'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 January 2014

स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म शोधताना . .

नुकतीच निर्माण ५ च्या अवैद्यकीय मुलांची शिबीरमालिका पूर्ण झाली. ५.३ अ शिबिराचा वृत्तांत शिबिरात सहभागी झालेल्या अमृता ढगेच्या शब्दांत...
“२९ डिसेंबर, २०१३ ते ६ जानेवारी, २०१४ ह्या काळात निर्माण ५ चे तिसरे शिबीर (निर्माण ५.३ अवैद्यकीय बॅचचे शेवटचे शिबीर) यशस्वीरित्या पार पडले. शिबिराची सुरुवात अर्थातच शिबिरार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यातील उपक्रम व त्यातून झालेले शिक्षण शेअर करण्यापासून पासून झाली. मुला-मुलींच्या कामातल्या विषयांमधली विविधता आणि कामाच्या पद्धतींमध्ये असलेल्या फ़रकांमुळे हे सेशन खूप रंगत गेलं.
पहिल्या दिवशीच्या सत्रांची सुरवात ‘जोडीदार कसा निवडावा आणि लग्न’ या गंभीर आणि अति महत्वाच्या सत्राने झाली. सर्वांनीच हिरीरीने सहभाग घेतलेल्या या चर्चासत्रात अनेकांना जोडीदार कसा असावा (आणि काहींना जोडीदार ‘कोण’ असावा) याची स्पष्टता झाली. यानंतर विठ्ठल साळवे आणि अमृत बंग ह्यांनी ‘दरवर्षी सरकारी महाविद्यालयांतून पुरेसे डॉक्टर्स बाहेर पडत असतानाही सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या जागा रिक्त कशा’ हा प्रश्न सोडवताना आलेले RTI संदर्भातील त्यांचा अनुभव आणि त्यातले खाचखळगे समजावून सांगितले. सत्राच्या शेवटी प्रत्येकाने एक RTI लिहून पहिला आणि आपणही RTI भरू शकतो याची सर्वांना खात्री पटली.
दुसऱ्या दिवसापासून झालेल्या सत्रातून आनंद बंग, मकरंद सहस्रबुद्धे, नंदा काका (नंदा खरे), श्रीनिवास खांदेवाले, संजय पाटिल, आणि देवाजी तोफ़ा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजित कुमार ह्यांकडून त्यांचे अनुभव व अभ्यासाचे भांडार सर्वांसाठी खुले केले. या सत्रांमधून तसेच या सर्व वरिष्ठांशी झालेल्या गप्पांमधून, प्रश्नोत्तरांमधून खूप शिकायला मिळालं आणि कामाबद्दलचा दृष्टिकोन, समज, हुरुप वाढत गेला.
दरम्यान शिबिरार्थ्यांमध्ये ‘स्त्रियांवरील अत्याचारास स्त्रियाच जबाबदार आहेत का?’, ‘आजचे शिक्षण विद्यार्थ्याला वस्तवापसून दूर नेऊन एकाकी बनवते का?’ आणि ‘भारताचे पुढचे पंतप्रधान कोण असावे – राहुल गांधी, नरेंद्र मोदी का अरविंद केजरीवाल?’ अशा वाद-विवाद चर्चा आयोजिल्या होती. या ज्वालाग्राही विषयांवरील चर्चादेखील अतिशय ज्वलंत होती आणि याचबरोबर या विषयांतील विविध कंगोरे समोर आणणारी होती.
Inside Job (अमेरिकेतल्या रिसेशन वर भाष्य करणारी) ही डोक्युमेन्टरी फ़िल्म, जंगल वॉक, सांस्कृतिक कार्यक्रम ह्या सगळ्यामुळे धमाल पण तेवढीच आली. सुलभा ताई व सुनील काका ह्यांच्या सानिध्यात चर्चा छान रंगल्या. मॅस्लोज थेअरी व नायनांनी घेतलेलं स्वभाव-स्वधर्म-युगधर्माचं सेशन खूप अंतर्मूख करणारं होतं.

एवढ्या सगळ्या धमाल मस्ती आणि एकत्र शिकण्यातल्या मजेनंतर शेवटच्या दिवशी एकमेकांचा निरोप घेणं सर्वांनाच जड गेलं. आणि नेहमी टच मध्ये राहण्याच्या आणि एकमेकांच्या गावी येण्याच्या आणा-भाका देत शिबिरार्थी आपापल्या दिशांना पांगले...”

No comments:

Post a comment