'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे जळगावात जात पंचायत मूठमाती संघर्ष परिषदचे आयोजन

नाशिक आणि लातूर येथील परीषदांनंतर जळगाव येथे तिसऱ्या ‘जात पंचायत मूठमाती संघर्ष परिषदे’चे आयोजन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हयातीत करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या जाण्याने परिषदेच्या आयोजनाची शंका उपस्थित झाली होती. डॉक्टर गेले तरी त्यांचे विचार संपणार नाहीत, त्यांचा विचारांचा लढा विचाराने सुरूच राहील ह्या हिंमतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर सामाजिक संस्थांतर्फे जळगाव येथे दि. ८ सप्टेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले.
अविवेकी समांतर जातव्यवस्था निर्माण करणाऱ्या पंचायतींच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सुरु झालेल्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जेष्ठ संपादक तसेच अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, महा. अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर व जळगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंतीताई दिघे ह्या उपस्थित होते.
अनुभव कथन सत्रात नाशिकच्या जात पंचायतींचे क्रौर्य समोर आणणारे आण्णासाहेब हिंगमिरे, पोटच्या मुलीची हत्या करणाऱ्या वडिलांवरील जात पंचायतींचा दबाव सांगणारी आई अरुणा कुंभारकर, भटक्या-विमुक्त्याच्या मुलींना शिक्षणासाठी जात पंचायातींशी करावा लागणाऱ्या संघर्षाबद्दल सांगणारी जिजा राठोड, यांसह अनेकांनी स्वतःवर जात पंचायतींनी केलेल्या अत्याचाराची कथा लोकांसमोर मांडली.
तर जात पंचायतींची वैधता आणि सामाजिक स्थान याबाबत सामाजिक चळवळींचे वकील असीम सरोदे, पल्लवी रेणके, तसेच कृष्णा चांदगुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समारोपाच्या सत्रात जेष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी तसेच जेष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेखर सोनाळकर यांनी जात आणि त्याच्याशी निगडीत अनेक बाबींवर प्रकाश टाकला.
निर्माणचे अद्वैत दंडवते, सागर पाटील यांनी परिषदेच्या आयोजनात मदत केली तर परिषदेस ज्ञानेश मगर, सारिका गायकवाड तसेच संदीप देवरे देखील उपस्थित होते.

स्त्रोत : अद्वैत दंडवते- adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a Comment