'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

‘जगण्यासाठी उत्सव’ ते ‘जगणे हाच उत्सव’


जीवन उत्सवच्या प्रचार फेरीदरम्यान कॉलेजची मुले
जीवन उत्सव हा कार्यक्रम मागील ६ वर्षांपासून नाशिकमध्ये होतो. पर्यावरणीय आणि वैज्ञानिक जीवनशैली ही या कार्यक्रमाची मुख्य थीम ! यंदा २४ ते ३० जानेवारी दरम्यान जीवनशैली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिकमधील ५० संस्था, शाळा महाविद्यालये आणि काही इंडस्ट्रीज सहभागी झाल्या होत्या. आणि साधारण २०० कार्यक्रम या आठवड्यात नाशिकमध्ये झाले. उद्घाटनाच्या दिवशी नाशिकमधील निवडक भागातून प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. शाळा कॉलेजची शेकडो मुलं-मुली-शिक्षक यात सहभागी झाले. या फेऱ्यांमध्ये ५ छोटे चित्ररथही बनवण्यात आले होते. त्यातून जीवनशैलीचा संदेश लोकांना मिळावा अशी रचना होती. या कार्यक्रमात कुठेही फ्लेक्स, प्लास्टिक, थर्मोकोल, पुष्पगुच्छ, हार वापरण्यात आले नाहीत. पाहुण्यांना भेट म्हणून सेंद्रिय गूळ, चरबीविरहित साबण आणि खादीचं कापड देण्यात आलं !

कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे अशा प्रकारची जीवनशैली जगणाऱ्या हरित साधकांच्या मुलाखती. यात मंदार देशपांडे (निर्माण ४) याच्या नाशिकमध्ये ३ ठिकाणी मुलाखती झाल्या आणि एका परिसंवादातही त्याचा सहभाग होता. मंदारची आकाशवाणीवरही मुलाखत झाली. ३० जानेवारीला जीवनशैली दिन साजरा होतो. यात डॉ. राणी बंग (अम्मा) यांचे व्याख्यान झाले. त्यालाही नाशिककरांचा छान प्रतिसाद मिळाला.  
या जीवन उत्सवात प्रचार फेऱ्यांचं आयोजन, शाळांच्या मिटींग्स घेणं, स्वयंसेवकांची जमवाजमव, शाळा-कॉलेजात बोलायला जाणं, मुलाखती घेणं, banners बनवणं आणि रंगविणं, स्टेज तयार करणं अशा सर्व कामात मुक्ता नावरेकर (निर्माण ३) सहभागी होती. या अनुभवाबद्दल बोलताना मुक्ता म्हणाली, “गेली सहा वर्षे सातत्याने आम्ही पर्यायी जीवनशैलीचे विचार विविध माध्यमांतून मांडतोय. सुरुवातीला कित्येकदा निराशा यायची. वाटायचं, या जागतिकीकरणाच्या, प्रदूषण आणि चंगळवादाच्या मोठ्या वादळात आपल्या या विचारांचा टिकाव कसा लागणार? पण आता हळूहळू या विचारांचा स्वीकार जाणवतोय. यंदा आम्ही आयोजनात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की आता जीवन उत्सव हा काही संस्थांपुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने लोकांचा उत्सव बनू लागलाय. आपलं वागणं, आपली साधनं पर्यावरणाला धोका पोहोचवणारी नसावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतो. आम्ही कुठलीही sponsorship घेत नाही. लोकांकडूनच या उत्सवाचा खर्च व्हावा असा आमचा प्रयत्न असतो आणि तो सध्या होतोही. हे काम करताना मला एखादा विषय मांडण्याची विविध माध्यमं, त्यातलं सातत्य, त्याचा आधी स्वतः अभ्यास करणं इ. गोष्टी शिकायला मिळतात.”

चित्ररथ
स्त्रोत- मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

No comments:

Post a Comment