'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

धरणे

जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून या हिवाळी अधिवेशनात अंनिस ने धरणे आंदोलन केले. यात सहभागी झालेल्या उमेश जाधवचे (निर्माण ५) अनुभव कसे होते? त्याच्याच शब्दांत...

दरवर्षी हिवाळ्यात मुंबईतलं सरकार नागपूरला अधिवेशनासाठी येतं. मंत्रिमंडळाने येथे येवून इथल्या प्रश्नांवर, समस्यांवर जनकल्यानाचे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा असते. सरकार यावर्षी तरी आपलं गाऱ्हाणं ऐकून प्रश्न सोडवे या भोळ्या आशेने दरवर्षी तमाम महाराष्ट्रातून सगळे लोक आपापल्या मागण्या घेवून विधानसभेवर मोर्चा नेतात, धरणे आंदोलन-संप करतात. इतकी वर्षे ह्या सगळ्या बातम्या TV न् पेपरात पाहत होतो. गेल्या वर्षी निर्माणमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी साठी आलेल्या महिलांच्या प्रचंड जोमदार मोर्च्यात सहभागी व्हायला मिळाले. मोर्चा काय असतो याची एक झलक मिळाली. मधे वर्ष गेलं, पुन्हा थंडी आली, परत अधिवेशन आलं. यावर्षी अंनिस विविध सामाजिक संस्था विधिमंडळाच्या सदस्यांनी जादूटोणा विरोधी कायदा केलाच पाहिजे, तसेच ‘डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे या मागणीसाठी १० डिसेंबर २०१३ रोजी धरणे बांधून मोर्चा नेत आहेत असं नंदा काकांकडून कळलं. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर निषेध सभेत गेलो होतो. सरकारविरोधी, प्रतिगाम्यांच्या विरोधी घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे ह्या मोर्चात जावं असं मनापासून वाटलं.
ठरलं, नागपूर गटाच्या मित्रांना घेवून मोर्चास्थळ गाठलं. धरण्यासाठी सरकारने दिलेल्या जागेवर जाताच धक्का बसला. ही जागा विधानसभेपासून किमान २ किमी अंतरावर होती. आमदारांना जनतेच्या आवाजाचा त्रास नको म्हणूनच प्रशासनाला अशी क्लृप्ती सुचली असणार. बसायला एका मैदानावर कापड घालून दिले होते. नागपूरच्या थंडीत हे लोकं इथेच कसे झोपणार हा मला पडलेला पहिला सात्विक प्रश्न !! प्यायचे पाणी दूरदूर पर्यंत नव्हते. सगळीकडे नुसते पोलिसच पोलीस दिसत होते. तसे पाहता सगळा माहोल अहिंसक असतांना एवढ्या फौज-फाट्या ची गरज काय? माझा दुसरा प्रश्न
असो, धरण्यात सगळ्याच कार्यकर्त्यांचा उत्साह अन् त्यांची र्जा कमालीची होती. मला अंनिसची पुसटशी माहिती (पेपरमधून) होती, पण डॉक्टरांबद्दल त्यांच्या हत्येनंतरच कळाले होते. त्यांच्या पुस्तकातून, त्यादिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे काम समजले. त्यांचा विज्ञाननिष्ठ विवेकवादी विचार समजायला सुरुवात झाली. धरण्यात याच विचारांच्या जनजागृतीसाठी मुंबईच्या विध्यार्थी भारती या युवा गटाच्या पथनाट्याचे प्रयोग नागपूरभर झाले. इथले, म्हणून आम्ही पण सामील झालो. त्यांच्याकडून दिवसभरात भरपूर काही शिकायला मिळाले. लोकांचे समज गैरसमज समजून त्यातून आपला विचार त्यांना कसा पटवून द्यायचा हे त्यांनी त्यांच्या कलेतून सहजरित्या दाखवलं. लोकांचा प्रतिसाद संमिश्र होता, पण तरी कार्यकर्त्यांच्या उर्जेला कमी नव्हती. अंनिसच्या ह्या मोर्च्यात सामील झालो ह्याचे आम्हाला समाधान झाले. अंनिसच्या राज्यभराच्या कामाची माहिती कळाली. नवीन माणसं भेटली. मित्र झाले.
पथनाट्याद्वारे जनजागृती करताना अंनिसचे कार्यकर्ते

त्यादिवशी आम्ही दुसरेही अनेक मोर्चे पाहिले. ग्रामीण भागाचे प्रश्न समजून घ्यायचे म्हटले की गावात जाऊन रहायला हवं, शहरी समस्या समजण्यासाठी झोपडपट्टीत जायला हवं असेही म्हणतात. त्यादिवशीच्या मोर्च्यात राज्याच्या तमाम लोकांतून, सगळ्या थरांतून, प्रत्येक वर्गाची माणसं आपापले प्रश्न घेवून आलेले पाहून मला वाटलं, एकूणच समाजाच्या आकलनासाठी एकदातरी आपण मोर्चात जायला हवे. हा घटक आपल्या आजूबाजूच्या समाजात आहे अन त्यालाही काही आडचणी आहेत, मागण्या आहेत असे धक्के मला दोनतीनदा बसले. आपण आपल्या जगात इतके रमून जातो की आपल्यापैकीच कुणाचे तरी काही अडले आहे हे पण आपल्याला कळत नाही हे प्रकर्षाने समजले. त्यादिवशी एकंदरीतच समाजा थोडा डोळे उघडून वावरायचे असे ठरविले.
इथेच आपल्या खास लोकशाहीचेरे दर्शन झाले. तिथे जमलेले लोक आपल्याच सेवकांना काहीतरी आदेश द्यायला आल्यासारखे मुळीच वाटले नाहीत. आपली व्यवस्था इतकी आदर्श लोकशाहीवादी असेल अशी आमचीही गोड-गुलाबी समज नव्हती. परंतु काही मागण्या ज्या वर्षानुवर्षे चालतच आहेत, मोर्चे होताहेत, उपोषण करून माणसं मेलीयेत, थंडीत कुडकुडून धरणे बांधू-बांधू जनता कांटाळून गेली तरीही गेंड्याच्या कातडीवाल्या आमच्या सो called जनसेवकांना त्यांची काहीही कदर नवती, काही घेणंदेणं नव्हतं. साधी त्यांना भेटून, त्यांचे ऐकून, निवेदन घ्यायची तसदीही कुणी घेत नवते. मग आश्वासन आणि त्यांची पूर्तता हा तर दुसरा विषय राहिला.
सरकारी परिचारिकांच्या एका धरण्याजवळून आम्ही जात होतो. त्यांनी आशेने आम्हाला निवेदन दिलं. मी म्हणालो आम्ही काय करू? आम्ही तर सरकार नाही आहोत. त्या बाई काही बोलल्या नाहीत. त्यांच्या नजरेतून मी कशीबशी सुटका करून पुढे गेलो. पुढे अधिवेशनात जादूटोणाविरोधी कायदा पास झाला.डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळेलच कधीतरी. पण त्यादिवशी नंतर जेंव्हा जेंव्हा सरकार हा शब्द ऐकतो, मला त्या बाई अन् त्यांचे डोळे आठवतात. आम्ही तर सरकार नाही?” ह्या माझ्या शब्दांची मलाच लाज वाटू लागलीये. लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे सरकार अशी लोकशाहीची परिभाषा सांगणाऱ्या अन् तसे मानणाऱ्यांची जाहीर माफी मागतो.
उमेश जाधव, jadhavumesh007@gmail.com  

No comments:

Post a comment