'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

जनुक-परिवर्तीत (Genetically Modified, G.M.) अन्न सुरक्षित का नाही?

बॅसिलस थरिंजिएंसिस (Bacillus thuringiensis, Bt) नावाच्या बॅक्टेरिया मध्ये -endotoxin (किंवा cry-protein) नावाचे प्रथिन तयार होते, जे पोटात गेल्यास काही जातीचे कीटक मृत्यू पावतात. नेमकं होतं काय, तर हे प्रथिन या किडींच्या शरीरात गेल्यानंतर ते त्यांच्या आतड्यातील पेशींमध्ये पोहोचते. तिथे या प्रथिनामुळे घडून आलेल्या जनुकीय आणि रासायनिक प्रक्रियांचा परिणाम म्हणून त्या कीटकांच्या आतड्यातील या पेशी मृत्यू पावतात आणि त्यामुळे आतडे दुर्बल पडणे व आतड्याला छिद्र पडणे असे परिणाम घडून येतात. परिणामतः किडीचे अन्न खाणे थांबते व उपासमारीने मृत्यू होतो.
बी.टी. मधील विषामुळे मृत्यू पावणार्‍या या कीटकांच्या काही जाती विशिष्ट पिकांच्या शत्रू आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे हा बी.टी. जीवाणू आपल्या शरीरात cry-protein करू शकतो, तसेच प्रथिन या पिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरात तयार करता आले तर? विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्वाची घटना म्हणजे, जनुकशास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले की, असे काही शक्य आहे. अर्थात बी.टी. मधील, कीटकांसाठी विषारी असलेले ते प्रथिन तयार करणारे जनुक काढून हव्या असलेल्या पिकामध्ये सोडल्यास त्या पिकातही ते विषारी प्रथिन तयार होवू शकते. हे ‘जनुकीय परिवर्तना(Genetic modification) चे तंत्रज्ञान. त्यामुळे आता या पिकावर किडीने हल्ला केलाच तर त्या पिकामध्ये नव्याने तयार होत असलेल्या प्रथिनामुळे मृत्यू पावतील आणि परिणामतः पिक किडीच्या प्रादुर्भावापासून वाचेल. एका दृष्टीने हे प्रचंड क्रांतिकारी व सोईचे आहे; एखाद्या जिवातून हवा तो गुणधर्म असलेला जनुक घ्यायचा, दुसऱ्या हव्या त्या जीवामध्ये टाकायचा, आणि अपेक्षित गुणधर्म असलेला जीव तयार करायचा. पण दुर्दैवाने हे गणित इतके सरळसोपे नाही.
बी.टी.चेच उदाहरण घ्यायचे तर,आपण वर पाहिले की, बी.टी. मुळे किडीचा मृत्यू हा बी.टी. च्या शरीरातील एका विशिष्ठ प्रथिनाची कीटकाच्या शरीरातील रसायनांशी झालेल्या अंतरक्रियेचा परिणाम होता. त्यामुळे एखाद्या पिकामध्ये असा गुणधर्म आल्यास, केवळ याच एका किडीवर परिणाम होईल असे नाही, तर ज्या-ज्या जीवामध्ये (non-target organisms) संबंधित प्रथिनाशी आंतरक्रिया घडू शकतील असे रासायनिक-जीवशास्त्रीय वातावरण आहे, तिथे असे परिणाम घडून येवू शकतात. वेगवेगळी जीवशास्त्रीय आणि रासायनिक घडण यामुळे एखाद्या जिवाच्या शरीरात अशा अंतरक्रीयेमुळे अनपेक्षितपणे चांगला बदल घडून येवू शकेल, काहींमध्ये वाईट, तर काहींमध्ये त्याचे विघटन होऊन काहीच परिणाम घडणार नाही. मात्र नेमके कुठल्या जीवावर काय परिणाम होईल, हे मात्र परिणाम घडून आल्याशिवाय ठामपणे सांगता येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या पद्धतीने वनस्पतींमध्ये फलन होते (परपरागीकरण), त्यामुळे एखादे असे घातक रसायन अन्नसाखळीत सोडले गेले तर ते परत काढून घेणे केवळ अशक्यप्राय आहे. तीन, जैवसंस्था ही प्रचंड गुंतागुंतीची प्रणाली (system) आहे. बहुतेक जीव अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून, आणि वनस्पती परागीकरणासाठी जवळपास पूर्णपणे (अंदाजे ७५%) मधमाश्या, फुलपाखरे, वटवाघूळ अशा जीवांवर अवलंबून असतात. त्यामुळे, उदाहरणार्थ, अशा प्रकारच्या विषामुळे परागीकरणास मदत करणाऱ्या जीवांचा नाश झाला तर वनस्पतींचे परागीकरण होणार नाही, आणि पर्यायाने इतर जीवांना अन्न मिळणार नाही.
जनुकीय तंत्रामुळे कशाप्रकारचे घातक परिणाम होवू शकतात याचे हे झाले एक उदाहरण. पण अन्नसाखळी, जीवशास्त्रीय आणि रासायनिक पातळीवरील प्रचंड परस्परावलंबित्व आणि गुंतागुंत यामुळे असेच अनेक दुष्परिणाम घडून येवू शकतात ज्याची आपण आत्तापर्यंत अपेक्षा केलेली नाही. आणि त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे काही वेळा असे परिणाम घडून येवू शकतात, ज्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आणणे शक्य होणार नाही.
त्यामुळे अत्यंत खात्रीपूर्वक शहानिशा झाल्याशिवाय असे तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या बाहेर आणले जावू नये, ही एक अत्यंत रास्त अपेक्षा आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रयोगाशाळेबाहेर आणण्यातील ही झाली रासायनिक-जीवाशास्त्रीय अडचण, पण दुसरी, अत्यंत धोकादायक अडचण म्हणजे तांत्रिक अडचण. अर्थात अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानामुळे अनपेक्षित, घातक परिणाम घडून येवू नयेत यासाठी प्रत्येक पातळीवर पुरेशी सक्षम यंत्रणा उभारलेली आहे का? भारतामध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या काही पिकांच्या प्रत्यक्ष जमिनीवर चाचण्यांसाठी शासन परवानगी देवू पाहत आहे. विशेषतः महाराष्ट्रात अशा चाचण्यांना राहुरी (अहमदनगर) आणि परभणी कृषी विद्यापीठात सुरुवात झालेली आहे. अर्थात शासनाचा असा दावा आहे की, यामुळे काहीही अघटीत परिणाम घडून येवू नये यासाठी पुरेशी तांत्रिक आणि नियामक तयारी आपल्याकडे आहे. नेमकी काय तयारी आपण केलेली आहे?
१.      अशा चाचण्यांमध्ये असलेल्या संभावित धोक्यांची जाणीव झाल्यानंतर या चाचण्यांना पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी देण्यास नकार देणाऱ्या जयंती नटराजन यांची आठ दिवसात मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
२.      महाराष्ट्रात अशा पिकांशी संबंधित जीवशास्त्रीय, जनुकशास्त्रीय, आणि  विषचिकित्साशास्त्रीय धोक्यांची शहानिशा करून परवानगी देण्यासाठी, यांत्रिक अभियांत्रिकी (mechanical engineering) या विषयातील पदवी असलेल्या अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित विषयांमधील पुरेसे ज्ञान नसलेल्या तज्ञांची समिती नेमली आहे.
३.      संबंधित विषयातील तज्ञांच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने अशा चाचण्या करण्यासाठी पुरेशी यंत्रणा आपल्याकडे नाही असे ठामपणे सांगितले असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता अशा चाचण्यांना परवानगी दिली जात आहे.
४.      या चाचण्या आणि त्यातून तयार झालेल्या पिकांचे घातक दुष्परिणाम झाल्यास त्याविषयी संबंधित कंपन्यांवर काय जबाबदारी असावी याबाबत कुठलेही नियमन केलेले नाही.
५.      अशा तंत्रज्ञानाच्या गरजेचा अभ्यास झालेला नाही.
पुरेशी तयारी असल्याची ग्वाही दिली गेलेल्या आपल्या व्यवस्थेचे प्रत्यक्ष वास्तव मात्र हे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने, इतकेच नव्हे तर शेतीवरील संसदीय स्थायी समितीने अशा चाचण्या भारतात होवू नयेत अशी स्पष्ट सुचना दिली आहे. असे असताना, संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आपल्या आर्थिक आणि राजकीय बळाचा वापर करून अशा चाचण्यांना परवानगी मिळवत आहेत. अशा चाचण्यांच्या बरेवाईट निकालावर केवळ संबंधित कंपन्यांचे भवितव्य आणि आर्थिक गणित अवलंबून नसून, तो आपल्या सुरक्षित अन्नाचा, आरोग्याचा, आणि जीवन-मरणाचा त्यामुळे सर्व स्तरातून याला विरोध करण्याची गरज आहे. हा घातक प्रकार थांबविण्यासाठी भारतातील शेतकरी व इतर जागरूक नागरिक आंदोलन छेडण्याच्या व सत्याग्रह पुकारण्याच्या विचारात आहेत. आपण सर्वांनी त्याला जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी खालील व्यक्तींसोबत संपर्क करावा.
                                                            गणेश बिराजदार, gsbirajdar516@gmail.com
अधिक माहिती व कृतीसाठी संपर्क (कोरडवाहू गटातर्फे) :
तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com 
तेजश्री कांबळे, tejashri2211@gmail.com    

No comments:

Post a comment