'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

कचरा व्यवस्थापनाच्या तुघलकी कारभाराला स्थानिक उत्तर

घराघरांतून सर्व कचरा एकत्र करून डेपोमध्ये न्यायचा आणि तिकडे पुन्हा ओला-सुका कचरा वेगळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करायचे असा तुघलकी कारभार महापालिकेला करावा लागतो. हे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर काही प्रमाणात तुम्हा-आम्हाला करता येईल का? गेल्या एप्रिलपासून यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करतेय मधुरा समुद्र (निर्माण ५).
मधुरा आणि तिची मैत्रीण सोनाली त्यांच्या गल्लीतल्या १८ कुटुंबांना सोबत घेऊन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचा खटाटोप करत आहेत. या दोघींनी १८ कुटुंबातून वर्गणी गोळा करून प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा (मुख्यतः स्वयंपाकघरातील व बागेतील) वेगळा काढण्यासाठी कचरापेटी दिली आहे. हा कचरा वर्गणीतूनच घेतलेल्या २०० लिटरच्या प्लास्टिक टाकीत जमा केला जातो. बागेत ठेवलेल्या या टाकीत ही कुटुंबे आपापला कचरा जमा करतात. त्यांच्याकडून राहून गेल्यास हे काम मधुरा व सोनाली करतात. दिवसाखेर या दोघी टाकीतील ओला कचरा झाकण्यासाठी त्यावर सुकी पाने टाकतात. साधारण १२ दिवसांत ही टाकी भरते. पुढचे १० दिवस खत बनेपर्यंत कचरा टाकीत न टाकता महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाकडे दिला जातो. खत बनल्यावर ते रोपवाटिकेला दिले जाते.
या कामात मधुराला कोणकोणत्या अडचणी आल्या? महापालिका सर्व कचरा गोळा करत असताना ओला कचरा आपण वेगळा काढून ठेवण्याची गरज लोकांना पटवून द्यावी लागली. लोकांशी हा संवाद साधणे हे खूप आव्हानात्मक काम होते. गरज पटल्यावर वर्गणी गोळा करण्यासाठी संवादाची आणखी एक फेरी करणे त्याहूनही कठीण होते. सुरुवातीला लाकडाच्या टाकीत कचरा जमा केला जात असे. मात्र पावसाळ्यात या पेट्या कुजून जावू लागल्या. त्यामुळे प्लास्टिक टाकी वापरणे भाग पडले. गल्लीतल्या एक आजी आजारी पडल्यावर त्यांनी कचऱ्याच्या वासामुळे आजारी पडल्याचा निष्कर्ष काढला, त्यामुळे गेला एक महिना कचरा गोळा करणे बंद आहे. मात्र टाकीसाठी वेगळी जागा शोधून हा प्रयोग सुरू ठेवण्याचे मधुराने ठरवले आहे.


या प्रयोगातून खत तर मिळतेच, पण लोकांच्या मानसिकतेत काही फरक पडला का? या १८ कुटुंबांनी फटाकेविरहीत दिवाळी साजरी केली. तसेच ही कुटुंबे अन्य गल्ल्यांमध्ये हा प्रयोग करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असल्याचे मधुरा सांगते. मधुराला या प्रयोगासाठी शुभेच्छा!

स्त्रोत : मधुरा समुद्र, madhura.samudra@gmail.com

No comments:

Post a Comment