'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

दुष्काळावर जागृतीसाठी प्रफुल्ल वडमारेचा पुणे विद्यापीठात उपक्रम


महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पाण्याच्या कमतरतेने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीबद्दल संवेदनशीलता वाढवण्यासाठी निर्माण-५ चा प्रफुल्ल वडमारे व त्याच्या मित्रांनी नुकतेच पुणे विद्यापीठात एक उपक्रम घेतला. याअंतर्गत या गटाने होळीला पाण्याचा वापर होऊ नये म्हणून सही अभियान घेतले. तसेच दि. २६ मार्च रोजी अर्थशास्त्र विभागामध्ये एक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये दुष्काळ परिस्थिती समजण्यासाठी विविध फिल्म्स पाहण्यात आल्या व त्यावर चर्चा झाली. यावर प्रतिक्रिया देताना बर्‍य़ाचजणांनी या परिस्थितीविषयी अनभिज्ञ असल्याचे दु:ख व्यक्त केले. ही परिस्थिती समजताच बर्‍याच जणांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करण्याचे संकल्प केले. होळीसाठी पाण्याचा वापर टाळण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच या समस्या विषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली. चर्चासत्राच्या शेवटी अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी साहणी यांनी सर्वांना संबोधीत केले. याबरोबरच सर्वांनी दुष्काळी भागातील लोकांना पत्र लिहून त्यांना “आम्ही तुमच्या बरोबर आहोत” असा दिलासा देखील दिला. दुष्काळाच्या धगधगत्या प्रश्नावर स्वतःहून पुढाकार घेऊन धडपड केल्याबद्दल प्रफुल्ल व त्याच्या गटाचे अभिनंदन!

No comments:

Post a Comment