविश्व काय होते ? आज मला, पवनला जे प्रश्न पडत होते तेच प्रश्न त्यांचेही होते का? की त्यांना भविष्य स्पष्ट दिसत होते? आज आमच्या मनातले कन्फ्युजन त्यांनाही होते का? आम्हाला वाटणाऱ्या भीतीला त्यांनी कसे मागे सारले? आयुष्याची दिशा कशी ठरवली? व आज इथेपर्यंत पोहोचल्यावर भूतकाळाबद्दल, घेतलेल्या निर्णयांबद्दल काय वाटते? पश्चाताप आहे का आनंद आहे?
बिलासपूरला जाताना, तिथल्या दिग्गजांना ऐकतांना, कार्यशैली बघतांना आणि तिथून परत येताना  वाटून गेले की मानवी मन बदलण्याचे, ते आणखी समृद्ध होण्याच्या प्रक्रियेचे हे चक्र कायम फिरत राहतं, व्यक्तींना बनवत राहतं, घडवत राहतं. फार फार तर चेहरा, जागा, काळ, प्रसंग बदलतो; परंतु प्रक्रिया सहसा बदलत नाही. ज्या वेळेस प्रश्न पडायला पाहिजे, तेव्हा ते पडतात, जेव्हा उत्तर मिळायला पाहिजे तेव्हा ती मिळतात. मनुष्य तोच असतो परंतु बघण्याची दृष्टी आलेली असते, मनुष्य तोच असतो परंतु पात्रता कमावलेली असते आणि यामुळेच हा मनुष्य आधीपेक्षा पूर्णतः वेगळा सुद्धा असतो.
जे आज आमच्या मनात आहे, तेच त्यांच्या मनात होते, तसेच होते, हे विचार मनाला आनंद देऊन गेले पण सोबतच जबाबदारीचे डोंगरही. एक एक सुखद अनुभव समोर ठेवलेल्या कठोर परिश्रमांचे महत्त्व समजावून देत होता. प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रक्रिया घडत होत्या. आम्हा प्रत्येकाच्या मनात. नेहमीप्रमाणे या चर्चेतही नक्कीच  काहीतरी दिले गेले आणि काहीतरी घेतलं गेले. मन आणखी समृद्ध झाले.

शहीद हॉस्पिटल, दल्ली राजारा(छत्तीसगढ)
दि २५ /११/१२ ला परत छत्तीसगड येथील दल्ली राजारा येथे आम्ही शहीद हॉस्पिटलला भेट द्यायला गेलो. खाणीतील मजूर कामगारांनी ठरविलेले आणि मजुरांनीच बांधून दिलेले आगळेच इस्पितळ आम्ही बघत होतो. १९८३ पासून प्रसूती गृह म्हणून सुरु झालेले हे इस्पितळ आज एक सुसज्ज opd  व १२० बेडेड इस्पितळात रुपांतरित होऊन मोठ्या दिमाखात उभे आहे. येथील कामगार नेते श्री. नियोगी यांच्या प्रयत्नातून आणि डॉ.  बिनायक सेन, डॉ. गुणा, डॉ. कुंडू, डॉ. जाना, डॉ. गुहा यांच्या पाठींब्यावर हे इस्पितळ सुरु झाले. आज येथे  सर्व प्रकारचे उपचार, operations, प्रशिक्षण इ. होतात. मजुरांचे हे स्वतःचे हक्काचे इस्पितळ आहे.
या इस्पितळाला भेट द्यायला मी, पवन मिल्खे आणि सेवांकुर परिवाराचे डॉ. प्रशांत कुचानकर आणि डॉ. विराज गीते असे आम्ही सर्व गेलो होतो. डॉ. जाना यांनी आम्हाला पूर्ण इस्पितळ आणि त्याच्या इतिहासाबद्दल  अतिशय रंजक आणि तितकीच विचार करायला लावणारी बरीच माहिती सांगितली.
दोन्ही  ठिकाणी आम्ही बरेच प्रश्न, विचार घेऊन गेलो होतो. काही उत्तर मिळाली, काही नव्या दिशांचा शोध लागला, काही मापदंड गळून पडले. या भेटीबद्दल काही रोचक, माहितीपूर्ण आणि तेवढेच स्वतःला विचार करायला लावणारे प्रश्न निर्माण झाले.
मला सतत असे वाटत राहते की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा एका खूपच सुंदर चित्राला फाडून टाकले गेले आणि त्याचे तुकडे तुकडे करून सर्वत्र पसरविले गेले. माझ्या जीवनाचे कार्य आहे ते सर्व तुकडे शोधून काढणे व आयुष्याचे हे Jig-saw puzzle सोडविणे. येथे गेल्यावर कुठेतरी वाटून गेले की एक कोणतातरी तुकडा मला येथे सापडला आणि मी माझ्या आयुष्याचे ते सुंदर चित्र पूर्ण करण्याच्या जवळ पोहचलो. हा प्रवास असाच सुरु आहे. आयुष्य असेच सुरु आहे.

डॉ. प्रियदर्श तुरे

No comments:

Post a Comment