'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

सेंद्रीय शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे !

कुणी नांगरणी न करताही घनदाट जंगल उगवते. अशाच प्रकारे आपण नैसर्गिक शेतीदेखील करू शकलो तर आपली किती संसाधने वाचतील! रासायनिक शेतीच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्यामुळे सेंद्रीय शेतीचा विचार जोर धरत आहे. मात्र त्याहीपलीकडे आपल्याला नैसर्गिक शेतीकडे कसे जाता येईल? जपानी शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ फुकुओका यांनी विकसित केलेली नैसर्गिक शेतीची पद्धत काय आहे? नुकतेच नैसर्गिक शेतीचे प्रयोग करणाऱ्या भास्कर सावेंची निकेश इंगळे (निर्माण ४) याने भेट घेतली. त्याने काय पाहिले? वाचूयात त्याच्याच शब्दांत...
“कल्पवृक्ष, भास्कर सावे यांनी अतीव मेहनतीने व जिद्दीने सजवलेले, वाढवलेले शेत. नैसर्गिक शेतीचं एक उत्तम उदाहरण. नव्वद वर्षांचा हा असामी अजूनही मनानं तरुण आहे. गांधी बाबा आणि विनोबांच्या विचारांनी प्रेरित. जमीन ही जिवंत आहे. ती जगण्याचं साधन तर आहेच पण तिलाही जीव आहे. शेती हा धंदा नाही तो एक धर्म आहे, ह्या धर्माला भांडवल लागत नाही तर फक्त माती लागते (इति गांधी बाबा ). मातीत असलेले गांडूळ हेच सर्व शेतीचे काम करतात. शेतीसाठी नांगरणी, पाणी, खुरपणी व भुसभुशीतपणा लागतो. एका वर्षात एके एकरात ४ ते ५ लाख गांडुळे तयार होतात. ते मातीला भुसभुशीत बनवतात. त्यांच्या मातीखाली जाण्या-येण्याने जमीन आपोआप नांगरली जाते. त्यांच्या विष्ठेपासून खत मिळते. त्यांनी केलेल्या छिद्रांमुळे पाणी जास्त काळ टिकते. त्यांना अन्न म्हणून कचरा पसरवून ठेवल्यामुळे तण वाढतच नाहीत. अशा प्रकारे गांडूळ शेतीसाठी लागणारी सर्व महत्वाची कामे एकटाच पार पाडतो. रासायनिक खतांमुळे आणि धान्यामुळे शरीराचं आणि जमिनीचंही नुकसानच होतं. नैसर्गिक शेतीसाठी फक्त मेहनत आणि विश्वास लागतो, तसेच चांगले उत्पन्न येण्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो हे त्यांचे स्पष्ट मत. तिथल्या नारळाला ३५० ते ५०० नारळांचं उत्पन्न हमखास येतं, पण कुणीही नारळ तोडत नाही. ते आपोआप खाली पडतील तेव्हाच घेतले जातात. कोणत्याही झाडाला, प्राण्याला गरजेपेक्षा जास्त मागायचं नाही आणि घ्यायचंही नाही हा अलिखित नियम तिथे सर्व जण पाळतात. प्रत्येक झाडाला सरासरीपेक्षा ३-४ पट जास्त फळे बघून त्यांच्या मागच्या पन्नास वर्षांची मेहनत ‘फळास’ आली हे समजून जाते. आणि प्रत्येक झाड बघतांना त्यांच्या डोळ्यातला आनंद बघून नकळत आपण त्यांच्या जवानीला सलाम ठोकतो.”

स्त्रोत : निकेश इंगळे- inikesh009@gmail.com   

No comments:

Post a Comment