'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

आपलेच प्रश्न आपलेच उत्तर

देवाजी तोफांसोबत मोकळ्या गप्पा

सागर पाटील (निर्माण ५) आणि मित्रमंडळींनी लेखा-मेंढा येथे भेट दिली. गावात सामूहिक प्रयत्नांतून ग्रामदान, वनहक्क ह्या चळवळी उभी करणारे, “दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकारही घोषणा देणारे व ग्रामस्वराज्यचा वसा घेऊन काम करणारे देवाजी तोफा त्यांना भेटले. पांढरा सदरा आणि धोतर घालणारे देवाजी अगदी कुठल्याही गावकर्याूसारखे दिसतात. पण त्यांच्याशी बोलताना शहाणपणाचे फटकारे मिळत राहतात. त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा सारांश...

आदिवासी संस्कृती व शिक्षणपद्धती याविषयी त्यांची मते जाणून घ्यायची असा आमचा उद्देश होता.
            आदिवासी संस्कृती नैसर्गिक व निसर्गपूरक आहे. या आदिवासी बांधवाना सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला मुख्य प्रवाहात आणू, पण देवाजींचा प्रश्न होता की मुख्य प्रवाह म्हणजे कोणता प्रवाह ? आणि तो बरोबर आहे का ? ते पुढे म्हणाले, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचं अस म्हणतात, आणि त्यासाठी सर्व्हे करतात. अशा एका सर्व्हेच उदाहरण देताना ते म्हणाले, आदिवासी गावामध्ये एक सर्व्हेअर गेला व नेहमी प्रमाणे आपल्या प्रश्नाचा भडीमार सुरु केला. मध्यस्थाच्या मदतीने, त्याने विचारलं तुमचं नाव-गाव-वय असे प्रश्न झाल्यानंतर तो म्हणाला, “तुमची जात कोणती?” त्याचं उत्तर तो आदिवासी देतो, “कोया”. मग तो पुन्हा विचारतो. पुन्हा “कोया” असेच उत्तर. अस दोन तीन वेळेस झाल्यानंतर तो विचारतो, “कोया म्हणजे काय”. आदिवासी म्हणतो कोया म्हणजे मी. कोया म्हणजे माणूस.
            यावर विचार केल्यानंतर अस वाटलं की, जो आदिवासी स्वत:ची जात माणूस म्हणवतो त्याला आपण मुख्य प्रवाहात आणणार की आपण त्या प्रवाहात जावं, असा प्रश्न कुणालाही पडला असता. आपला मुख्य प्रवाह म्हणजे नेमका कोणता प्रवाह याच उत्तर म्हणजे हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई, अमीर–गरीब , ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शुद्र, सुशिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण-आदिवासी व गांधीवादी-आंबेडकरवादी अजून इतर कुठले वाद असे किती तरी प्रवाह आपण आज निर्माण केले आहेत. आणि आपण म्हणतो की आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणणार ? कुठला योग्य-अयोग्य हे आपल्यालाच  माहित नाही, आणि आपला स्वत:चा प्रवाह तरी आपणास माहित आहे का ?


            शिक्षणाविषयी ते म्हणाले, इंग्रज येण्याआधी भारतीय संस्कृती महान होती. आता ती गहाण झाली आहे. सर्वांना एकाच पद्धतीचं शिक्षण देण्यामुळे आपण आर्थिक व मानसिक गुलामीत अडकत आहोत. सध्याचे शिक्षण हे डिग्री, नौकरी व पैसा ह्या तीन गोष्टीभोवती फिरते आहे. आजचे  शिक्षण माणसाला पंगु बनविते. आज आपण अर्धशिक्षित युवांची फौज निर्माण करीत आहोत. पुढे ते म्हटले की बदलो बदलो शिक्षा, नही तो मांगनी पडेगी भिक्षा.
            शिक्षण कशासाठी हवे  तर जगणे सुलभ व्हावे यासाठी. कारण जगणे हा जीवनाचा मुलभूत उद्देश आहे. जर प्रश्न आपला असेल तर त्याच उत्तर पण आपणच शोधूया. म्हणजेच आपले प्रश्न आपले उत्तर. ह्यावर त्यांनी एक उपाय सांगितला तो आहे. गोटूलचा. गोटूल हे आदिवासींच्या जीवनपद्धतीचं शिक्षण देणार जीवन शिक्षण केंद्र. यात सब गुरु सब चेला असतात. आपल्या बोलीभाषेसकट, जीवनासाठी आवश्यक असणारी कौशल्ये व कला येथे शिकवली जात. जीवनात माणूस म्हणून कस जगता येईल त्याच शिक्षण देण्याचे केंद्र म्हणजे गोटूल.
            पुढे लोकशाही बद्दल ते म्हणाले, “जिथे जल-जंगल-जमीन-हवा ह्यावर जनतेचा अधिकार असेल ती लोकशाही. जिथे आपल्याला सगळ्या गोष्टींची मागणी करावी लागते ती कसली लोकशाही. म्हणजे सरकार देईल तर घेऊ. आजची लोकशाही म्हणजे सगळ सरकारी आम्ही भिकारी. दिल्लीत जर आमच सरकार असेल तर गावात आम्हीच सरकार. लोकशाहीत माणूस हा केंद्रबिंदू असतो त्याजागी सत्ता व पैसा आला तर गडबड होईल”. लोकशाहीतील आंदोलनाविषयी ते म्हणतात, “आपणच सरकार असताना मागता कुणाकडे तुम्ही?. लोकशाहीत आंदोलन करणे म्हणजे स्वत:च्या नाकावर निंबू पिळणे होय. अशी लोकशाही तुम्हाला पाहिजे का?”
            निघताना मला स्वत:ला प्रश्न पडला होता की मी खरच लोकशाहीत राहतो का ? तुम्हाला काय वाटतं?
सागर पाटील, sgpatil4587@gmail.com

No comments:

Post a comment