'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

उत्तरखंड प्रलय (भाग १)

पृथ्वीवरचे स्वर्गतुल्य तीर्थक्षेत्र केदारनाथ ! १६ जून २०१३ ची सकाळ ! नुकताच सूर्योदय होत होता !! सूर्याची किरणे बर्फाच्छादित शिखरांवरून आसमंत प्रकाशित करत होती. पहाटेची हलकी थंडी आणि रात्रीचे धुके हळूहळू विरत चालले होते. केदारनाथ मध्ये दर्शनासाठी लोक रांगेत शिस्तीने उभे होते . मंदिराच्या आवारात आणि बाहेर रस्त्यावरची रेलचेल पहाटेच्या अंधारातच सुरु झाली होती. छोटी मोठी दुकाने नटून थटून सजली होती. सर्वदूर मंदिराच्या घंटांचे कर्णमधूर ध्वनी-प्रतीध्वनी उमटत होते. दर्शनासाठी भाविक मंदिराच्या दिशेने एकत्र होत होते.  निसर्ग प्रत्येक घटकेला उल्हासित करणारा श्वास घेत होता. सर्वकाही व्यवस्थित आणि एका लयीत सुरु होते.
अचानक दुरून एका स्फोटाचा गगनभेदी आवाज झाला. दूर उत्तरेकडून धुराचा मोठा लोट मंदिराच्या दिशेने आगेकूच करू लागला. अगदी एका छोट्या ठिपक्या एवढा तो पाण्याचा लोट जवळ येता येता विक्राळ रूप धारण करू लागला. ते नुसते पाणी नसून त्यात एका लहान टेकडीच्या आकाराचे शिलाखंड पाण्यासोबत वाहून येत होते. पाण्याची ती ताकद आणि रौद्र रूप बघून पाळणारे पाय जागच्या जागी स्तंभित झाले. आता तर प्रत्यक्ष ईश्वरानेच तिसरा डोळा उघडल्याचा भास झाला. आणि हाहाकार उडाला.
प्रचंड मोठ्या शिलाखंडासोबत पाणी वाट फुटेल तेथे वाहू लागले. केदारनाथ मंदिराभोवती मृत्यूचे थैमान सुरु झाले. आणि रस्त्यात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना निसर्गाची ताकद दाखवू लागले. नदीचे पत्र दहापट मोठे झाले होते. पाण्यासोबत वाहून आलेल्या दगडांचा पूर सगळीकडे पसरला होता. लोकांचे कुतूहल आता दारूण किंचाळ्यात बदलले होते. जे काही पाण्याच्या रस्त्यात आले नाहीत ते त्या दिवसापुरते सुदैवी होते. परंतु केवळ त्याच दिवसापुरतेच!
पुराच्या पाठोपाठ प्रचंड आकाराच्या पाण्याची धार नदीच्या पत्रातून पुढे सरकू लागली. आकाराने खूप मोठी वेगवान आणि अतिशय शक्तीशाली अशी ही धार मंदिराच्या आसपासचा पूर्ण परिसर कापू लागली. जणू काही विध्वंस हेच एक ध्येय घेऊन ती लाट पृथ्वीतलावर उतरली होती. आणि त्या अपराजित शक्तीने हा हा म्हणता गाठले सुद्धा ! केवळ  मिनिटांच्या खेळात अनेक लोक पाण्यात वाहून गेले. शेकडो दुकाने क्षणार्धात दिसेनाशी झाली. मोठमोठ्या इमारती, हॉटेल्स बघता बघता जमीनदोस्त झाले. मृत्यूचे हे थैमान लांबून उंचावरून बघणारे लोक वाट फुटेल तेथे पळू लागले. सलग तीन दिवसांचा पाउस, नदीचे वाढलेले पात्र आणी ही प्रलयंकारी लाट यांनी १६ तारखेच्या सकाळी पूर्ण केदारनाथ परिसर उध्वस्त करून पुढे पुढे सरकू लागले.
            केदारनाथला जायला गुप्तकाशीवरून सोनप्रयाग, गौरीकुंड, रामवाडा, केदारनाथ असा एकूण ४५ किमीचा रस्ता आहे. गौरीकुंड पर्यंत पक्क्या सडकेने जोडलेला हा रस्ता. पुढे गौरीकुंड ते रामवाडा – केदारनाथ हे १४ किमी अंतर पायीच कापावे लागते. केदारनाथला गौरीकुंडवरून पायी जाताना अनेकाना खच्चर लागतात. सामान व यात्रेकरू यांना घेऊन खच्चर व त्यांचे मालक केदारनाथ परिसराचे दर्शन घेऊन परत आणतात. पण हल्ली काही वर्षांपासून स्थानिक हॉटेल मालकांनी गुप्तकाशी वरून हेलिकॉप्टरची सोय करून हा प्रवास तिप्पट किंमतीत एका दिवसात करणे शक्य केले. त्यामुळे स्थानिक रोजगारावर गदा आली होती. खच्चर मालकांना ग्राहक मिळत नव्हते व सोनप्रयाग, रामवाडा, गौरीकुंड येथील पर्यटन व राहण्याचे ठिकाण ओस पडत होते. दि. १३ ते १५ जूनपर्यंत याच हेलिकॉप्टरांच्या विरोधात स्थानिक नेते आणि खच्चर मालक यांनी धरणा मोर्चा आरंभला होता. त्यामुळे गौरीकुंड, रामावाडा आणि केदारनाथ या तीनही ठिकाणी तीन दिवासांपासूनचे प्रवासी अडकले होते. गर्दीच्या मोसमात तेथे एका दिवशी साधारण १५००० दर्शनार्थी  दर्शन घेऊन परतात. परंतु या धरण्यामुळे गौरीकुंड, रामावाडा आणि केदारनाथ या तीनही ठिकाणी तीन दिवासांपासून चे प्रवासी अडकले होते. आणि १६ जूनच्या पहाटे ५-८ दरम्यान केदारनाथ येथून निघालेल्या पाण्याच्या प्रचंड लाटा आणि शिलाखंडानी गौरीकुंड, रामावाडा आणि सोनप्रयाग ही तीनही मोठी ठिकाणं उध्वस्त झाली. यात्रेकरूंनी काही करण्याच्या आतच पाण्याने झडप घातली. आणि चारही ठिकाणे जलमय झाली. इमारती कापल्या, रस्ते-पूल वाहून गेले. जीव वाचवण्यासाठी सर्व लोक पहाडांच्या आणि जंगलांच्या दिशेने पळू लागले. दर्शनार्थी आणि स्थानिक लोक मग जंगलात आणि पहाडावर एकमेकांना भेटले आणि छोटे छोटे गट स्थापन करून परतीचा मार्ग शोधू लागले. पूर ओसरल्यावर त्यापैकी काही लोक परत त्या तीनही गावात जाऊन आपल्या आप्तेष्टांना शोधू लागले. परंतु या तीनही गावात होता फक्त रेतांचा ढीग आणि मरणाची शांतता. हे सगळे दृश्य बघून वाचलेले लोक पुन्हा परतीची वाट शोधू लागले. पण रस्ते आणि पूल तुटल्यामुळे, आणि इतका विध्वंस झाल्यामुळे रस्ता शोधणे अवघडच झाले होते. पहाडातून किवा जंगलातूनच परतीचा मार्ग शोधावा लागणार होता. केदारनाथ (१९००० फीट) च्या उंचीवर जंगल आणि पहाड म्हणजे ऑक्सिजनची कमतरता, कामालीची थंडी, पाउस आणि अन्न-पाण्याची अनुपलब्धता. यावर मात करत गुप्तकाशीला जिवंत पोचणे अशक्यप्राय असे होते. बऱ्याच लोकांनी ते जेथे फासले आहे तेथेच थांबणे पसंत केले तर इतर अनेकांनी जंगल पहाडातून मार्ग शोधत बाहेर निघण्याचा प्रयत्न सुरु ठेवला.
            पूर बघून जे पळून गेले होते आणी जे नंतर रस्ते शोधण्यासाठी पायीच निघाले होते. ते जवळच्याच जंगलात, पहाडात रस्त्याचा शोध घेत राहिले. फारच मोजक्या लोकांना बाहेर निघता आले. इतर अनेक लोक अन्न-पाण्याविना फिरून, तडफडत रस्त्यावरच मरण पावले. अनेक लोक थंडी-पाउस व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ३-४ दिवसांत मृत्यू पावले. याच्यानंतर जे क्रूरकर्म तिथे लोकांनी अनुभवले त्याला परिसीमा नव्हती. जे स्थानिक लोक, खच्चरांचे मालक व नेपाळी हमाल अशा गटांचे नेतृत्व करत होते त्यापैकी अनेकांनी या मेलेल्या प्रेतांवरचे सर्व सोने-नाणे, दागिने, पैसे काढून घेतले. काही लोकांनी मुद्दामच चुकीच्या रस्त्यावर या गटांना घातले होते. त्यांना चांगले ठाऊक होते कि ३-४ दिवसांपेक्षा जास्त बाहेरील व्यक्ती येथे तग धरू शकत नाही.  गटातील एकट्या महिला जिवंत वाचल्या तर त्यांचा वर बलात्कार झाले. अनेक महिलांची प्रेते झाडांना बांधून अडकली, तर अनेक महिला कश्याबश्या यातून सुटून नग्न अवस्थेतच हेलीपॅडवर पोहोचल्या. पैशांची भुकेली ही जनावरे मग परत त्या तिन्ही शहरात प्रेतांच्या ढिगाऱ्यावर फिरू लागली. त्यांच्या शरीरावरची आभूषणे गोळा करू लागली. प्रेतांचे शरीर सुजले असल्यामुळे बांगड्या, अंगठ्या निघत नसतील तर बोटं, मनगट कापून ही लूट सुरू होती. हे कळल्यावर जेव्हा काही नेपाळ्यांची तपासणी झाली तेव्हा त्यांच्या बॅगेतून तुटलेले बोट, हात इ. सापडले. मानवी क्रौर्याला परिसीमा राहिली नाही. ज्या महिला आपले हरवलेले आप्तेष्ठ शोधण्यासाठी परत या गावात आल्या आणि एकट्या या लुटारूंच्या नजरेत सापडल्या त्यांना फसवून सुनसान ठकाणी नेवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले. परिसरातील साधू-बुवांनी कहरच केला. तुटलेल्या मंदिरातील दानपेट्यांतील लाखोंचे दान, हॉटेलमधील गल्ल्यावरचे पैसे, ATM – बँकांमधील पैसे त्यांच्या झोळीत सापडू लागले. अनेक सोन्या-चांदीची आभूषणे अश्या महाराजांच्या झोळीतून निघू लागली. १०-२० लाखांची बंडले त्यांच्या अंतर्वस्त्रात सापडू लागली आणि प्रशासन चौकस होऊन सर्वांची तपासणी करू लागले. यादरम्यान अनेक स्थानिक लोकांनी बाहेरील लोकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून सकुशल बाहेर पोचवले होते. ही विरोधाभासाची परिस्थिती बघून माणुसकी वर विश्वास ठेवावा की नाही हे या मानसिक धक्क्यातून सावरलेले लोक अजूनही ठरवू शकलेले नाही.
तिकडे सरकार जग आली आणि ४-५ दिवसांनंतर तेथील फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु झाला. आधी लहान मुलं, महिला, वृद्ध आणि मग पुरुष अशा प्रकारे फसलेल्या लोकांना काढण्यात आले.  ही मोहीम तब्बल १७  दिवस चालली आणि यामध्ये एकूण १ लाख १० हजार लोकांना यशस्वीरित्या सकुशल बाहेर काढण्यात आले. या इतक्या दिवसात तेथील फसलेल्या लोकांनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. ३०० रुपयांचे पावही खाल्ले आणि कुठे कुठे लोकांनी स्वतःचे कुटुंबीय असल्याप्रमाणे त्यांना सांभाळले सुद्धा. मी पहिले जाणार यासाठी भांडणारे लोकही बघितले आणि आपला नंबर आला असतानासुद्धा इतरांना आधी पाठवणारे लोकही बघितले. भारतीय सेनेने या प्रलयात केलेले काम अतिशय कौतुकास्पद होते. जगात एवढे लोक सकुशल वाचवण्यात आलेली ही एवढ्या मोठ्या प्रमाणात घडलेली पहिली-वहिली घटना आहे.

(क्रमश:)

(सदर लेख BSF जवान, rescue team मधील pilots, १६ जूनचे प्रत्यक्षदर्शी आणि ढिगाऱ्यातून प्रेते बाहेर काढणारे लोक यांच्याशी चर्चा करून लिहिला आहे.)

(या पुढील भागात केदारनाथमध्ये झालेल्या प्रलयाचे कारण, केदारनाथ समवेत इतर इतर ५ जिल्ह्यांत झालेले प्रलयाचे स्वरूप, तेथील नुकसान, मेडियामुळे इतर ठिकाणांवर झालेलं दुर्लक्ष, आम्ही केलेली अल्पशी बचाव मोहीम आणि आकडेवारी व नकाशाच्या रूपाने प्रलयाची माहिती आपण बघूया.)

(आधी केदारनाथला आणि इतर ठिकाणी जायला  रस्ते नव्हते. त्यामुळे मदत घेऊन जाणारी टीम , डॉक्टर हे उपलब्ध असून सुद्धा गरजेच्या ठिकाणी पोहोचू शकले नव्हते. आता कुठे 2 महिन्यांनंतर कामचलाऊ रस्ते बनवले गेले आहेत. मदतीचा ओघ आताही सुरु आहे आणि मदतीची नितांत गरज सुद्धा आहे. पण आत्ता उत्तराखंड ला डॉक्टरांची नितांत गरज आहे. सोबतच Clinical Psychologist आणि Psychiatrist यांची देखील गरज आहे. इच्छुकांनी कृपया संपर्क साधावा.)


प्रियदर्श तुरे, priyadarshture@gmail.com

No comments:

Post a Comment