'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय असावा का स्थानिक?

भारतातील लोकसंख्येच्या ८% असणाऱ्या आदिवासींमध्ये भारतात मलेरियामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू होतात. मलेरियाचा सामना करण्यासाठी सरकारी कार्यक्रम व्यापक प्रमाणावर सुरू आहे. मात्र मुंबईतील शहरी लोकसंख्येत आढळणारा आणि गडचिरोलीच्या जंगलातील आदिवासींमध्ये आढळणारा मलेरिया निराळा! गडचिरोलीच्या आदीवासी लोकसंख्येत मलेरिया नियंत्रणात येणारे अडथळे शोधण्यासाठी झालेले चारुता गोखलेचा (निर्माण १) सहभाग असणारे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
२०१२ मध्ये सर्च आणि Harvard विद्यापीठातील राधिका सुंदरराजन यांच्यासोबत ‘गडचिरोलीतील आदिवासी लोकांमधील मलेरिया या रोगाविषयीच्या समजुती’ यावर एक संशोधन झाले होते. यातून निघालेले निष्कर्ष हे शोधनिबंधाच्या स्वरूपात Plos One या जर्नलमध्ये जानेवारी महिन्याच्या अंकात वाचायला मिळू शकतात. गेले २० वर्ष आदिवासी भागात काम करणाऱ्या सर्चच्या आदिवासी आरोग्य विभागाचे हे पहिले प्रकाशित संशोधन असून राधिकासोबत डॉ. अभय बंग, डॉ. योगेश काळकोंडे आणि चारुता यांचा या संशोधनात प्रमुख सहभाग होता.      
मलेरिया हा रोग कसा पसरतो, तो कशामुळे होतो, त्यावर उपाय काय, तो कसा टाळता येऊ शकतो याविषयीच्या आदिवासींच्या संकल्पना हा या शोधनिबंधाचा गाभा आहे. या संशोधनातून सांस्कृतिकदृष्ट्या सुयोग्य साहित्य वापरून आदीवासींचे मलेरियाबद्दल आरोग्यशिक्षण, पारंपारिक उपचार करणाऱ्या आदीवासी पुजाऱ्यांना मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात सहभागी करून घेणे, गावातल्या गावात मलेरियाचे जलद निदान व उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देणे, कीटकनाशक औषधांत बुडवलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप करून त्यांचा वापर करण्यास चालना देणे इ. उपायांचे महत्त्व जाणवते. हे निष्कर्ष राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुधारण्यासाठी कसे उपयुक्त ठरतील यादृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा ही यापुढची पायरी असेल.
शोधनिबंध वाचण्यासाठी-
स्त्रोत: चारुता गोखले, charutagokhale@yahoo.co.in

No comments:

Post a Comment