'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 January 2014

‘वर्धिष्णू’तर्फे असंघटीत कामगारांच्या मुलांसाठी सायं-शाळा सुरु

वर्धिष्णू- सोशल रिसर्च & सोसायटीने सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या सर्वेक्षणात कचरा वेचून आयुष्य जगणाऱ्या एकूण ३९६ लोकांना माहिती विचारण्यात आली. ३९६ पैकी ११६ चौदा वर्षांखालील मुले होती. यातील ८५ % हून अधिक मुले शाळेत कधी गेलीच नव्हती, अथवा १ली-२री शिकून त्यांनी शाळा सोडली होती. याचमुळे वर्धिष्णूने जळगावमधील तांबापुरा या कचरावेचकांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या भागात अशा मुलांसह वस्तीतील इतरही शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी सायंशाळा सुरु केली आहे. या शाळेकरिता अद्वैत दंडवते (निर्माण ४), सागर महाजन, समीर तडवी, समाधान पवार आणि सचिन खैरनार काम करत आहेत.
आज शाळेत ३५ मुले येत आहेत. सर्वच मुले असंघटीत कामगारांची असून त्यांना मुलांना अक्षर आणि अंक ओळख करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र हे करतानाच स्वच्छतेचे महत्व पटवून देणे व मूल्य शिक्षण यावर भर देण्यात येतो आहे. दररोज संध्याकाळी दीड तास तांबापुरा परिसरातील मरिमाता मंदिराच्या अंगणात शाळा भरते. पहिल्या टप्प्यामध्ये तांबापुरा/छोटी भिलाटी भागात हा प्रयोग राबवण्यात येईल व तेथील अनुभवावरून शहरातील इतर भागांमध्ये सायं-शाळा सुरु करण्याबद्दल विचार केला जाईल.
 शाळेबद्दल बोलताना अद्वैत म्हणाला, “या मुलांमध्ये खूप potential आहे, मात्र केवळ exposure नसल्यामुळे ती मागे पडतात असे मला वाटते. त्यांना शिकवलेले ते लगेच लक्षात ठेवतात. उदा. ‘रोज हात-पाय धुतले पाहिजेत, स्वच्छता महत्वाची असते. बाहेरून आल्यावर हात-पाय धुवायचे.’ असे एकदाच सांगितल्यावरही मुले रोज येताना हात-पाय धुवून यायला लागली. मात्र ‘आपल्याला काही येत नाही’ असा न्यूनगंड त्यांच्यात असल्याचे लक्षात येते. यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा असे मला वाटते. 
मात्र ही शाळा चालवून समातर यंत्रणा उभारण्यावर माझा विश्वास नाही. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात आम्ही या परिसरातील महानगरपालिकेची शाळा दत्तक घेवून पुढील वर्ष त्याच्यासोबत काम करण्याचा दृष्टीने पाऊले टाकत आहोत.”

स्त्रोत : अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a comment