'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 25 January 2014

कर के सीखो !

व्यसनमुक्तीच्या कामातील अनुभव सांगतेय निर्माण ५ ची मृण्मयी अग्निहोत्री

“निर्माण ५.१ मधून निघाल्यानंतर मनात एक गोष्ट पक्की झाली होती की कुठल्याही समस्येवर काम करायला सुरुवात करण्याआधी त्याचा भरपूर अभ्यास झाला पाहिजे; त्यामुळे पुढच्या शिबिराच्या आधीपर्यंत भरपूर पुस्तक वाचली पण कृती  शून्य....... !!!
पण निर्माण ५.२  ला सगळ्यांशी भेट झाली आणि लक्षात आल की, आपण पुस्तक वाचनातून जेवढं शिकलो त्यापेक्षा अधिक लोक कृतीतून शिकले होते. नयनांच्या बोलण्यात पण हीच गोष्ट आली की कृती आणि अभ्यास या परस्पर पूरक गोष्टी आहेत; आणि अचानक डोक्यात काहीतरी क्लिक झाल्यासारख झालं. पुढच्या ६ महिन्यांच्या कृती कार्यक्रमात हे  नक्की केलं की आता कृती आणि अभ्यास यांची सांगड घालता येईल असं काहीतरी आपल्याला करायला हवं.
             
नक्की काय करावं याचा विचार करताना तरुण मुलांचा व्यसनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यांची मानसिकता याचा अभ्यास करावा असा विचार मनात नक्की झाला. सुरुवातीला या अभ्यासात नक्की काय काय करायचे आहे याचा कच्चा आराखडा बनवला. मानसशास्त्र हा माझा अत्यंत आवडीचा विषय आणि व्यसनाधीनता ही जिव्हाळ्याची समस्या त्यामुळे पूर्ण जोशात दोन्हीवर काम करायला सुरुवात केली. सुरुवात कुठून करावी याचा विचार करता करता ‘मुक्तांगण’ ची आठवण झाली. माझी शिकण्याची सुरुवात झाली  ती मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी बोलून त्यांची परवानगी घेण्यापासून ....त्यामुळे माझ्याच विचारांशी मी स्पष्ट होत गेले. मुक्ता ताईने अगदी आनंदाने परवानगी दिली. तिच्या सूचनेप्रमाणे मी मुक्तांगणऐवजी ‘निशिगंध’ या मुक्तांगणच्या महिलांसाठीच्या व्यसनमुक्ती केंद्रात जायला सुरुवात  केली.  पहिल्या दिवशी निशिगंध मध्ये गेले तर मलाच थोडंसं विचित्र वाटत होत.  पण काही वेळातच रुळले. त्यावेळी तिथे खूप तरूण मुली पेशंट म्हणून होत्या. त्यांच्याशी हळूहळू ओळख झाली. मग तिथे बाकीची कामे सुद्धा करावी या विचारांनी मी तिथे भाजी निवडणे, जेवण वाढणे अशा कामात पण मदत करू लागले. मी दर रविवारी तिथे जायचे. त्यावेळी रविवारी त्या सगळ्या जणी एखादा चित्रपट पहायच्या. आमची पहिल्याच दिवशी अशी गट्टी जमली की ताई तू पुढच्या वेळेस आमच्यासाठी एखादा सिनेमा पाहायला आण असं सांगूनही झालं. 
याच काळात माझ्या  मनात लोकांना प्रश्नावली देणे आणि अभ्यास करणे या गोष्टींचे फार कुतुहूल होते. झालं, मीच चांगली २०-२५ प्रश्नांची प्रश्नावली बनवली; ज्याची उत्तर त्यांना फार मोठी मोठी लिहायला लागणार होती. मी प्रश्नावली घेऊन गेले; सगळ्यांना दिल्या. त्यांना या सगळ्याची सवय होती. प्रश्नावली त्यांनी पहिली आणि त्यातल्या चुका मला दाखवून दिल्या. प्रश्नावली कशी असावी याचे काही मुद्दे मी त्यांच्याकडून शिकले म्हणा ना! पण तरीही मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी ती भरली. फारच शिकवून जाणारा अनुभव ठरला. सुरुवातीला माझ्यासमोर फक्त सिनेमांबद्दल बोलणाऱ्या मुली हळूहळू त्यांचे विचार, मते व्यक्त करू लागल्या. जवळजवळ दीड  महिना मी तिथे जात होते. ‘फ्रेंडशिप डे’ ला शेवटच्या दिवशी मी तिथे गेले, सगळ्यांनी मनापासून विचारपूस केली आणि मला  फ्रेन्डशिप बॅंड्स  देखील बांधले. 
यानंतर मी ‘संतुलन’ नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात परत जवळ जवळ दीड महिना जात होते. कॉलेजच्या मदतीने सुरु झालेला हा एक कार्यक्रम होता. तिथे आम्ही व्यसने, व्यसनमुक्ती व विविध मानसिक रोग यांबद्दल शिकलो. तिथे प्रॉपर क्लासरूम lectures कमी व्हायची आणि आम्ही बाकी काम पण करायचो. सुरुवातीला हे काम म्हणजे नसती कटकट वाटायची.. वाटायचं, आपण इथे शिकायला आलोय पण आपल्याला धड काही शिकवतच नाहीयेत; इतरच काम फार....... पण या programme च्या शेवटी हळू हळू कळत गेलं की मी या काळात नकळत खूप काही शिकत गेले होते. याच काळात अजून एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे, मी माझ्या कॉलेजचं शिक्षण आणि इथले अनुभव यांच्यात साधर्म्य ओळखू लागले होते. कॉलेजमध्ये शिकताना वाटायचं की अरे  ही Theory आज आपण संतुलन मध्ये Apply होताना पहिली. आणि संतुलनमध्ये  अथवा निशिगंधमध्ये असताना कॉलेज मध्ये शिकलेली एखादी गोष्ट अचानक relate  होऊन जायची. या काळात मुक्तिपत्रे, स्वभाव-विभव अशी काही पुस्तके वाचनात आली.  Get Well Soon”सारखं व्यसनमुक्तीवर आधारित नाटक पाहण्यात आलं. ही अभ्यासाची काही नवीन मध्यमेसुद्धा शिकून घेतली आणि त्यातून झालेल्या  शिक्षणाची नोंद घेत गेले. 
           
खरच मी अभ्यास आणि कृती यांची परस्परपूरकता शिकत गेले आणि समजत गेले. ही तर सुरुवात होती असं म्हणता येईल. आता अजून पुढची काही ध्येयं निश्चिती केली आहेत. त्यांच्याकडे वाटचाल करायला सुरुवात करायची आहे!”

मृण्मयी अग्निहोत्री, mrinmai.happythoughts@gmail.com

No comments:

Post a comment