'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 January 2014

संपादकीय

निर्माण परिवारासाठी यावेळी अतिशय आनंदाची बातमी आहे. आपले मित्र सजल कुलकर्णीडॉ. प्रियदर्श तुरे यांना हुंडाविरोधी चळवळीमार्फत युवा वैज्ञानिक व साने गुरुजी युवा पुरस्कार मिळाला आहे. दोघांच्या कामाची पद्धत वरकरणी वेगवेगळी वाटली तरी परस्परपूरक आहे. पूर्व विदर्भातील गायी, त्यांची वैशिष्ट्ये व तेथील समाजात असणारे त्यांचे सांस्कृतिक स्थान हा विषय केंद्रस्थानी ठेवून गेली काही वर्षे सजल काटेकोरपणे संशोधनाचे काम करत आहे. याउलट प्रियदर्श हा पेशाने डॉक्टर असला तरी वैद्यकीय सेवा हा एकमेव फोकस न ठेवता मेळघाटातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान असावे यासाठी तो धडपडत आहे. त्यांच्या कामाला हळुहळू मान्यता मिळत असली तरी त्याआधी त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ झोकून देऊन काम केले आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
सजलचे जसे गायींवर संशोधन, तसेच सुवर्णा खडक्कारचे महाराष्ट्रात (विशेषता विदर्भात) पिकांवर पडणाऱ्या कीडीवर संशोधन. तिचेही तीन शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. यासोबतच प्रियदर्श तुरे आणि अद्वैत दंडवते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मेळघाट व जळगाव येथे शाळा सुरू केल्या आहेत, एक आदिवासी मुलांसाठी तर दुसरी असंघटीत कामगारांच्या मुलांसाठी.
या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लिहा... लिहा...’ असे मागे लागावे न लागता मुलांनी इतके भरभरून लिहून दिले की काही बातम्या पुढच्या अंकात ढकलाव्या लागल्या. लिहिताना एक पथ्य पाळावे लागते. केवळ बाह्य घटना वाचकाच्या मनाची पकड घेऊ शकत नाहीत. लिहिणाऱ्याच्या मनात काय तरंग उमटले, त्याची काय वाढ झाली यात वाचकाला रस असतो. मात्र संदर्भाविना केवळ मनातले विचार लिहिले तर ते वास्तववादी वाटत नाहीत. बाह्य घटना व मनातले तरंग यांत समतोल साधण्याची तारेवरची कसरत मुलांनी चांगलीच केली आहे.
आपल्या कृतीतून आपले शिक्षण होते असे आपण निर्माणमध्ये मानतो. मात्र आता हळुहळू अशी वेळ येत आहे की आपल्या शिक्षणासाठी केवळ स्वतःच्याच कृतीवर अवलंबून रहायची गरज नाही. कामाच्या विषयांनुसार मुले एकत्र येत असून वैयक्तिक व सामूहिक कृती आणि त्यायोगे होणारे संपूर्ण गटाचे शिक्षण यांच्या सहाय्याने सामाजिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वेगाने पावले पडत आहेत. कोरडवाहू गटाची प्रेरणादायी वाटचाल आपण पाहतच आहोत. ‘व्यसनमुक्ती’ या महत्त्वाच्या विषयावर विविध अंगाने काम करणाऱ्या मुलांचे critical mass होऊ घातले आहे. धान्यापासून दारू निर्मितीविरुद्ध झालेल्या आंदोलनात आपल्यापैकी  अनेक जण सहभागी झाले होते. आपण signature / post card campaign, पथनाट्य, साखळी उपोषण, RTI च्या माध्यमातून समस्येचा अभ्यास, PIL अशा अनेक मार्गांचा वापर केला होता. सायली व सनत यांनी तर त्यांच्या आगळ्यावेगळ्या लग्नात चक्क धान्यापासून दारूनिर्मितीविरुद्ध मोर्चा काढला होता. याशिवाय सलग २ वर्षे चंद्रपूरच्यादारूबंदीसाठी हिवाळी अधिवेशनात नागपूरला येणाऱ्या महिलांच्या मोर्चात अनेक जण सहभागी झाले आहेत. आपापल्या भागात ग्रामीण, शहरी (मध्यमवर्ग) व शहरी (झोपडपट्टी) लोकसंख्येत तंबाखू सेवनावर किती खर्च होतो याचा सर्व्हेदेखील अनेक निर्माणींनी केला होता. निर्माणच्या शिबिरांमध्ये दारू व तंबाखूबद्दल सत्रे व चर्चासत्रे होत असतात. वैयक्तिक पातळीवरदेखील ही समस्या आपापल्या परीने सोडवण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. संतोष व जयश्री यांना ठाणेदारांच्या मदतीने ३२ हातभट्ट्या बंद पाडण्यात यश आले. तसेच महिलांना संघटित करून मतदानाद्वारे शासनमान्य देशी दारूचे दुकानही ते बंद पाडू शकले. RTI चे हत्यार वापरून सचिन महालेला जळगावमधील दारूच्या जाहिरातींचे फलक हटवण्यात यश आले. अमोल लगाडने बीड जिल्ह्यातील त्याच्या गावात तंबाखू व गुटख्याच्या पुड्यांची होळी केली. संघर्षासोबत व्यसनमुक्तीच्या दलदलीत पाय टाकण्याचे साहस अनेकांनी, विशेषतः मुलींनी दाखवले. मृण्मयी अग्निहोत्रीने ‘मुकांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील स्त्रियांसाठीचा खास विभाग ‘निशिगंध’ व ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात काम केले. श्रेया अयाचितने ‘संतुलन’ व्यसनमुक्ती केंद्रात काम केले. समीक्षा मुरकुटेने ‘साहस’ व्यसनमुक्ती केंद्रात आरोग्यशिक्षण केले. पुण्याच्या गटाने ‘मुक्तांगण’ला भेट दिली. मयूर दुधेसौरभसोनावणेला आपल्या मित्रांचे व्यसन सोडवण्यात काही प्रमाणात यश आले. वैभव आगवणेने दारूची समस्या कशी सोडवता येऊ शकते याबद्दल शास्त्रीय निबंधाचा अभ्यास करून आपल्याला सीमोल्लंघनद्वारे सोप्या पद्धतीने माहिती दिली. याच विषयात तज्ञ असणाऱ्या धरव शहाने गुगल ग्रुपवर याविषयी वेळोवेळी शास्त्रीय माहिती दिली. यादरम्यान काहींनी याविषयावर वाचन केले, नाटके पाहिली. आपल्या जागी केलेल्या स्थानिक कृतीला मोठ्या चित्रात महत्त्वाचे स्थान आहे. या चित्राचा ढोबळ आराखडा बनत आहे. त्यात आणखी खूप रंग भरता येण्यासारखे आहेत. गरज आहे ती हे आणि याहीपेक्षा मोठे निर्माणबाहेरील चित्रदेखील पाहता येण्याची. दारू-तंबाखूत गुंतलेले मोठ्या लोकांचे हितसंबंध, त्यांच्या आहारी गेलेल्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक समस्या अशी कठीण आव्हाने निर्माणचे तिशीच्या आतले तरुण स्वीकारत आहेत. स्वयंप्रेरित कोरडवाहू गटाप्रमाणेच ‘कोरड्याकडे वाहून नेणारा’ हाही अभ्यासू गट बनू शकेल काय?

निखिल, josnikhil@gmail.com

No comments:

Post a comment