'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

Good morning Sir !

सुनील काका सांगत आहेत त्यांनी पाहिलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीच्या एका उपक्रमाबद्दल...


“ठाणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव केळथन. Advertising क्षेत्रातील उच्चपदावर काम करणारे श्रीयुत नितीन ओरायन स्वत:च्या शोधात २००२ साली इथे येतात आणि त्यांना आयुष्याचा मार्ग सापडतो. हसत-खेळत गप्पा-गोष्टी, खेळ व इतर मनोरंजक मार्गांचा वापर करून लहान मुलांचे शिक्षण. रचनावादी शिक्षण आणि मुलांच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने उभे राहिले Learning Space Foundation.     
जिल्हा परिषद शाळा, केळथन
ऑगस्ट महिन्यातील एके दिवशी आम्ही केळथनला निघालो. केळथनला पोहोचण्याआधी आम्ही अवचितपाडा येथील एका शाळेस भेट दिली. चहूबाजुनी दूरदूर पसरलेली भात शेती आणि मधेच ही टुमदार दोन खोल्यांची जिल्हा परिषदेची शाळा. तेथे दुसरीच्या इयत्तेतील मुलांना आम्ही भेटलो. अर्थातच प्रथम बुजलेली मुले, हळू हळू मुक्तपणे गप्पा मारू लागली आणि थोड्याच वेळात Good Morning, My name is Suhas. I am happy to meet you असं अतिशय अस्खलित व शुद्ध उच्चारात बोलू लागले. आम्हाला हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. कारण मुलांचे उच्चार अतिशय स्पष्ट होते.
            जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना चांगल्या प्रतीचे इंग्रजी शिकवण्याकरिता शिक्षक उपलब्ध होत नाहीत हे सर्वांनाच ठाऊक आहे. श्री. ओरायन ह्यांनी हे जाणून, Tata Interactive Systems तर्फे लहान मुलांना आवडतील अश्या शैक्षणिक DVDs तयार करून घेतल्या. त्यात मुलांना आवडेल असे कार्टून्स, त्यांच्या परिसरातील वातावरण निर्मिती (शेत, झाडे, ओढा, गाय, बैल इ.) आणि त्यांना शिकवण्यासाठी एक रामुकाका उभे केले. रामुकाका गोष्ट आणि कविता सांगत सांगत एकेक शब्द स्पष्टपणे उच्चारतात आणि मुले त्यांच्यामागून म्हणत जातात. १०-१५-२० वेळा तोच शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडतो आणि मुलांचे उच्चार आपोआप स्पष्ट होऊ लागतात. 
Learning Space Foundation ने सर्वप्रथम शिक्षकांना training दिले, त्यांचे उच्चार (शक्य तितके) सुधारले, DVDs वापर कसा करावा आणि कुठे कुठे मार्गदर्शन करावे हे सांगितले. Learning Space Foundation ने वाडा तालुक्यातील २८ जिल्हा परिषदेच्या शाळेत असा उपक्रम राबविला आहे. तसेच लातूर येथे ११०० व रायगड येथे ३०० शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेसाठी ह्या सर्व DVDs विनामूल्य उपलब्ध आहेत. Learning Space Foundation चा भर जिल्हा/ तालुका / ब्लॉकमधील अनेक शाळांना एकत्र घेऊन हा उपक्रम राबवण्यावर आहे. नुकतेच सुहास शिगमने त्याच्या शाळेसाठी Learning Space Foundation बरोबर चर्चा सुरु केली आहे. कदाचित पुढच्या वर्षी जावडेच्या शाळेतील विधार्थी तुम्हाला Good Morning Sir, How are you today? असे विचारतील.”
सुनील चव्हाण, sunil3924@gmail.com

No comments:

Post a comment