'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 August 2014

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

निर्माण ६ ची बॅच जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहे. निर्माणच्या प्रसिद्धीसाठी यावेळी प्रामुख्याने ‘रंगीत पोस्टर्स’ या माध्यमाचा उपयोग करण्यात आला. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राभरातील १७० कॉलेजेसमध्ये निर्माणचे पोस्टर्स  लागले. सर्वांना मनापासून धन्यवाद !
या वेळी निर्माण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांतील व महाराष्ट्राबाहेरील सुमारे ३५० जणांनी अर्ज भरला आहे. मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मुलाखती पूर्ण होऊन २ ऑक्टोबरला निर्माण ६ साठी निवड झालेल्या युवांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इथे मुलाखती होणार आहेत. यादरम्यान शक्य तेंव्हा मुलाखती घ्यायला आणि मुलाखत घेणाऱ्या टीमला भेटायला नक्की या.
यावेळी निवडीसाठी अर्ज व मुलाखतींसोबत एक नवी पद्धत वापरण्यात येत आहे. अर्ज व मुलाखत यांच्याद्वारा आपल्याला त्या व्यक्तीची काही प्रमाणात झलक मिळते. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात तिच्यासोबत काम केले तर तिच्याबद्दल अधिक विश्वासार्ह माहिती मिळते. ज्यांनी अर्ज भरला त्यांच्यातील काही निवडक युवांना ‘गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्ती अभियाना’अंतर्गत लोकजागृती करण्यासाठी गडचिरोलीत बोलावण्यात येत आहे. ही मुले सध्या गावागावांत शाळांमध्ये जाऊन तंबाखूचा विषय घेत आहेत. गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बोलून त्यांच्या सहभागाने गावांत तंबाखूमुक्तीचा कृती कार्यक्रम ठरवत आहेत. त्यांनाही यादरम्यान निर्माण बद्दल अधिक जाणून घेता येते. एका सामाजिक प्रकल्पात योगदान देण्याची संधी मिळते आणि नयी तालीम पद्धतीने त्यांचे शिक्षणही होते.
            निर्माणच्या आजी-माजी-भावी विद्यार्थ्यांची पहिली बॅच तंबाखूविरुद्ध जनजागृती करण्यासाठी गडचिरोलीच्या खेड्यांत पोहोचली आहे. महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूच्या विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी गडचिरोलीतील तत्पर प्रशासकीय अधिकारी, सर्च व गडचिरोलीतील अन्य स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने धडाक्या सुरू आहे. या अभियानाला सर्चतर्फे पुढे नेण्यासाठी अजिंक्य कुलकर्णी (निर्माण ६) सर्चमध्ये रुजू झाला आहे. अभियानाचे नियोजन करणे, आरोग्यशिक्षणासाठी साहित्य विकसित करणे इ. कामांमध्ये सर्चमधील निर्माणचे युवा आपले योगदान देत आहेत.

            जर निम्मा जिल्हा तंबाखूपदार्थांचे सेवन करत असेल तर हा प्रश्न कसा सोडवावा? आपले सुझाव नक्की द्या.

No comments:

Post a Comment