'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

पारधी मुलांसाठी संस्कार संजीवनी


पारधी ही जंगलात राहणारी एक भटकी मागासवर्गीय जमात. सततची भटकंती हा जंगलातील उत्पादनांवर (जसे की मध, डिंक) आणि शिकारीवर गुजराण करणाऱ्या या लोकांच्या जीवनाचे एक महत्वाचे अंग आहे. त्यामुळेच हे लोक एके ठिकाणी स्थायिक होत नाहीत. अशातच शहरा-गावांमध्ये होणाऱ्या चोऱ्यामाऱ्यांसाठी यांनाच हकनाक आरोपी केले जाते. त्यामुळे अशा काहीही न केलेल्या गुन्ह्यांची सजा कितीतरी पारधी पुरुष भोगतात. अशा परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब, विशेषतः मुलेबाळे उघड्यावर पडतात. त्यांचे शिक्षण नीट होत नाही आणि ती या गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकतात.
यावर उपाय म्हणून या पारधी समाजातील मुलांसाठी श्री. परमेश्वर काळे यांनी संस्कार संजीवनी नावाचा आश्रम सुरु केला. सोलापूर हैद्राबाद रोडवर असलेल्या या आश्रमाबद्दल मृण्मयी मोरे (निर्माण ५) आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना सोलापूर गटाच्या एका मीटिंगदरम्यान समजले. आश्रमाला भेट दिल्यावर या मुलांची अन्न-वस्त्र-निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठी होणारी परवड, तसेच त्या मुलांच्या आणि इतर सामान्य मुलांच्या राहणीतले अंतर पाहून या मुलांसाठी काहीतरी करावे असे मृण्मयी आणि सहकाऱ्यांनी ठरवले.
चिमुकल्यांसोबत मृण्मयी मोरे
यातूनच त्यांनी दर रविवारी आश्रमातील मुलांना शिकवायला, अभ्यासात मदत करायला सुरवात केली. याचबरोबर त्यांच्या जेवण, औषधे, पाणी यासारख्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्याच्या कामातही या गटाने हातभार लावला.
या कामाबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली, “या मुलांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी निधी गोळा करण्याचे काम खूप काही शिकवून गेले. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. आणि सुरवातीला मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी प्रत्यक्ष मदतीच्या वेळेस माघार घेतली. एप्रिल-मे महिन्याच्या या दिवसांत दररोज नवीन लोकांना भेटून, या कामाचे महत्त्व पटवून देवून पैसे गोळा आले. आणि हो-नाही म्हणता म्हणता पुरेशी रक्कम जमा झाली. मुलांना मिळालेला हा आसरा जणू काही आमच्यासाठीही होता असे सर्वांनाच वाटले.
कुठल्याही शासकीय अनुदानाविना, इतर आर्थिक पाठबळाविना उभ्या असलेल्या या कामात अजूनही कितीतरी अडचणी आहेत. त्यांच्या गरजा खूप साऱ्या आहे. त्यामुळेच यापुढेही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा सर्वांचा निर्धार आहे.”
या कामात काहीही योगदान करणे शक्य असणाऱ्या प्रत्येक मदतीच्या हाताची या मुलांना गरज आहे..

स्रोत: मृण्मयी मोरे, mrunmaiangel13@gmail.com

No comments:

Post a comment