'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

निर्माणी होत आहेत मानसोपचार तज्ञ


        
            मानसिक आरोग्य हा स्वास्थ्याचा अविभाज्य व प्रमुख भाग आहे. या विषयी सद्य सामाजामध्ये हवी तेवढी जागरूकता व यासंबंधी सुविधांची उपलब्धता नाही. गडचिरोलीतील ग्रामीण व आदिवासी भागात मानसिक आरोग्याची गरज ओळखून सर्चने या विषयाशी संबंधीत काम सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून दि. २५-२६ डिसेंबर, २०१२ रोजी सर्च मध्ये दोन दिवसीय मानसिक आरोग्य शिबीर संपन्न झाले.

या शिबीरासाठी डॉ. आनंद नाडकर्णी व त्यांच्याशी जोडलेले काही मानसोपचारतज्ञ डॉक्टर विविध भागतून आले होते. शिबीराच्या आयोजनाची जबाबदारी वेंकीने (वेंकटेश अय्यर) सांभाळली. याचबरोबर मानसोपचार (Psychiatry) शाखेत शिक्षण घेणारे व या विषयाची आवड असणारे निर्माणी डॉक्टर या शिबीरासाठी आले होते. यामध्ये निर्माण-२ चा वैभव आगवणे, निर्माण-३ चे वैभव पाटील, चेतन लोखंडे, निलेश मोहितेनिर्माण-४ चे सुजय काकरमठ, युगंधरा काटे, स्वाती देशमुख, रामानंद जाधव, विक्रम सहाने या सर्वांनी या शिबीराचा सदुपयोग रुग्णसेवा देण्यासाठी व शैक्षणिक संधी म्हणून केला.

याच काळात डॉ. अनंद नाडकर्णी यांनी चित्रपट समीक्षण (Film appreciation) या विषयावर सत्र घेतले. यामध्ये त्यांनी चित्रपटांचा वापर शैक्षणिक साधन म्हणून प्रभावीपणे कसा करावा याचे मार्गदर्शन देखील केले.

मानसिक आरोग्यासंबंधी ग्रामीण भागातील वाढत्या समस्यांचे स्वरुप आणि तज्ञांची गरज यासंदर्भात शिबीरासाठी आलेल्या निर्माणींशी डॉ. अभय बंग यांनी (नायनांनी) संवाद साधला. या विषयाशी संबंधीत शास्त्रीय साहित्याचा सखोल अभ्यास व या समस्यांचे मोजमाप या दोन गोष्टींवर नायनांनी विशेष भर दिला. उपस्थित निर्माणींनी  संबंधीत अभ्यासात योगदान देण्याची इच्छा प्रकट केली. 

No comments:

Post a Comment