'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

नरेगाच्या सामाजिक अंकेक्षणात निर्माणींचा सहभाग

महाराष्ट्र शासन गेल्या दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (नरेगा) केंद्र शासनाने नव्याने अवलंबलेली सामाजिक अंकेक्षणाची (Social audit) पद्धत राज्यात सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या २ वर्षांत राज्यात वेगवेगळ्या भागात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले. प्रगती अभियान ही संस्था या सर्व प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे. निर्माणचे गोपाल महाजन आणि अजय होले प्रगती अभियानचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक अंकेक्षणाच्या या प्रक्रियेत काम करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने सामाजिक अंकेक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी पहिल्यांदाच एका संपूर्ण जिल्ह्याचे अंकेक्षण करण्याचे ठरवले. त्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात ४ तालुके मिळून ५५६ ग्रामपंचायती आहेत. त्यातील धुळे तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींची जबाबदारी प्रगती अभियानकडे देण्यात आली. २२ डिसेंबर २०१३ ते २८ जानेवारी २०१४ या दरम्यान धुळे तालुक्यात नरेगासाठी २०१२-१३ साली खर्च करण्यात आलेल्या एकूण २० कोटी रुपयांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. त्यात ४२५ प्रशिक्षित मनुष्यबळ, जे मुख्यत: युवक होते, सहभागी झाले. त्यातील ४०० स्थानिक गावपातळीवरील युवक/युवती होते आणि २५ हे ग्रामीण/आदिवासी भागात काम करणार्‍या संस्थांचे कार्यकर्ते होते.
माहितीचा अभाव हे नरेगा लोकांपर्यत न पोचण्याचे अजूनही कळीचे कारण आहे. सामाजिक अंकेक्षणातून मोठ्या प्रमाणात नरेगाबाबत जनजागृती झाली. गावातील युवांना नरेगाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. आता धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात २-३ प्रशिक्षित युवा आहेत जे,  ठरवले तर, नरेगाला गावात खेचून आणू शकतात. युवक मजुरांच्या अडचणी/तक्रारींचे ग्रामसभेत क़िंवा जनसंवादाच्या माध्यमातून निवारण झाले. अशा काही उपलब्धी सामाजिक अंकेक्षणाच्या सांगता येतील.
४२५ युवांना प्रशिक्षित करणे, गावपातळीवरील अंकेक्षण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे, शासकीय अधिकार्‍यांशी संवाद साधणे, मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन-विश्लेषण करणे, काही विघ्नसंतोषी लोकांना हाताळणे, ग्रामसभा/जनसंवाद शांततेत पार पाडणे अशा जबाबदार्‍या आव्हानात्मक होत्या.
प्रगती अभियानने या कामाची संपूर्ण जबाबदारी गोपाल आणि अजयकडे सोपवली होती. तसेच धुळ्यातील संदीप देवरे ह्याचासुद्धा या प्रक्रियेत मोलाचा सहभाग होता. आयआयटी, मुंबईमध्ये शिकणार्‍या निकेश इंगळेने माहिती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.  
सोशल ऑडीटचा कार्यक्रम

स्त्रोत- गोपाल महाजन, mahagopsu@gmail.com

No comments:

Post a Comment