'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

सळसळत्या रक्ताची गरज ओळखून...

नाशिक मधील एका सर्व्हे मध्ये असे आढळून आले की, वयवर्ष १८ ते २५ या वयोगटातील रक्तदानाचे प्रमाण सध्या घटते आहे. २०१० मध्ये ते एकूण रक्तदात्यांपैकी ३८.८६% होते, त्यानंतर ते २०११ मध्ये ३४.४३%, २०१२ मध्ये ३१.२२% आणि २०१३ मध्ये २८.२८% इतके झाले. नाशिक जिल्ह्यामध्ये महिन्याभरात सरासरी दोन ते अडीच हजार रक्तपिशव्या संकलित केल्या जातात. तरी सुध्दा एकूण गरजेच्या जवळपास ३० ते ३५ टक्के तूट यामध्ये आढळते.
या पार्श्वभूमीवर दिनांक १० जून रोजी नाशिक येथे जनकल्याण रक्तपेढी संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्यांनी गेल्या २ महिन्यांमध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. अशा वेगवेगळ्या कंपन्या, NGOs आल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करणाऱ्यांचादेखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नियमित रक्तदाता असलेल्या मयूर सरोदे (निर्माण ४) याचा यावेळी  सत्कार करण्यात आला. चोवीस वर्षांच्या मयूरने आतापर्यंत १९ वेळा रक्तदान केले आहे. आयुष्यात १०० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करण्याची मयूरची
इच्छा आहे. या प्रेरणेने तो दर साडेतीन महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करतो.
रक्तदानाची सामाजिक जाणीव वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारा मयूर म्हणतो “रक्तदानाबद्दल तरुणांमध्ये खूप गैरसमज आढळून येतात. रक्तदान हे कोणीही १८ ते ६५ वयोगटातील निरोगी माणूस करू शकतो, ज्याचे वजन ४५ किलोच्या वर आहे आणि हिमोग्लोबिन १२.५० ग्रामच्या वर आहे. परंतु बऱ्याच जणांना ही माहिती नसल्याचे आढळून आले. माझी सर्वांना विनंती आहे की, जे रक्तदान करण्यासाठी योग्य असतील त्या प्रत्येकाने वर्षातून किमान २ वेळा तरी रक्तदान करावे. स्वतः करावे आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना सुध्दा माहिती सांगावी. त्यांचे गैरसमज असतील तर दूर करावेत आणि रक्तदानाचे प्रमाण वाढवण्यास मदत करावी. बऱ्याचशा शस्त्रक्रिया रक्ताशिवाय करता येत नाहीत. रक्तदाता रक्त देतो म्हणून डॉक्टर इलाज करू शकतात.”

स्रोत: मयुर सरोदे, mayursarode17@gmail.com

No comments:

Post a Comment