'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

डॉ. आशिष चांगोले कलाहांडीत


दुर्गम भागात आरोग्यसेवा देणारी एक प्रेरणादायी साखळीच निर्माणच्या तरुण डॉक्टरांनी बनवली आहे. गडचिरोली, मेळघाट, छत्तीसगढ येथे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आशिष चांगोले (निर्माण २) चक्क ओडिशाच्या कलाहांडी या दुर्गम जिल्ह्यातील ‘स्वास्थ्य स्वराज’ या संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.


मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या या भागात टाळता येण्यासारखे मृत्यू टाळायचे हे ‘स्वास्थ्य स्वराज’चे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोकांना संस्थेवर अवलंबून न ठेवता गावागावातील स्वास्थ्य साथींना (आरोग्यदूत) प्रशिक्षणामार्फत सक्षम करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे. २ क्लस्टर मधील ७३ स्वास्थ्य साथींना मलेरिया, टीबी, खरूज, हागवण यांच्याबद्दल माहिती व या आजारांच्या रुग्णांना ओळखून गावातच कशी काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील subcenter मध्ये आठवड्यातून २ दिवस ओपीडी सेवाही दिली जाते. प्रशिक्षण आणि आरोग्य तपासणी सेवा व उपचार हे आशिषचे मुख्य काम आहे.
छत्तीसगढ येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ मध्ये आशिष कार्यरत असताना तिथल्याच डॉ. अॅक्विनस यांनी ओडीशातल्या अतिदुर्गम व वैद्यकीय सुविधा नसणाऱ्या भागात आरोग्यसेवा देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. केवळ डॉ. अॅक्विनस यांना सोबत म्हणून कलाहांडीला गेलेला आशिष आता तेथे रमून गेला आहे. गेल्या ४ महिन्यांत झालेल्या शिक्षणाबद्दल बोलताना आशिष म्हणाला, “जंगलातल्या पहाडातून, नद्या-नाल्यांमधून आपले बाळ व सामन घेऊन प्रशिक्षणासाठी २५-३० किमी अंतर चालत येणाऱ्या स्वास्थ्य साथींच्या चेहऱ्यांवर तक्रारीचा कोणताच भाव नसतो. त्यांच्यासोबत काम करताना खूप समाधान मिळते. त्यांच्यावर भडीमार न करता त्यांना समजून घेऊन प्रशिक्षण देण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. त्यासाठी कोणत्याही मेडिकलच्या पुस्तकापेक्षा Where there is no doctor आणि Helping health workers learn ही पुस्तके वाचत आणि जगत आहे. तसेच निर्माण health camp मध्ये शिकलेला मलेरिया वास्तवात अनुभवत आहे. यादरम्यान गरज पडेल ती कामे करावी लागतात. वेळ पडली तर गावांत जाण्यासाठी जीपदेखील चालवतो आणि स्वास्थ्य साथींच्या प्रशिक्षणात वापरण्यात येणाऱ्या चित्रकथातली चित्रेदेखील काढतो. कंदा आदिवासींची कुई भाषादेखील शिकत आहे. कमी resources असताना creativity खूप वाढल्याचा अनुभव येत आहे.”
स्त्रोत- आशिष चांगोले, ashishdc3@gmail.com

No comments:

Post a Comment