'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 22 October 2013

उत्तराखंड प्रलय भाग २


उत्तराखंड प्रलयाची शास्त्रीय कारणे काय होती? त्यातली नैसर्गिक कोणती होती? मानवनिर्मित कोणती होती? हा प्रलय कसा पसरत गेला? या संकटावर मेडीयाचा चांगला आणि वाईट प्रभाव कसा पडला? हा प्रलय घडण्यात आणि प्रलयाच्या बचावकार्यात सैन्याची कशी भूमिका होती? या प्रलयाबद्दल holistic view देणारा डॉ. प्रियदर्श तुरे याच्या लेखाचा उत्तरार्ध

अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा ढगफुटीत मोठा वाटा होता
२००६ साली भारताचे २७ वे राज्य म्हणून उत्तराखंड ओळखले जाऊ लागले. उत्तराखंडच्या उत्तरेला तिबेट, चीन तर दक्षिणेला उत्तर प्रदेश आहे. पूर्वेला नेपाळ, तर पश्चिमेला हिमाचल प्रदेश आहे. देवभूमी या नावाने ओळखले जाणारे उत्तराखंड तेथील हिमालयाच्या पर्वतीय रांगा, गंगा यमुनेचे उगमस्थान आणि अनेक ग्लेशिएर्स (Glecier 's) साठी प्रसिद्ध आहे. ह्याच ग्लेशिएर्स मधून आणि नद्यांतून निघालेले पाणी उत्तरप्रदेश, बिहार, करीत करीत बंगालच्या खाडीत प्रवेश करते. उत्तराखंड मध्ये मान्सूनचा पाऊस साधारण जूनच्या तिसऱ्या किवा चौथ्या आठवड्यात पोहोचतो. या वर्षी जूनच्या मध्यातच राजस्थानच्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झाला. बंगालच्या खाडीतून येणारे मानसूनचे cyclonic circulation वारे आणि अरबी समुद्रातून आर्दता घेऊन येणारे वारे राजस्थानच्या जवळपास एकमेकांना भिडले. यामुळे ९० अंशाच्या कोनावर वळून अति वेगाने हिमालयकडे सरकू लागले. याच मुळे दिनांक १४ ते १७ जूनला संपूर्ण उत्तरखंडात मुसळधार पाऊस सुरु झाला. मान्सूनचे ढग पर्वत शिखरावर दाटू लागले. पर्वतीय शिखर, मधली घाटी आणि कमी उंचीवर फिरणारे ढग हे नेहमी ढग फुटीला आमंत्रण देतात. उत्तराखंडला ढगफुटी काही नवी नव्हती. परंतु या वेळेस प्रत्येक पर्वताजवळ ढग जमा झाले होते. संपूर्ण ४ जिल्ह्यांची तिबेट सीमा ही या ढगांमुळे घेरली गेली. कारण समोरचा हिमालय या ढगांना रोखून धरत होता आणि मागून वेगाने येणारे मान्सूनचे प्रचंड वारे ढगांची गर्दी क्षणोक्षण वाढवत होते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 

केदारनाथच्या वरती लगेच केदारनाथ पर्वतावर चोराबरी आणि कॉम्पानियन (Companion) ग्लेशिएर आहेत. केदारनाथपासून ग्लेशिएरचं अंतर ७ किमी आहे. त्यातून मंदाकिनी, अलकनंदा या नद्यांचा उगम होतो. चोराबोरी ग्लेशिएरमधून पुढे गांधी सरोवर किंवा चोराबोरी नामक सरोवर बनतं. हे सरोवर केदारनाथ मंदिरामागील पर्वतावर ३.८ किमी वर आहे. या ग्लेशिएरला आणि सरोवरातील पाण्याला दगड आणि शिलाखंडनी बनलेली एक नैसर्गिक भिंत रोखून धरते. १५ जूनला सकाळ पासून आलेल्या मुसळधार पावसाने मंदाकिनी आणि अलकनंदा नदीच्या पाण्याला आपली धोकादायक पातळी ओलांडयला लावले. हा पाऊस १६ जूनलासुद्धा सुरूच होता. इतका मुसळधार पाऊस स्थानिकांनी अनेक वर्षांत बघितला नव्हता. संध्याकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदीचं पाणी आणखी वाढलं होतं आणि नदीप्रवाह आसपासच्या इमारतीत घुसू पाहत होता. साधारण संध्याकाळी ७:३० च्या सुमारास एका मोठ्या भूकंपासारखे धक्के केदारनाथ मधील लोकांना जाणवू लागले. एक प्रचंड मोठा विस्फोटाचा आवाज आला; आणि काही कळायचा आतच १०-१५ मिनिटांत पाण्याचा मोठा लोंढा संपूर्ण केदारनाथ परिसरात शिरला. ही केदारनाथ परिसरातील पहिली ढगफुटी होती. पाण्यासोबतच दगड, माती, शिलाखंड वाहून आले होते. लोक वाट फुटेल तिथे निघाले आणि सुरक्षित ठिकाण शोधू लागले. हळूहळू पुराचा हा लोट उतरला आणि या छोट्या ढगफुटीचे पाणी निघून गेले. लोक आपापल्या ठिकाणी परत आले. पाऊस सुरूच होता. लोक हळूहळू या भयपूर्ण वातावरणातच झोपी गेले. अनेकांसाठी ही शेवटची रात्र ठरणार होती. सकाळी सकाळी सर्व व्यवस्थित बघून लोकांचा जीव भांड्यात पडला. फारसे नुकसान झाले नव्हते, परंतु रात्रीच्या प्रकाराने लोक हादरलेच होते. 

वास्तविक पाहता त्या संध्याकाळी केदारनाथ पर्वतावर एक मोठे भूस्खलन झाले होते. जूनमध्ये बर्फ वितळण्याची प्रक्रिया जोरात सुरु असते आणि त्यामुळे तेव्हा नद्यांना मुळातच जास्त पाणी असतं. जेव्हा पाऊस जोराने बर्फावर पडतो तेव्हा बर्फ वितळण्याची प्रक्रिया आणखी वेगाने घडू लागते. १५ पासून मुसळधार पाऊस, उन्हाळ्यात ग्लेशिएर वितळल्यामुळे आधीच नदीला जास्त पाणी, पावसाच्या पाण्याने आणखी ग्लेशिएर वितळणे या सर्वांमुळे केदारनाथ पर्वतावर भूस्खलन झाले. त्यामुळे वर साचलेले थोडे पाणी वेगात खाली आले. परंतु लगेचच मागून वाहत येणाऱ्या शिलाखंड व दगड, माती यांनी परत नवीन भिंत बनवून पाण्याचा प्रवाह अडवून धरला. यामुळे एक छोटे तात्पुरते तळे केदारनाथ पर्वतावर आकार घेऊ लागले आणि त्यात पावसामुळे पाणी साठू लागले. 

इकडे सकाळी दर्शनासाठी लोक रांगा लावतानाच मोठा धरणीकंप झाला. प्रचंड मोठ्या विस्फोटक आवाजाने आसमंत कंपित करून सोडले. सकाळी ७:३० वाजता हा स्फोट झाल्यावर ५ मिनिटातच काहीही समजायच्या आत पाण्याची प्रचंड मोठी लाट मोठ मोठे शिलाखंड घेऊन केदारनाथवर धडकली. चोलाबरी ग्लेशिएर खालील या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे नैसर्गिक भिंतीचा एक भाग खचला आणि पाणी, मलबा, बर्फ, हे प्रचंड वेगाने खाली केदारनाथच्या दिशेने धावू लागले. या लाटेला केदारनाथला पोहोचायला केवळ ५ मिनिटेच लागली. तसे वरून येणारे नदीचे पाणी हे ताशी ५ कि.मी. या वेगाने खाली उतरते, परंतु ही लाट ताशी ४० कि.मी. वेगाने पाण्यासह मोठमोठाले दगड घेऊन धावू लागली. १५ ते १८ मीटर उंच ही लाट केदारनाथ मंदिराच्या परिसरात पोहोचली. अवतीभोवतीच्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे या लाटेत कोसळू लागल्या. ही भयावह लाट केवळ ३-५ मिनिटेच राहिली आणि लगेच ओसरली सुद्धा. परंतु जेव्हा लाट ओसरली तेव्हा केदारनाथ अर्धे अधिक वाहून गेले होते. ५ मिनिटांपूर्वी सोबत असणारी माणसे कुठेच दिसत नव्हती. मंदिरात पाणी घुसून मागच्या दराने निघत होते. आधीच पाऊस आणि आता या लाटेने संपूर्ण केदारनाथ परिसर जलमय करून टाकला होता. जरी ही लाट ओसरली, तरी पाऊस सुरूच होता आणि नदीचं पाणी वाढतच होतं. याच पाण्याने केदारनाथला पुढे २० दिवस घेरून ठेवलं.
ढगफुटीपूर्वीचे व नंतरचे केदारनाथ

यानंतर पाण्याची ही प्रचंड लाट केदारनाथ वरून रामबडा आणि तेथून पुढे गौरीकुंड येथे पोहोचली. रस्त्यात येणारे प्रत्येक रस्ते, पूल, गाव, माणसे, खाचरे, जनावरं, या लाटेच्या तावडीत सापडले. केदारनाथ, रामबडा, गौरीकुंड आणि पुढे सोनप्रयाग ही सर्व गावे या पाण्याने आणि दगडाने पूर्ण वाहून गेली. लाट पुढे सरकतच गेली. आधीच पावसामुढे नदीच्या पाण्याला भयानक रूप आणि जोडीला हे अतिरिक्त सामर्थ्य, नदीचे पात्र दुप्पट - तिप्पट बनवून आजूबाजूचे रस्ते, घरे, शेतं, पहाड, पूल सर्व काही आपल्या पोटात घेवून वाहू लागले. पुढे गुप्तकाशी, ओखिमाठ, अगस्त्मुनी, चंद्रापुरी, रुद्रप्रयाग, कृशिकेश इथपर्यंत या लाटा आणि त्यांचे तेच भयानक परिणाम पोहोचले. मान्सूनचे लवकर आगमन, राजस्थान वरचा कमी दाबाचा पट्टा आणि मान्सून वाऱ्याची भिडंत ज्यामुळे हिमालयात येणारे मान्सून वारे प्रचंड वेगाने हिमालय शिखरापर्यंत पोहोचले. ३ दिवसांचा सतत मुसळधार पाऊस, चोलाबरी गेल्शिएर वर ढगफुटी- भूस्खलन, वर ग्लेशिएर व तलावाला तटबंदी करणाऱ्या भिंतीला गेलला तडा हे सर्व नैसर्गिक कारणे केदारनाथच्या प्रलायास कारणीभूत घटक दिसतात. 

परंतु या जोडीला अनेक मानवीय कारणे सुद्धा आहेत. पर्वतीय भागात मानव पहाडाच्या उंच भागात वस्ती करून राहतो. तो कधीच पहाडामधील घाटीत किवा नदीच्या किनारी वस्ती करत नाही. परंतु केदारनाथला भेट द्यायला येणाऱ्यांची संख्या जशी जशी वाढू लागली तशी तशी त्या भोवती दुकाने, हॉटेल इ. बांधणे सुरु झाले. उत्तराखंडची लोकसंख्या १ कोटी च्या आसपास आहे. मात्र २०११ साली तेथे पर्यटनासाठी आलेल्यांची संख्या २.८ कोटी होती. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या तीन पट !
उत्तरखंडचा मुख्य व्यवसाय पर्यटन म्हणता येईल. त्यातही चार धाम यात्रेत केदारनाथचे महत्त्व. काही वर्षाआधी केदारनाथ यात्रेत फक्त  वृद्ध, संन्यासी लोकच यायचे. हळूहळू प्रवासाच्या सोयी झाल्यामुळे आणि रस्ते बनल्यामुळे सर्वांना येणे शक्य झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन येथील स्थानिकांनी प्रवाशांसाठी हॉटेल, राहण्याची ठिकाणे, बाजारपेठ यांची व्यवस्था केली. लोकांच्या दळण-वळणासाठी गाड्या, खेचर यांचा वापर सुरु झाला. त्याचवेळी केदारनाथ, रामाबडा, गौरीकुंड, सोनप्रयाग या चार लोकवस्त्या मंदाकिनीच्या किनारी पहाडांमधील घाटीत आकार घेऊ लागल्या. हॉटेल्स, दुकानांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली. अवैध बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पाहता पाहता हे नैसर्गिक ठिकाण बजबजपुरी बनले. बांधकाम लवकर उरकावे यासाठी बांधकामाच्या दर्जासोबत मोठी तडजोड झाली. या साऱ्या गोष्टी या प्रलयासाठी तेवढ्याच कारणीभूत ठरल्या. स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून माणसांनी तेथील नैसर्गिक समतोलाचा अक्षरशः अंत पहिला.

फक्त केदारनाथ पुरती गोष्ट केल्यास या प्रलयात ७००० च्या वर लोक मृत्यू पावले. ४१२० लोक अजूनही बेपत्ता आहेत. परंतु हे सरकारी आकडे आहेत. स्थानिकांच्या मते मृत्यूचा आकडा हा २०००० च्या वरती असेल. 

ही फ़क़्त केदारनाथ बद्दल माहिती झाली. वास्तविक पाहता ही ढगफुटी हिमालयात असलेल्या सर्वच पर्वतरांगांत झाली. त्यात उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, पिठोरागड आणि बागेश्वर या पांच जिल्ह्यात याचे रूप प्रलयंकारी होती. हे पाचही जिल्हे भारत-तिबेट सीमेवर आहेत आणि हिमालयाला येथून सुरुवात होते. 

दर वर्षी कुठे ना कुठे ढग फुटी होते. त्यामुळे एखाद्या नदीचे जलस्तर वाढणे, भूस्खलन होणे ही नवी घटना नाहीये. परंतु या खेपेला हिमालयीन पर्वतात १४-१७ जूनच्या सुमारास अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन सर्व नद्यांना एका वेळी पूर आले. पाचही जिल्ह्यात वेगवेगळ्या नद्यांनी रस्ते, घरे, अनेक मोठमोठाले पूल वाहून नेले. जनजीवन पार विस्कळीत झाले. पिथोरागडमध्ये धौली, गोरी आणि काळीगंगा, बागेश्वर व चमोलीमध्ये धौलीगंगा, पिंडार, नंदाकिनी, सरस्वती या नद्या; तर रुद्रप्रयागमध्ये मंदाकिनी, उत्तरकाशीमध्ये भागीरथी या सर्व नद्यांना एकाच वेळी पूर आला होता. यात Infrastructure चे अतोनात नुकसान झाले. हे चीनच्या सीमेला लागून असल्या मुळे भारताने सैनिकी सज्जतेच्या दृष्टीने येथे मोठमोठे रस्ते, पूल यांचे जाळे विणले होते आणि पुढील ५ वर्षात या सर्व लष्करी प्रयत्नांना आधुनिक आणि सुसज्ज करायचे होते. त्या कार्याला खूप मोठा तडा बसला. 
१००० कि.मी. अंतराचे रस्ते, १९० च्या वर लहान मोठे पूल, अनेक इमारती, लष्कराचे अनेक कॅम्प, पाहता पाहता वाहून गेले. 

केदारनाथ, बद्रीनाथ येथे इतर राज्याचे यात्री अडकले असल्यामुळे आणि प्रसिद्धी माध्यमांनी त्याचेच प्रसारण दाखविल्यामुळे बाकी चारही जिल्ह्यांत सुरुवातीला कोणतीच मदत पोहोचली नाही. सरकार, प्रसार माध्यमे आणि इतर सर्वांचं लक्ष केदारनाथवरच होतं. केदारनाथला प्रलय आल्यावर लागलीच १८ तारखेला काम सुरु झाले होते आणि २१ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे लष्कर, वायू सेना पूर्ण जोमाने कामालासुद्धा लागली. परंतु इतर ठिकाणी, जसे उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर, पिठोरागड या संपूर्ण जिल्ह्यांकडे ३० जूनपर्यंत दुर्लक्षच झालं. २ जुलैला केदारनाथ येथील मदतकार्य संपल्यावर मग इतर ठिकाणी काम सुरु झालं. तोपर्यंत तेथील जनता, स्थानिक प्रशासन व भारतीय सैन्याच्या मदतीवरच तग धरून राहिली होती. अनेक गावात रेशन पूर्णपणे संपुष्टात आले होते. मोबाइल टॉवर वाहून गेल्यामुळे फोन लागत नव्हते, बाहेर जातो म्हटले तर रस्ते, पूल वाहून गेले होते. परंतु या सर्वांवर फार उशिरा म्हणजे दुर्घटना घडून गेल्यानंतर १५ दिवसांनी लक्ष देण्यात आले. इतर ठिकाणी झालेल्या विध्वंसात जीवित हानी जरी जास्त नव्हती तरी बाकी नुकसान हे केदारनाथमधील नुकसानाच्या अनेक पटीने अधिक होते. धरचुला, मुन्सियारी, बागेश्वर मधील पिंडार, उत्तरकाशी या ठिकाणी लोक आपापल्या गावातच अडकले होते. धर्चुलाच्या पुढे कैलाश मानसरोवर यात्रेची पहिली तुकडी दर्शन घेऊन परत येत होती. तेव्हाच हे प्रलय आले. परतीचा रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे वाहून गेला. त्यावरील अनेक पूल वाहून गेले. रस्त्यात फसलेल्या या तुकडीला सुद्धा सैन्याचा मदतीने परत आणले गेले. 

या प्रलयात सैन्याने अतुलनीय अशी कामगिरी केली. १,१०,१०० लोकांना मृत्युच्या दाडेतून वाचविले. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची सुटका केल्याची जगात कमीच उदाहरणे आहेत. हे सर्व करताना काही जवान प्राणाला देखील मुकले. परंतु बचावकार्य त्यांनी बंद केले नाही. स्थानिक प्रशासनसुद्धा बऱ्याच तत्परतेने काम करू लागले. अनेक सामान्य लोक या प्रलयात नायक म्हणून उभारले. त्यांनी कसोटीच्या क्षणी दाखवलेल्या धीरामुळे कित्येक लोक बचावले. 

आज उत्तरखंडची अवस्था अतिशय कठीण झाली आहे. हे सर्व विध्वंस १६-१८ जूनच्या दरम्यान झाले होते. त्या वेळेस मान्सून नुकताच उत्तराखंडात दाखल झाला होता. त्या नंतर १०-१५ जुलै च्या दरम्यान परत पाऊस सुरु झाला. जे काही थोडे रस्ते, तात्पुरते पूल बनवले गेले होते ते परत वाहून गेले. ही स्थिती अगदी ऑगस्ट संपेपर्यंत कायम होती. हिमालय पर्वतरांग चुना पथर सारख्या friable rock पासून बनले आहे आणि ते अगदी कुमार अवस्थेत आहे. त्यामुळे ते लवकरच  तुटते किवा भूस्खलीत होऊन जाते. यामुळे पाऊस आला की पाणी आत मुरते आणि उन आले की हे पाणी प्रसरण पावते. त्यामुळे पहाडांचे थरच्या-थर ढिले होऊन भूस्खलित होतात. सोबतच बाष्पीभवन झाल्यावरही हीच प्रक्रिया होते. आताही अनेक ठिकाणी भूस्खलन सुरूच आहे. रोज नवे रस्ते बनायचे  आणि २-३ दिवसात ते भूस्खलन व्य्हायचे किंवा वाहून जायचे. याचा सर्वात मोठा फटका बसला तो सामान्य जनतेला. कारण रेशन, गॅस, केरोसीन, जळाऊ लाकूड, पशूंसाठी चारा हा दूरूनच आणावा  लागतो. कुणी आजारी पडले तर काहीच सोय नाही. सरकारी इमारती अगदी नावालाच . बऱ्याच ठिकाणी डॉक्टर नाही. मग कुणी आजारी पडलं तर हेलीकॉप्टर बोलवावा लागतो. नाहीतर गावातच काही उपाय करावा लागतो.

पर्वतरांगा असल्यामुळे समतल जमीन नाही. त्यामुळे शेती ही नावालाच. सर्व उत्पन्न हे केदारनाथ यात्रेकरूंना खेचर उपलब्ध करून देणं, हॉटेल, guide, transport वर अवलंबून होतं. आता लोकांकडे काहीच काम नाहीये. पूर्वी केदारनाथ दर्शनाच्या season मध्ये ५-६ महिने काम आणि बाकी आराम असं समीकरण ठरलेलं. परंतु आता यात्रेकरूच नाहीत तर अनेक अलिशान हॉटेल्स रिकामी पडलेली आहेत. अनेक गाड्या वाहून गेल्या, असंख्य खेचरे वाहून गेली, हॉटेल्स - इमारती तुटल्या. आता रोजगाराची संधीच उरली नाही. आत्ताचे काही महिने शासनाने व संस्थांनी दिलेल्या सामानावर निभावून जातील, पण पुढे ६ महिन्यांनंतर काय होईल याचा अंदाज बांधता येत नाहीये. मोठमोठे लोक आतापासूनच रस्ते खणण्याच्या कामावर जायला लागले आहेत. रोजगार हमीचे काम शोधू लागले आहेत. कारण हेच एकमेव काम शिल्लक राहिलं आहे. पुढील वर्षीपर्यंत जर पर्यटन सुरु झालं नाही किंवा कमी पर्यटक आले तर अनेकांना स्थलांतर केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

पर्यावरणाच्या दृष्टीनेही येथे बरेच वाद सुरु आहेत. भारत सरकारने उत्तराखंड, आसाम व अरुणाचल प्रदेश येथे मोठमोठ्या नद्यांवर अनेक जलविद्युत केंद्रे बांधली आहेत. त्यामुळे नद्यांच्या प्रवाहाला अनेक ठिकाणी आड बसलेला आहे. सोबतच पर्वत कापून नवीन रस्ते, बोगदे बनवणं सुरूच आहे. ज्या ज्या ठिकाणी पर्वत कापून रस्ते बनवले गेले, तेथे खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. जेथे आजिबात पर्वताला छेडले गेले नाही आणि त्यावरची नैसर्गिक vegetation तशीच होती तेथे आजिबातच भूस्खलन झालेले नाही. या प्रलयात अनेक जलविद्युत केंद्रे पूर्णपणे वाहून गेल्याने शासनाचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. पण यापासून धडा ना घेता शासनाने नवीन १३०० जल विद्युत केंद्रे उत्तराखंड, आसाम आणि अरुणाचल येथे घोषित केली आहेत. !!!!

आरोग्य शिबिरादरम्यान प्रियदर्श व सहकारी
मी स्वतः २७ जून ते १७ जुलै दरम्यान मानसरोवर रस्त्यावर पिठोरागड जिल्ह्यात आणि दि. २८ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान केदारनाथ रस्त्यावर रूद्रप्रयाग जिल्ह्यात मदतकार्यासाठी जाऊन आलो. तेथे मुख्य काम होतं लोकांची आरोग्यविषयक काळजी घेणे. बऱ्याच ठिकाणी एकटा पायी प्रवास करावा लागत होता. मिळेल तिथे जेवायचं आणि मिळेल तिथे झोपायाचं हा दंडक. पाठीवर लादलेली औषधांची bag जोपर्यंत रिकामी होत नाही तोपर्यंत पुढे पुढे जात राहायचं आणि मग परत औषधी घ्यायला परत यायचं. मी मैत्री, helpage india, BSF, GREF इ. सोबत या प्रसंगी काम केले. गावागावात आरोग्य शिबिरे भरवली. शासनाला याची माहिती पोचवत राहिलो. त्यामुळे त्यांना पुढचे काम आखणे सोपे गेले. डॉ. अनिकेत कांबळे, डॉ. चैतन्य पाटील, डॉ. बनेश जैन, डॉ. अजित रॉय यांनीही तेवढीच तोलामोलाची कामे सोबत सोबत केली. 

बऱ्याच घटना यादरम्यान घडल्या. एका नवीन प्रदेशाची ओळख झाली. अनेक प्रकारची माणसे भेटली. अनेक अनुभव घेतले. पण त्या बद्दल नंतर कधी तरी. 

उत्तराखंडला आताही मदतीची गरज आहेच. आपण अनेकजण आहोत. एकमेकांच्या सहाय्यानेच हे सर्व परत उभारता येईल. 

या प्रसंगी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आठवली :- 

नीड का निर्माण फ़िर फ़िर,
नेह का आव्हान फ़िर फ़िर|
यह उठी आँधी की नभ में
छा गया सहसा अँधेरा|
धूलि धूसर बादलों ने
भूमि को इस भाँती घेरा,
रात सा दिन हो गया
फिर रात आई और काली|
लग रहा था अब न होगा
इस निशा का फिर सवेरा|
रात के उत्पात भय से
भीत जन जन भीत कण कण,
किंतु प्राची से उषा की
मोहिनी मुस्कान फ़िर फ़िर|
नीड का निर्माण फ़िर फ़िर,
नेह का आव्हान फ़िर फ़िर|
क्रुद्ध नभ के वज्र दंतों में
उषा है मुसकराती,
घोर गर्जनमय गगन के
कंठ में खग पंक्ति गाती|
एक चिडिया चोंच में तिनका लिए
जो जा रही है,
वह सहज में ही पवन
उनचास को नीचा दिखा रही है|
नाश के दुःख से कभी
दबता नहीं निर्माण का सुख,
प्रलय की निस्तब्धता में
सृष्टि का नवगान फ़िर फ़िर|
नीड का निर्माण फ़िर फ़िर,
नेह का आव्हान फ़िर फ़िर|


डॉ. प्रियदर्श तुरे,  priyadarshture@gmail.com   

No comments:

Post a Comment