'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

तरुण डॉक्टरांची नवी बॅच खेड्यांमध्ये !

सरकारी महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ची पदवी घेतल्यानंतर सर्व डॉक्टर्सना एक वर्ष ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांना दंड भरून ह्या करारातून मुक्त होता येते. मात्र प्रशासन व विद्यार्थी दोन्ही बाजू ह्याबाबत उदासीन असल्यामुळे अधिकतर पदवीधर डॉक्टर हा करार मोडतात. ह्याचा एक परिणाम म्हणजे अनेक खेडी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहतात. निर्माण मधील अनेक युवा डॉक्टर मात्र ह्याला अपवाद ठरत असून अत्यंत मनापासून ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा एक पायंडाच त्यांनी पाडला आहे. त्यातच आता रश्मी कुलकर्णी, संतोष चव्हाण, विवेक हिंगमिरे, विकास वानखेडे, महेश पुरी ह्यांची भर पसली आहे.
            रश्मी कुलकर्णी (निर्माण ५) ही मल्हारपेठच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (ता. पाटण, जि. सातारा) वैद्यकीय अधिकारी म्हणून २० जानेवारीपासून कार्यरत असून ह्या केंद्रात तिच्याआधी निर्माणचाच सुहेल शिकलगारही काम करत होता. सुहेलच्या वर्षभरातील परिश्रमांमुळे लोकांचा सरकारी वैद्यकीय सेवेबद्दलचा विश्वास वाढला असून लोक त्यांच्या वैद्यकीय अधिकारांबद्दल जागृत झाले आहेत असे रश्मीचे निरीक्षण आहे.   
            संतोष चव्हाण (निर्माण ५) हा सिंधुदुर्ग येथून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकताच रुजू झाला आहे. कॉलेजमध्ये असताना इंटर्नशिप प्रामाणिकपणे केल्याचा संतोषला खूप फायदा जाणवत असून रुग्णालयात येणाऱ्या केसेस हाताळणे त्यामुळे बरेच सोपे झाले आहे असे तो म्हणतो.
            महेश पुरी (निर्माण २), विवेक हिंगमिरे व विकास वानखेडे (दोघेही निर्माण ५) देखील महाराष्ट्रातील विविध भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. महेश पुरी अकोल्याजवळील आगर येथे, विवेक जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ, जि.हिंगोली) येथे, तर विकास नांदेड जवळील आष्टी येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाला आहे.
            ह्या आपल्या सर्व डॉक्टर मित्रांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा !

स्रोत – रश्मी कुलकर्णी, विकास वानखेडे, महेश पुरी, संतोष चव्हाण, विवेक हिंगमिरे 

No comments:

Post a Comment