'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013

जन स्वास्थ्य सहयोग व शहीद हॉस्पिटल बनत आहेत निर्माणींच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र         निर्माणचे महेश पुरी, नेहा काळे, धनश्री बागल, पांडुरंग गिरी, धीरज देशमुख, पवन मिल्खे, सागर काब्रा, श्रीनिवास पिन्नाटे, अनिकेत पवार, युवराज बागल यांच्यासह दोन तरुण डॉक्टर्स ऋतुराज देशमुख व चैतन्य पाटील इ. सहकाऱ्यांनी नुकतीच जन स्वास्थ्य सहयोग (JSS) व शहीद हॉस्पिटल या छत्तीसगढ मधील रुग्णालयांना भेट दिली.
           JSS हा AIIMS या आग्रगण्य संस्थेतील सामाजिक जाणीव असणाऱ्या डॉक्टर्सनी बिलासपूर जवळील गानियारी या गावात सुरू केलेला दवाखाना. या भेटीच्या निमित्ताने तरुण डॉक्टर्स व इंजिनियर्सना JSS चा दवाखाना, स्थानिक व प्रशिक्षण घेतलेल्या लोकांच्या मदतीने चालवलेली प्रयोगशाळा, खेड्यातील रुग्णांना कमी किंमतीची जेनेरिक औषधे पुरवणारे औषधांचे दुकान, hypo/hyperthermia, hypertension इ. रोगांचे निदान अवैद्यकीय कार्यकर्त्याला करता यावे या उद्देशाने विकसित केलेली उपकरणे यांच्या माध्यमातून JSS चे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. या गटाला गानियारीपासून ७८ किमी अंतरावरील बामणी या खेड्यात आठवड्यातून एकदा चालणाऱ्या JSS च्या community clinic ला भेट देऊन तेथील बाह्यरुग्ण विभाग व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण पाहता आले. या भेटींदरम्यान JSSचे डॉ. योगेश जैन यांनी या गटाशी मोकळेपणे संवाद साधला. प्रेरित व वैविध्यपूर्ण अशा गटासोबत काम करताना आलेला अनुभव, तसेच चांगले काम करताना पैशांची वेळोवेळी होत जाणारी सोय इ. विषयांवर अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन केले. शहीद हॉस्पिटल हे खाणीतील कामगारांनी सुरू केलेले हॉस्पिटल. शहीद हॉस्पिटलच्या डॉ. जाना यांनीदेखील या तरूणांना मार्गदर्शन केले.
JSS मध्ये निर्माणचे डॉ. सचिन बारब्दे व डॉ. अश्विनी महाजन सध्या सेवा देत आहेत. या संस्थांमध्ये सेवेच्या माध्यमातून डॉक्टर निर्माणींना काम करण्याची संधी तसेच या संस्थांभेटीच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.
जन स्वास्थ्य सहयोगबद्दल अधिक माहितीसाठी: http://www.jssbilaspur.org/about/
शहीद हॉस्पिटलबद्दल अधिक माहितीसाठी: http://en.wikipedia.org/wiki/Dalli_Rajhara

No comments:

Post a Comment