'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 August 2014

सोनाळे गावच्या स्वच्छतेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच वाटसरू व्हा...

या प्रवासाबद्दल वाचूया मुक्ता नावरेकरच्या (निर्माण ३) शब्दांत...
दीपक पाटीलच्या (निर्माण ३) सोनाळे (जि. जळगाव, ता. जामनेर) गावात २६ जुलैला निरंजन तोरडमल, पंकज सरोदे, राही मुझुमदार (सर्व निर्माण ५), प्रणाली दंडवते आणि मी शाळेत काही गोष्टी शिकवायला (आणि खरं तर शिकायला) गेलो होतो. नंतर गावात महिलांची एक मीटिंग घेतली होती. त्यात गावाच्या समस्या काय ? असा प्रश विचारला आणि पाहिलं उत्तर मिळालं ते म्हणजे गावात शौचालय नाहीत ! मग या विषयावर मिटींगमध्ये बरीच चर्चा झाली आणि पुन्हा एकदा मोठी मिटिंग घेऊन शौचालय हा विषय सगळ्यांना नीट समजावून सांगायचे ठरलं होतं. त्यानुसार १४ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता ही ग्रामसभा सुरु झाली. जामनेर पंचायत समिती, निर्मल भारत अभियानचे गट समन्वयक गोपाल गुजर, सोनाळे गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका आणि साधारण १५० महिला या मिटींगला उपस्थित होत्या. सुरुवातीला दीपक पाटील यांनी उपस्थितांची ओळख करून दिली. त्यानंतर मी 'ही ग्रामसभा कशासाठी आहे' याची थोडक्यात माहिती दिली. नंतर 'सोनपावलं' हा शौचालय या विषयावरील एक तासाचा चित्रपट दाखवला. गोपाल गुजर यांनी निर्मल भारत अभियानाविषयी महिती दिली. त्यात योजनेचे बदललेले स्वरूप, शासनाकडून मिळत असलेले आर्थिक सहाय्य, शौचालय का बांधायला हवे याविषयी ते सविस्तर बोलले. गावातील अंगणवाडी सेविकांनीही याविषयीचे त्यांचे मनोगत सांगितले. नंतर गावात या कामाला सुरुवात कशी करायची, सर्व्हे इत्यादी विषयी आम्ही महिलांशी चर्चा केली. त्यात अनेक जणींनी शौचालय बांधणीचे काम सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. काहींनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. उदा. सांडपाण्याची व्यवस्था नाही, पूर्वी बांधलेले सेप्टिक संडास नीट चालत नाहीत इ. त्यावर गावातील प्रत्येक गल्लीत स्वतंत्र मिटिंग घेऊन तिथले प्रश्न समजून घेऊ, तसेच सौचालाय बांधण्यासाठी गावात एक सर्व्हे करू असंही ठरलं.

या कार्यक्रमाचं एकूण स्वरूप पुढीलप्रमाणे:
१. गावकऱ्यांची मिटिंग -
उद्देश - गावातील स्वछातेची आणि शौचालयांची सद्य:स्थिती समजून घेणे आणि खत देणाऱ्या शौचालयाची (Twin pit latrine) माहिती देणे. सरकारी योजनेची माहिती देणे. आत्तापर्यंत काम का होऊ शकलं नाही हे जाणून घेणे.
अपेक्षित सहभागी - गावकरी (विशेषतः महिला), ग्राम पंचायत आणि पंचायत समिती प्रतिनिधी
 २. सर्व्हे
उद्देश - सुरुवातीला ज्या घरी शौचालय बांधायची आहेत अशा घरांचा प्राथमिक सर्व्हे. (यात उपलब्ध जागा, पाणी, मातीचा प्रकार आणि इतर आवश्यक गोष्टी असतील )
अपेक्षित सहभागी - दीपक, ग्राम सेवक, इतर स्वयंसेवक
 ३. शौचालय प्रशिक्षण -
सोनाळे व आजूबाजूच्या गावातील गवंड्यांना या इको toilet चे शास्त्रीय प्रशिक्षण देणे. इ
अपेक्षित सहभागी - गवंडी, पंचायत समिती प्रतिनिधी, निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे कार्यकर्ते.
 ४. गावात शौचालय बांधणीची सुरुवात
 या टप्प्यांमध्ये गरजेनुसार थोडेफार बदल होऊ शकतात. तसेच संपूर्ण स्वच्छता या विषयावर गावकऱ्यांसोबत एखादं शिबीर किंवा सफाई जत्रेचं आयोजनही करता येईल. पथनाट्य, प्रभातफेरी, पोस्टर्स इ. माध्यमांचाही वापर करता येईल.
या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांना पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर संपर्क करावा.

स्त्रोत: मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

No comments:

Post a Comment