'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

अतुल गायकवाडचा कार्यनिश्चितीसाठीचा प्रवास


आपल्या आयुष्यभराच्या कामची दिशा ठरवताना अतुलला काय अनुभव आले, कुठे चूका झाल्या आणि त्यातून काय शिकायला मिळाले याबद्दल त्याच्याच शब्दात
वाचकहो नमस्कार! तुमच्याशी थोडं बोलण्याची प्रेमळ ऑर्डर मला संपादकाकडून मिळाली व मी ती निमूटपणे मान्य केली. त्यातूनच हा लेख निघाला. तो तुमच्यासमोर मांडतो आहे.
१ ऑक्टोबर २०१३ पासून मी ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात क्वेस्ट (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) या संस्थेसोबत काम करण्यासाठी सुरुवात केली. क्वेस्ट ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक व शासकीय यंत्रणा यांसोबत काम करते. संस्थेच्या विविध प्रकल्पांपैकी एक असलेल्या बालभवन या प्रकल्पाचे मी काम बघतो.
बालभवन हा प्राथमिक व माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी चालणारा शाळाबाह्य कार्यक्रम आहे. वाडा तालुक्यात १० बालभवनांद्वारे ३ आश्रमशाळेतील व ७ जि.प. शाळेतील मुलांसोबत काम चालते. प्रत्येक बालभवनासाठी एक प्रशिक्षित बालमित्र असतो. १ ते ४ वर्गातील मुलांसाठी भाषा साक्षरता, गणित व विज्ञान यांविषयांवर विशीष्ट शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने inputs दिले जातात तर ५ ते ७ वर्गातील भाषा व गणित विषयांत मागे असणाऱ्या मुलांसाठी remediation चा कार्यक्रम चालवला जातो.
शिक्षणशास्त्रात एखाद्या विद्यार्थ्याने दिलेला प्रश्न बरोबर सोडवला याला जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा थोडे अधिक महत्त्व 'ते सोडवताना त्याने काय रीत वापरली? त्याची चूक झाली असेल तर त्यामागे काय विचार होता? उत्तर बरोबर असेल तर त्याला ती संकल्पना नीट समजली आहे का?' अश्या (pedagogic) बारकाव्यांना आहे. म्हणूनच या काम क्षेत्रात करण्याचा विचार ते प्रत्यक्ष काम सुरु करणेअसा माझा एक शैक्षणिक प्रवास कसा झाला, आणि त्यातही, मी अमुक-अमुक ठिकाणी काम सुरु करण्याच्या निर्णयापर्यंत कसा जाऊन पोहोचलो? हे पाहणं देखील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरेल. 
आपल्यापैकी काही जणांना वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटतात. मला शिक्षणात काम करावंसं वाटणं हे त्यापैकीच आहे का? याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. त्यासाठी मी जवळपास एक वर्ष घेतलं.  एक वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे का? तर मला तो वाटत नाही. शिक्षण या माझ्यासाठी अगदीच नवख्या असलेल्या क्षेत्रासाठी तर नाहीच नाही. बऱ्याचदा 'शिकवणं म्हणजे काय कुणालाही जमेल अशी गोष्ट आहे आणि त्यातच बालशिक्षण तर काय सोप्पच आहे!' असा आपला समज आपल्याही नकळत झालेला असतो. मी करतो ती गोष्ट मला जमत नाहीये किंवा आवडत नाहीये त्यामुळे 'शिक्षणात काम करणे' ही मी निवडलेली सोपी पळवाट तर नाही ना? हा विचार करणे फ़ार महत्त्वाचे होते.
माझ्यासाठी पुढे काय करावं? शिक्षणात काम करावं? हा गोंधळ नेहमीचाच झाला होता. पुढचा मार्ग निवडताना स्वभाव-स्वधर्म-युगधर्म याचा वापर करून गोंधळ दूर करुया म्हटलं तर तो अजूनच वाढायचा. त्याकाळात सर्चमध्ये लहानमुलांच्यासोबत पोषण या विषयावर सुरु असलेल्या एका अभ्यासात मी भाग घेतला. या अभ्यासादरम्यान मला माझा स्वभाव कळण्यात मदत झाली. पण माझे मुलांशी सहज बनणारे नाते' ही एकच गोष्ट 'शिक्षणात काम करावे' हा मोठा निर्णय घेण्यासाठी पुरेशी आहे का? सर्वच पातळींवर माझा आपुलाची वाद आपणासी' सुरू होता.
मुलांची मानसिकता हा नवखा विषय वाचनातून माझ्या समोर आला आणि मला माझ्याबद्दलची नविनच गोष्ट कळाली.  मी माझ्या शिक्षणादरम्यान शाळा नावाच्या प्रकाराला कायम दूर ठेवत आलो होतो. मला शाळेत ज्या पद्धतीने शिकवलं जात होतं ते आनंददायी तर नव्हतंच. याव्यतिरीक्त त्यात माझ्या शिकण्याच्या गतिचा अंतर्भावही नव्हता. त्यामूळे शाळेचा मला त्रास न होऊ देता मी स्वशिक्षणाची पद्धत नकळतपणे विकसीत केली होती.  शिक्षणात बदल असावे व त्यासाठी आपण काहीतरी करावे या भावनेच्या मुळाशी कुठेतरी औपचारिक शिक्षणाचा हा माझा अनुभव नक्कीच आहे.
एकदा, मी सर्चमधे एका मुलीची गणिताच्या मुलभूत संकल्पनेवर मुलाखत घेतली. ही मुलाखत माझा कामाबाबत निर्धार होण्यासाठी tipping point ठरली. असरचा अहवाल वाचून शिक्षणाची दुरावस्था माहित होती. पण, साक्षात्कार होण्यासाठी प्रत्यक्ष दर्शनच व्हावं लागतं! विद्यार्थ्यावर शिक्षणातील सर्व प्रचलीत उणीवांमूळे होणारा अन्याय, विद्यार्थ्याची यासंबंधीची अनभिज्ञता आणि पर्यायाने बनलेली मानसिकता एका मुलीमुळे मला समजली.
To see a World in a grain of sand....गांधींनी सुचविलेला तलिस्मान मला तिच्यात मिळाला.
साधारणपणे पुढचा एक वर्ष शिक्षण विषयाशी नाळ जोडण्याचा मी थोडा-फ़ार प्रयत्न केला. स्वतःची व सोबतच घरच्यांची मनाची तयारी होणं या काळात झालं. काय करायचं? याची थोडीफ़ार कल्पना आली व मी सर्चमधील जबाबदारीतून मुक्त झालो. आपलंच घर सोडून जाताना खूप त्रास झाला! पण त्याला पर्याय नव्हता.
शिक्षणात काम करायचं तर आधीच या विषयात ज्यांनी काम केलं आहे त्यांना भेटणं व त्यांच्या संचिताचा आपल्या निर्णयप्रक्रियेत उपयोग करून घेणं हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. एखाद्या प्रायोगिक शाळेसोबत काम करावं की उपलब्ध शासकीय यंत्रणेच्या सोबत काम करावं, जालन्यात (माझ्या गावी) काम करावं की काम निवडण्यासाठी जागेचा निकष लावूच नये, पूर्ण वेळ काम करावं की अर्थर्जनाची दुसरी काही सोय करून उरलेल्या वेळात हे काम करावं अशा प्रत्येक प्रश्नावर विचार करताना चांगलाच कस निघाला. सोबतच मी काही चुका देखील केल्या आणि त्या देखील समजून घ्यायला हव्या.
मी जालन्यातील एका चांगल्या शाळेसोबत काम करण्याचं ठरवलं. सोबतच संध्याकाळी पॉलिटेक्निकच्या मुलांच्या ट्युशन्स घेणे असा महत्वकांक्षी विचार देखील केला. विशेष म्हणजे ट्युशन्स घेणे हे मला तत्वतः पटत नव्हते. तरीसुद्धा मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा प्रत्यक्ष काय काम करायचं? याचं नियोजन करण्याची वेळ आली तेव्हा कागदावर काहीच मांडता येईना. जालन्यात काम करण्यामागे काही वैयक्तिक कारणं तर होतीच पण त्यासोबतच आपण स्वतःच्या बळावर काम करू शकू आणि शिकवणं म्हणजे काय कॉमन सेन्सच आहे असा अव्यवहारिक समज देखील होता.
कुठल्याही कामासाठी काही कौशल्य लागतात आणि ती मिळवण्यासाठी साधनेला पर्याय नाही हे कुणीतरी कानाखाली खाडकन् चपराक देऊन सांगितल्यासारखं मला वाटलं. या सर्व अनुभवातूनच मी नायनांनी सांगितल्याप्रमाणे Values, Goals, Rules, Roles आणि Personalities यांचा विचार करून शिक्षणात काम करणाऱ्या क्वेस्ट या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
ह्या पूर्ण प्रवासात घरच्यांचा सहभाग असणे हा कळीचा मुद्दा होता. जसा माझा शैक्षणिक प्रवास सुरु होता तसा त्यांचाही तो सुरु होताच आणि शिक्षणात प्रत्येकाला आप-आपल्या गतिने शिकण्याची मुभा असायलाच हवी.  धीर न सुटू देता घरच्यांना वेळ दिला व योग्य ठिकाणी त्यांच्या अनुभवाचा वापर केला तर त्यांचंही गणित सुटतं नी आपलही!

स्रोत : अतुल गायकवाड, atuldd99@gmail.com

No comments:

Post a Comment