'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

प्रश्न आणि प्रश्न...


सामाजिक कामाची सुरुवात करताना अनेक romantic कल्पना डोक्यात असतात. मात्र प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर वास्तव वादळासारखं शब्दशः धडकतं. ज्यांची कल्पनाच केली नाही असे अनेक भौतिक प्रश्न आ वासून उभे राहतात. मात्र हाच काळ टिकून राहण्याचा असतो, अनुभवाने आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असतो. अतिशय प्रामाणिकपणे आपल्या प्रवासाबद्दल सांगतेय अमृता ढगे (निर्माण ५)...


“निर्माणची शिबीरं चालू असतानाच परीक्षेला पर्याय काय?’ हे हेरंब कुलकर्णींचं पुस्तक वाचनात आलं. शिक्षणा संदर्भातल्या आजच्या समस्या त्यात बर्याच नेमक्या मांडल्या होत्या आणि काही प्रयोगशील संस्था आणि व्यक्ती यांची माहिती मिळाली. त्यातलीच एक आनंदनिकेतन ही नाशिक मधली शाळा. पुढे योगायोगाने सहजशिक्षणाची प्रयोगशाळा हे शाळेतल्या ताईंनी लिहिलेलं पुस्तक वाचलं आणि शाळेशी थोडी जवळून ऒळख हॊऊ लागली. दरम्यान शाळेशी संपर्क केला, भेट दिली, त्यांच्या सोबत काम करण्याबाबत विचारलं. एक दोन भेटींनंतर माझं काम करण्याचं नक्की झालं आणि फ़क्त निरीक्षणाच्या हेतूने मी मार्चपासून शाळेत जाऊ लागले. 
थोडी पार्श्वभूमी अशी सांगाविशी वाटते की निर्माण शिबीर प्रक्रिया चालू असताना मी मुंबईमधली माझी नोकरी सोडली. माझं घर अंबरनाथला आहे. जे.जे. मधून कमर्शिअल आर्ट्स केल्यानंतर काही वर्ष मी याच क्षेत्रात ग्राफिक आणि डिस्प्ले डिझाइनर अशा काही नोकऱ्या केल्या. ऑफिसमधल्या झगमग विश्वात आणि ट्रेनच्या कोंदट, कोंबलेल्या वातावरणात रमण्यासारखं काहीच नव्हतं. निर्माणशी जोडल्या गेल्यानंतर अर्थातच नक्की काय, कुठे, कसं काम करू या संभ्रमात होते. शिक्षणाच्या संदर्भात काम करायचं असं वाटल्यानंतरही काय, कुठे, कसं हे प्रश्न होतेच. काही पर्ययांचा विचार करता घरच्यांशी "चर्चा" करून नाशिक हा पर्याय निवडला. अर्थातच शाळा, तिचा आत्ता पर्यंतचा प्रवास हे मनापसून आवडलंही होतं. 
मी नक्की कोणत्या वयोगटासोबत काम करू? कुठले विषय? प्रयोगशीलता म्हणजे नक्की काय करायचं? या सगळ्याच बाबतीत खूप संदिग्धता होती. माझ्या परीने तिथल्या ताईंच्या तासांना जाऊन बसू लागले. बघताना फ़ारसं कठीण वाटलं नाही. रोज ९:३० ते ३ शाळेत जाऊन बसायचं. जमेल तेवढ्या ताईंशी ओळख वाढवायची. मुलांशी संवाद करायचा. एखाद-दोन चित्रकलेचे तासही घेतले. चाचपडणं चालूच होतं. 
आनंद निकेतनची वार्षिक सहल
‘शाळा जीवनाशी जोडलेली असणं’, ‘अर्थपूर्ण, आनंदायी शिक्षण’, ‘ज्ञानरचनावादह्या प्रोसेस आधी मला कुणीतरी नीट सांगा, समजवा असं सारखं वाटत होतं. मार्च नंतर एप्रिल आणि मे हे दोन महिने मी वाडा तालुक्यातल्या सोनाळे गावात राहून "क्वेस्ट" या शैक्षणिक क्षेत्रातच काम करणाऱ्या संस्थेत डिझाइनर म्हणून काम केले. ते करत असतानाही प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणासंदर्भातल्या काही बाबी लक्षात येऊ लागल्या. आनंदनिकेतन मध्ये होणाऱ्या शिक्षक शिबिराची मी प्रचंड वाट पहात होते. त्या तीन दिवसाच्या शिबिरात मला मुलांविषयी खूप समज येईल, माझ्या बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतील वगैरे समजुती करून घेतल्या होत्या. माझ्या अपेक्षा चूक नव्हत्या पण खूप होत्या आणि प्रत्यक्ष शिबिरात ह्यातलं काहीच झालं नाही. तोवर शाळा चालू झाली होती. दुसरीचा मराठी सराव, तिसरी ते सातवी चित्रकला आणि ८वी ला संगणक असे विषय देण्यात आले. संगणक विषयाला काही कारणांनी सुरू व्हायला अजून वेळ होता. ५वी, ६वी, ७वी चित्रकला मी आणि अजून एक ताई विभागून घेत असल्याने आठवड्यातून एक इयत्ता एक तास (३५ मि.) तोही शाळा सुटतानाचा. कसं शिकवायचं? ३री ची चित्रकला त्या मानाने ठीक चालू होती. २री मराठी सरावाचा अंदाज यायलाही वेळ लागत होता. खेळामध्ये फ़ारसं नाविन्य मुलांनाच नको होतं. एकंदरीत माझ्या शाळेकडून असणाऱ्या अपेक्षा, स्वत:कडून असलेल्या अपेक्षा याचा काहीच मेळ बसत नव्हता. माझा आत्मविश्वास कमी होत चालला. छोट्या गोष्टींमधले चॅलेंजेस दिसेनासे होत होते. घर सोडून नाशिकला यासाठी आले का असंही वाटून गेलं.
 शाळेतल्या सगळ्या ताई अत्यल्प मानधनावर काम करतात. मासिक उत्पन्नाच्या दृष्टीने त्याकडे बघताच येणार नाही. याची कल्पना मला ताईंनी आधीच दिल्यामुळे मी पर्सनल फ़ेलोशिप शोधली होती. शाळेत काम करायला लागून एक महिना झाल्यानंतर पैसे हातात येणार त्यावेळेस कुठलीही पूर्वसूचना न देता माझी फ़ेलोशिप रद्द झाल्याचं कळालं आणि तिथून अस्वस्थता अजून वाढतच गेली. मला शाळेत प्रत्यक्ष काम करून शिकायचं होतं पण पुरेसं मार्गदर्शन आणि पुरेशी जबाबदारी नव्हती. आता तर पैसेही नाहीत. शाळेत प्रयोग करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं तरी त्याचं आणि मुलांच्या इतक्या इनोसन्सचं मी करू काय? घर सोडून वेगळ्या शहरात राहिल्याने स्वत:चे खर्च, जबाबदाऱ्या वाढवून घेतल्या होत्या. शाळेला ताईंची गरज होती आणि एका शैक्षणिक वर्षाची कमिटमेंट मी शाळेला (आणि स्वत:ला) दिली होती. (कारण त्याशिवाय शाळा समजणं शाळेतले वेगवेगळे प्रयोग जे वर्षभर चालतात ते बघता येणं शक्य नव्हतं) ताईंशीच हे सगळं स्पष्ट बोलून काही मार्ग निघतो का ते बघायचं असं ठरवलं. मार्गदर्शनाचं सहकार्य ताईंनी लगेचच दिलं. सोबत एका नवीन विषयाची जबाबदारी व तास बघून, शिकून स्वत: त्यावर काम करण्याची प्रक्रिया घडू लागली. सोशल ओलिंपियाडचं समजल्यावर त्यावरही काम करण्याची जबाबदारी घेतली.
आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रपोजल लिहून जमेल त्यांना मदत मागते आहे. त्यातून ६ महिन्यांचा प्रश्न सुटला पण अजून सहा महिन्यांचा सुटायचा आहे.
कळत-नकळत अर्थातच खूप शिक्षण झालं या सगळ्यामधून. घरापासून वेगळं राहिल्याने घरातल्या माणसांवर आपण किती आर्थिक, मानसिक सगळ्याच दृष्टीने अवलंबून असतो हे प्रकर्षाने जाणवलं. माणसंच काय घरातल्या टीव्ही, इंटरनेट, फ़्रिज, वाशिंग मशीन पासून मि़क्सर सारख्या छोट्या हक्काच्या वस्तू, झाडं सगळ्याची किंमत समजली. शाळेत वह्या, अभ्यास तपासताना ‘अपूर्ण’ असा शेरा देणं मलाच काही वेळानं खटकलं तेव्हा पासून ‘पूर्ण कर’ असं लिहू लागले. नकारार्थी शेरे मारण्यापेक्षा त्यालाच पॉझिटिव्हली बघता येतं का हे स्वत:बाबतही पडताळत राहतेय. छोट्या गोष्टींमधले practical challenges शोधायला शिकतेय. संपूर्ण मराठी माध्यमाची शाळा चालवण्यातल्या अडचणी दिसत आहेत. या शाळेच्या, शिक्षण व्यवस्थेच्या मर्यादा आणि फ़ायदे त्यातलं सातत्य या गोष्टींचं निरीक्षण चालू आहे. या सगळ्या प्रवासात निर्माण मधल्या अनुभवी मित्र-मैत्रिणींची, सुनील काकांची आणि काही पुस्तकांची खूपच मदत होत आहे.”
अमृता ढगे, dhage.amruta@gmail.com

No comments:

Post a Comment