'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

नवी क्षितिजे...भूषणचा (निर्माण ५) कार्यनिश्चितीसाठीचा प्रवास वाचूया त्याच्याच शब्दांत...

“BAMS केल्यानंतर पुढे काय?’या प्रश्नाचं उत्तर शोधताना (UG नंतर हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.) अनेकवेळा वैचारिक, भावनिक आणि कृती परिवर्तन गेल्या दीड वर्षांत होत गेलं.
निर्माणच्या पहिल्या शिबिरानंतर ‘PG कुठून व कशात करू?’ ह्यापेक्षा ‘PG का करू?’ हा प्रश्न सतावत होता. विचाराअंती मी आयुर्वेदात PG न करण्याचा निर्णय घेतला. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात १० महिने मी काम केलं. काम करताना वर्धा व सेवाग्राम-पवनार येथे विनोबा, गांधीचे वैचारिक सानिध्य मला लाभत होतं. पुढे काय हा प्रश्न अजून अनुत्तरीतच होता. निर्माणच्या दुसऱ्या शिबीरात MISSION, PASSION PROFESSION हे एक असण्याचं महत्त्व अधोरेखित झालं. आयुर्वेदासोबत ‘सामाजिक आरोग्य’ या विषयात मला रूची येत होती. या क्षेत्रात अनुभव घेण्यासाठी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमां’तर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यातील पारोळा व वरणगाव येथे मी ६ महिने काम केलं. ह्या कामातून एखादा शासकीय कार्यक्रम कसा चालतो हे शिकायला मिळाले. विस्कळीत व आळसावलेली शासकीय यंत्रणा, कागदोपत्रीचे कार्यक्रम अशा काही न रुचणारया गोष्टींशी ओळख झाली. मात्र ह्या ६ महिन्यांच्या काळात मला लोकांसोबत काम करायला मिळाले. लहान मुलांच्या आरोग्यासंदर्भात अनेक समस्यांचा परिचय झाला. याचबरोबर संध्याकाळचा वेळ मी आयुर्वेदिक चिकित्सालयातही घालवत होतो.

निर्माणच्या तिसऱ्या शिबीरात विचार आणि भवनेच्या जोडीला कृतीची जोड कशी द्यावी हे समजू लागलं. यादरम्यान सुजय काकरमठ (निर्माण ४) पुढील प्रवासासाठी गेल्यामुळे मां दंतेश्वरी फिरत्या दवाखान्यात काम करण्याची मला संधी मिळाली. clinical skill, या आरोग्य कार्यक्रमाचे प्रशासन, तसेच काही प्रमाणात संशोधन ह्या विविध अंगांनी ‘सामाजिक आरोग्या’च्या क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने मी मार्च २०१४ ला सर्चमध्ये रुजू झालो. पहिल्या महिन्यात योगेश दादाच्या मार्गदर्शनाखाली clinical skills मिळविण्यावर मी लक्ष केंद्रित केले. वैभव आगवणे (निर्माण २) ह्यादरम्यान मदतीसाठी उपलब्ध होता. वैभवदेखील ३ वर्षांच्या आरोग्यसेवेनंतर पुढील प्रवासासाठी निघाल्यामुळे या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून ४८ गावांना आरोग्य सेवा कशी पुरवता येईल ह्याचा शोध घेत आहे. आदिवासी भागात काम करणे माझ्यासाठी एक नवीन अनुभव व आव्हान आहे.”
स्रोत: भूषण देव,  drbhushandeo@gmail.com

फिजिओथेरपी उपचार ग्रामीण भागात पोहोचवण्याचे आव्हान

गौरी चौधरी (निर्माण ४) ही फिजिओथेरपिस्ट. गौरीने यापूर्वी सर्च आणि आनंदवन येथे काम केले आहे आणि त्यानंतर तिने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत फिजिओथेरपी उपचार पोचवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. अशातच तिला ‘राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम या भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत फिजिओथेरपिस्ट  म्हणून काम करण्याची संधी चालून आली.
गौरी  गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालय, वरुड, जिल्हा अमरावती येथे रुजू या कामासाठी झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत लकवा, मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार तसेच वयस्कर रुग्ण झालेल्या रुग्णांना घरोघरी जाऊन उपचार व सल्ला देण्याचे काम आहे.
फिजिओथेरपी हा तसा महागडा उपचार; त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना सहसा यापासून वंचितच राहावे लागते. विशेषतः लाकाव्यासारख्या आजारात फिजिओथेरपिस्ट च्या उपचारांची खूपच मदत होते. नियमित व्यायाम करून घेवून रुग्णांना लाकव्यामुळे आलेले अपंगत्व कमी करण्यात फिजिओथेरपी महत्वाचे योगदान देते. त्याच बरोबर ग्रामीण भागातील परिस्थिती आणि योग्य उपकरणांचा अभाव यामुळे हे काम गौरीसाठी नवे आव्हान व शिकण्याची मोठी संधी ठरेल..
 स्रोत – गौरी चौधरी,gauriec@gmail.com

          वंचितांसाठी अनेक सरकारी योजना आखल्या जातात. मात्र त्याबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा भ्रष्टाचारामुळे या योजनांची गरज असणाऱ्या अनेकांपर्यंत या योजना पोचत नाहीत. चिंतामणी पवार (निर्माण ४) हा त्याच्या चिंचोली गावातील (जिल्हा-सोलापूर) लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून स्वतंत्रपणे काम करत आहे. २०११ मध्ये त्याला या कामाबद्दल नेहरू युवा केंद्राचा पुरस्कारदेखील मिळाला होता. यावर्षी नेहरू युवा केंद्राच्याच युथ एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत चीनच्या अभ्यासदौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे. यादरम्यान अनेक देशांच्या तरुणांसमोर चिंतामणी आपल्या कामाबद्दल सादरीकरण करेल. यापूर्वी २०१२ मध्येही चीनच्याच अभ्यासदौऱ्यासाठी त्याची निवड झाली होती. मात्र सीमेवरून भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे हा दौरा रद्द झाला होता.
कॉलेजच्या युवांचा सामाजिक कामाद्वारे व्यक्तिमत्व विकास या ध्येयाने कार्यरत असणाऱ्या National Service Scheme (NSS) या कार्यक्रमाबद्दल आपण जाणतोच. त्याचप्रमाणे ग्रामीण युवकांना राष्ट्रबांधणीच्या कामांत संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे हे Nehru Yuwa Kendra Sanghatan (NYKS) चे ध्येय आहे. NYKS बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.nyks.org/
हा दौरा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. चिंतामणीला त्याच्या अभ्यासदौऱ्यासाठी शुभेच्छा! चीन दौऱ्यातील घडामोडी आपण तो परत आल्यावर समजून घेवू.
स्त्रोत: चिंतामणी पवार,  chintamanipawar@rediffmail.com

No comments:

Post a comment