'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

जी.एम. पिकांबाबत सावध करण्यासाठी अमेरिकन जनतेने लिहिलेले खुले पत्र

२१ नोव्हेंबर,२०१४
वैज्ञानिक, सुप्रसिद्ध व्यक्ती, असरकारी संस्था (NGO), खाद्यवस्तू निर्माते आणि इतरांनी ५७ दशलक्ष अमेरिकनांचे प्रतिनिधित्व करणारे खुले पत्र इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियनला लिहिले आहे. जी.एम. पिके जोखमी असल्याचा गंभीर इशारा देणारे हे पत्र इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिले गेले शिवाय प्रत्येक संसद सदस्य आणि प्रमुख माध्यम वाहिन्यांनीही हे पत्र पोचते केले आहे.
            पत्रात गेल्या दोन दशकात जी.एम. पिके शेतात पेरण्याचा आणि जी.एम. खाद्यान्न सेवनाचा नुकसानकारी अनुभव दिला आहे. जी.एम. बियाणे आणि पिकांवर जैवतंत्रज्ञान (Biotechnology) क्षेत्रांतील मुठभर कंपन्यांचे नियंत्रण आहे. युरोपियन युनियनवर बड्या कंपन्या आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील दलाल (lobbyist) मंडळींचा दबाव असल्याचाही उल्लेख या पत्रात आहे.

            “जी.एम. बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होईल आणि उत्पादन वाढेल हा कंपन्यांचा दावा पूर्णपणे फसला आहे. शिवाय तणनाशकांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ, परंपरागत बियाण्यातील प्रदूषण आणि ऱ्हास, निर्यात व्यापारात घट, तणनाशकांना न जुमानणारे तण (Superweed) आणि कीटकनाशकांना दाद न देणारे किडे (superbug), शेतातील मित्र-सजीवांवर (सूक्ष्मजीव,पक्षी,किडे इ.) होणारा परिणाम, खाद्यान्न आणि मातेच्या दूधात सापडलेले तणनाशकांचे अंश” इ. माहिती या पत्रात आहे.
            जी. एम. खाद्यान्नांचे प्राणीमात्रांवर होणारे परिणाम, जी.एम. खाद्यान्नाच्या सुरक्षिततेबाबत वैज्ञानिकांमध्ये असलेली मतभिन्नता हेही मुद्दे या पत्रात आहेत.
Third World Network
131, Jalan Macalister
10400 Penang
Malaysia

  जी.एम.ओ. (Genetically Modified Organisms) सोबत जगताना : अमेरिकेतून आलेले पत्र
            आम्ही अमेरिकेतील नागरिक जी.एम.पिकांचे शेतातील आणि अन्य अनुभव तसेच आमच्या खाद्यान्न पुरवठ्यात होत असलेल्या जी.एम.च्या भेसळीबद्दल लिहीत आहोत.
            आमच्या देशातील अर्धी जमीन आज जी.एम. पिकांखाली आहे; ९४% सोयाबीन, ९३% मका आणि ९६% कापूस जी.एम. आहे(i).
            इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियनने (EU) जी.एम. अजून पर्यंत आमच्यासारखी स्वीकारलेली नाहीत. मात्र त्यासाठी तुमच्यावर बड्या कंपन्या, जैवतंत्रज्ञानाचे दलाल (lobbyist)  आणि शासनाचा प्रचंड दबाव आहे.
            हे तंत्रज्ञान अयशस्वी असल्याचे आमचे मत झाले आहे. मतगणनेनुसार ७२% अमेरिकनांना जी.एम. अन्न नको आहे आणि ९०% पेक्षा अधिकांना जी.एम. खाद्यान्नावर लेबल हवे आहे(ii).
            जनमताचा कौल अशा प्रकारे जी.एम.विरोधी असताना आमच्या संघीय आणि राज्य सरकारांनी अधिक प्रभावी नियंत्रण ठेवावे, किमान लेबलिंग तरी व्हायला हवे. मात्र याविरुद्ध भरपूर पैसा आणि प्रभाव वापरून बायोटेक आणि खाद्यान्न कंपन्या कारवाया करीत आहेत(iii,iv,v).
            तुम्हाला पर्याय निवडताना मदत व्हावी म्हणून जी.एम. पिकांबाबातचे गेल्या दोन दशकांचे अनुभव आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. यातून तुम्हाला संभाव्य धोक्याची जाणीव होईल अशी आशा आहे.
वचनभंग-
            जी.एम. बियाण्यांमुळे  उत्पादन वाढेल, कीटकनाशक रसायनांचा वापर कमी होईल असा प्रचार करून हे बियाणे बाजारात आणले गेले मात्र प्रत्यक्षात यापैकी काहीच झाले नाही(vi). जी. एम. बियाण्यांपासून मिळणारे उत्पादन त्याच पिकांच्या इतर बियाण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असू शकते असा निष्कर्ष खुद्द अमेरिकन सरकारचा ताजा अहवाल सांगतो(vii).
            जी.एम. बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात मोठी वाढ होईल असे सांगितले गेले होते मात्र अमेरिकन कृषी खात्यानुसार वास्तविकता वेगळीच आहे(viii).एकीकडे नफ्यात खूपच चढ-उतर आहेत. तर दुसरीकडे जी.एम. पिकांचा उत्पादनखर्च सतत वाढत आहे(ix).
            जी.एम. बियाण्यांच्या पुनर्वापरास कायद्याने बंदी आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी हे बियाणे कंपन्यांकडून विकत घेणे अपरिहार्य आहे. या बियाण्यांच्या किंमतीवर बायोटेक कंपन्यांचे नियंत्रण आहे. जी.एम. बियाण्यांसाठी ३ ते ६ पट अधिक किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते(x). शिवाय जी.एम. पिकांना इतर रसायनेसुद्धा लागतात. त्यामुळे परंपरागत पिकांपेक्षा जी.एम. पिकांना अधिक खर्च लागतो.
            जी.एम. पिकांवर भर दिल्यामुळे परंपरागत वाणांचे बियाणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या पसंतीचे बियाणे वापरण्याची संधीच नाही परिणामी एकूण पीक नियोजनसुद्धा शेतकऱ्याच्या नियंत्रणात नाही(xi).
            ज्या शेतकऱ्यांनी जी.एम.पिके पेरायची नाहीत असे ठरवले आहे त्यांची पिके परिसरातील जी.एम. पिकांमधून निघणाऱ्या परागकणांमुळे (Cross pollination) प्रदूषित होऊ शकतात(xii). शिवाय साठवणूक करताना सुद्धा दोन्ही प्रकारची पिके एकमेकांत मिसळू शकतात.
            यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या हातून निर्यात व्यापार निसटत आहे. अनेक देशांनी जी.एम.पिके पेरण्यावर अथवा आयातीवर बंधने घातली आहेत किंवा संपूर्ण प्रतिबंध आहेत(xiii). आणि यामुळेच काही निर्यात व्यवहार जी.एम. भेसळीपायी वादग्रस्त ठरले आहेत(xiv).
            अमेरिकेतील सेंद्रिय शेतीचा उमलत्या बाजारावरही परिणाम झालेला आहे. अनेक सेंद्रिय शेतकऱ्यांचे बियाणे उत्पादनाचे करार प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे रद्द झालेत. ही समस्या वाढत आहे आणि भविष्यात ती आणखी वाढू शकते.
तणनाशके आणि महातण (Pesticides & superweed)-
            जी.एम.पिकांमध्ये ‘राउंडअप रेडी’ या तणनाशक सहिष्णू (H.T.) प्रकारचा भरणा अधिक आहे. यात सोयाबीन आणि मका सर्वाधिक आहे. ग्लायफोसेटयुक्त राउंडअप तणनाशकांची फवारणी केल्यावर तण मरते मात्र पिकांची वाढ होत राहते अशी यात योजना आहे.
            तणांमध्ये प्रतिरोधशक्ती (Resistance) विकसित झाल्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशकांचा वापर वाढवावा लागतो आणि या वाढत्या वापरामुळे (तणनाशकांना) न जुमानणाऱ्या महातणांची (superweed) निर्मिती आणि त्यापायी आणखी जास्त तणनाशकांचा वापर असं हे दुष्टचक्र निर्माण झालं आहे.
  
          ताज्या पाहणीनुसार १९९६ ते २०११ चे दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी राउंडअप रेडी (तणनाशक सहिष्णू) पिके पेरली होती त्यांना इतर (बिगर जी.एम.) पिके पेरणाऱ्यापैकी २४% अधिक तणनाशके वापरावी लागली होती(xv).
            राउंडअप रेडी पिकांचा याच प्रमाणे वापर होत राहिल्यास तणनाशकांचा वापर दरवर्षी २५% वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपला भविष्यकाळ निश्तितच सुखद नसेल. गेल्या १० वर्षात ग्लायफोसेटला न जुमानणाऱ्या १४ नवीन जाती निर्माण झाल्या आहेत(xvi,xvii).
            जी.एम. बियाणे आणि तणनाशके दोन्हीही विकणाऱ्या बायोटेक कंपन्यांनी यावर उपाय म्हणून 2-4 D आणि Dicamba सारखी अधिक विषारी तणनाशके सहन करू शकतील असे बियाणे विकसित करण्याचे सुचविले आहे.
            अशा प्रकारची अधिक जहाल रसायने सहन करू शकतील अशा वाणांना परवानगी मिळाल्यास तणनाशकांचा वापर ५०% ने वाढण्याचा अंदाज आहे(xix).
पर्यावरणीय नुकसान-
            राउंडअप रेडी पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांचा नैसर्गिक पर्यावरणावर घातक परिणाम होत असल्याचे निष्कर्ष आहेत. उदा. राउंडअप मुळे मिल्कविड मरते, यावर मोनार्क बटरफ्लाय जगतात(xx). मधमाशा आणि त्यासारख्या इतर महत्वाच्या किड्यांवर या तणनाशकांचा आघात होतो(xxi).
            जमिनीसाठी सुद्धा ते नुकसानकारक आहे, जमिनीचे स्वास्थ्य सांभाळणाऱ्या आणि पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणाऱ्या भू-जीवांचा या तणनाशकांमुळे नाश होतो(xxii,xxiii).
            बी.टी. पिकांमध्ये आपोआप कीटकनाशक तयार होण्याचे तंत्र विकसित केले आहे. अशी पिके सुद्धा मित्र किडींसाठी (उदा. Green lecewings, Daphia magna waterflea, ढाल किडे, पाण्यातील किडे) घातक आहेत(xxiv,xxv,xxvi,xxvii).
            बी.टी. विषाबाबत (Toxin) किड्यांमध्ये प्रतिरोध शक्तीसुद्धा निर्माण होत आहे(xxviii). यातून महाकीड (superbug) निर्माण होते, कीटकनाशकांचा वापरही वेगवेगळ्या वेळी वाढवावा लागतो(xxix). इतके असूनसुद्धा अमेरिकेत मका आणि सोयाबीनच्या नवीन B.T. वाणांना मान्यता दिली गेली; लवकरच त्याची लागवड सुरु होईल.
मानवी आरोग्याला धोका-
            जी.एम. पिकांचे अंश आमच्या अन्नसाखळीत सर्वत्र आहेत. अमेरिकेत प्रक्रिया केलेल्या खाद्यवस्तूंपैकी ७०% पदार्थांमध्ये जी.एम. युक्त घटक असल्याचा अंदाज आहे. यात जी. एम. युक्त पशुखाद्य दिल्या जाणाऱ्या प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ धरल्यास हा आकडा बराच वर जाईल.
            राउंडअप पिकांमध्ये ग्लायफोसेट आणि त्याच्या विघटनानंतर तयार होणाऱ्या AMPA चे अंश इतर पिकांपेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याचे संशोधनाचे निष्कर्ष आहेत(xxx).
            अमेरिकन मातांच्या दूधात, लघवीत आणि पेयजलातसुद्धा ग्लायफोसेटचे अंश आढळले आहेत(xxxi). मातांच्या दुधामधील ग्लायफोसेट चे अंश खूपच जास्त (युरोपमधील पेयजलातील किमान मर्यादेपेक्षा १६०० पटीने अधिक) होते.
            ग्लायफोसेट रसायन हार्मोन्स मध्ये मोडतोड करते त्यामुळे मातेचे दूध आणि पेयजलातून जाणारे ग्लायफोसेटचे अंश बालकांसाठी धोकादायक ठरू शकतात(xxxii).
            नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार हे तणनाशक शुक्राणूंसाठी विषारी आहे(xxxiii).
            बी.टी. विषाचे अंश सुद्धा माता आणि बालकांच्या रक्तात सापडले आहेत(xxxiv).
            जी.एम. खाद्यान्नाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी कोणत्याही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत; त्याआधीच ते मानवाच्या अन्नसाखळीत आणले गेले. या खाद्यान्नाचे शरीरावर होणारे परिणाम- शरीरात याचे अंश साठणे अथवा प्रवाहित होणे इ.बाबत कोणत्याही सरकारने अथवा जी.एम. खाद्यान्न विकसित करणाऱ्या कंपनीने अध्ययन केलेले नाही.
            जी.एम. खाद्यान्न आणि/अथवा ग्लायफोसेट तणनाशकांच्या प्राण्यांवरील परिणामांबाबतच्या अभ्यासाचे चिंताजनक निष्कर्ष असे आहेत- यकृत, मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवाचे नुकसान, आतड्यातील पेशी आणि सूक्ष्मजीवांचे नुकसान, प्रतिकारशक्ती बाधित होणे, प्रजाननातील अपसामान्यता आणि ट्यूमरसुद्धा.
            या अभ्यासाचे निष्कर्ष, मानवावर होऊ शकणाऱ्या जी.एम. खाद्यान्नाच्या गंभीर परिणामांकडे निर्देश करतात. अगदी आरंभी जेव्हा आमच्या देशाने जी.एम. खाद्यान्न स्वीकारले तेव्हा या परिणामांबाबत पूर्वानुमान करणे शक्य नव्हते. मात्र, ज्यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायची तेच आजही या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत.
            बायोटेक कंपन्यांनी पैसे पुरवून करून घेतलेले कालबाह्य अभ्यास आणि त्यांनी दिलेली अन्य माहिती आमचे नियामक प्रमाण मानतात आणि जी.एम. खाद्यान्नाच्या मानवी आरोग्यावर होऊ शकणाऱ्या परिणामांना नाकारले जाते.
हे विज्ञान नव्हे-
            स्वतंत्र वैज्ञानिकांचे जी.एम. खाद्यान्नाबाबतचे निष्कर्ष आणि कंपन्यांद्वारे प्रकाशित माहिती यात प्रचंड तफावत आहे.
            २०१३ साली जगभरातील ३०० स्वतंत्र वैज्ञानिकांनी जाहीरपणे जी.एम. खाद्यान्नाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते जी.एम. खाद्यान्नाच्या सुरक्षिततेबाबत एकमत नाही आणि स्वतंत्रपणे केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष गंभीर स्वरूपाचे आहेत(xxxiv).
            स्वतंत्र वैज्ञानिकांना आपले निष्कर्ष जाहीर करणे सोपे नाही; त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. कंपन्यांचे समर्थन करणाऱ्या वैज्ञानिकांनी त्यांची खोटी निंदा केली. संशोधनासाठी निधी नाकारला गेला, काही ठिकाणी त्यांच्या नोकऱ्या आणि भविष्यावर सुद्धा गदा आली(xxxvii).
खाद्य पुरवठ्यावर नियंत्रण-
            आमच्या अनुभवातून लक्षात येते की खाद्यान्नामध्ये जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering) आम जनतेच्या हिताची नाही.
            भुकेची समस्या सोडविण्यासाठी अथवा शेतकरी हितासाठीही ते नाही. ग्राहकांचे सुद्धा हित नाही. यातून खाद्यान्न व्यवस्थेवर खाजगी कंपन्यांचे नियंत्रण मात्र साध्य होईल.
            दैनंदिन जीवन, अन्नसुरक्षा,विज्ञान आणि लोकशाही व्यवस्थेवरसुद्धा या तंत्रज्ञानाचा सखोल परिणाम संभवतो. पर्यावरणस्नेही, शाश्वत शेती व्यवस्थेच्या मुळावरच हे तंत्रज्ञान आघात करणारे आहे. पारदर्शी, स्वास्थ्यवर्धक खाद्यान्न पुरवठा यामुळे बाधित होईल.
            आजमितीस अमेरिकेत बियाण्यांपासून तर आतापर्यंत उत्पादन,वितरण,पणन,सुरक्षा चाचणी,अन्नाचा उपभोग या सर्वांवर मूठभर कंपन्यांचे नियंत्रण आहे. त्यांच्यापैकी अनेकांचे जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानात हितसंबंध गुंतलेले आहेत.
            आधी ते समस्या निर्माण करतात. नंतर ते आपल्याला त्या समस्यांवरील तथाकथित उपाययोजना विकतात, त्यातून नफा कमावला जातो. इतर कोणत्याही व्यापारापेक्षा हा वेगळ्या प्रकारचा व्यापार आहे.
            आपल्या सगळ्यांना भूक लागतेच. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने हा विषय काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.
आता बोललेच पाहिजे-
            जी.एम. पिकांचे तंत्रज्ञान जोखमी आणि सिद्ध न झालेले आहे. अमेरिकेत या तंत्रज्ञानाचे हानिकारक परिणाम नजरेस येत आहेत.
            जी.एम. पिकांचे एवढे फायदे नाहीत की त्यांच्या दुष्परिणामांकडे डोळेझाक करता येईल. युरोपियन युनियन (EU) ने हे लक्षात घ्यावे. जे अधिकारी ह्या वास्तवाकडे कानाडोळा करतात ते आपल्या कर्तव्यात कसूर करतात. आम्ही अमेरिकनांनी केलेल्या चुकांची आपल्याकडे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमचे अनुभव आपल्यापुढे ठेवत आहोत.
            जी.एम. (जनुकीय परिवर्तीत- Genetically modified) पिकांना आपण मान्यता देऊ नये, ज्या पिकांना परवानगी दिली गेली आहे ते पेरू नये, जी.एम. बाधित पशुखाद्य आणि मानवी खाद्यान्नाची आयात आणि/अथवा विक्री नाकारावी.
            कार्पोरेट कंपन्यातर्फे होणारे राजकारण, नियमन (Regulation) आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या ढवळाढवळीबद्दल आपण आवाज उठवावा.
            इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियन (EU) जी.एम. पिके आणि खाद्यान्नाची नवी बाजारपेठ झाले तर ‘जी.एम. लेबलिंग’ आणि नियमनाची मागणी करणे अशक्य नसले तरी आम्हाला अधिकच कठीण होईल. आमचे प्रयत्न असफल झाले तर युरोप जी.एम. मुक्त ठेवणेही तुम्हाला शक्य होणार नाही.
            आपण एकत्र मिळून-मिसळून काम केल्यास विश्व स्तरावर खाद्य व्यवस्थेचे आपण पुनरुज्जीवन करू शकू. त्यातून स्वस्थ, सुपीक जमीन, स्वस्थ शेती व्यवस्था, आरोग्यदायी भोजन आणि स्वस्थ नागरिक घडतील.

The Ecologist
संदर्भ- (i ते xxxvii)
http://www.theecologist.org/blogs_and_comments/commentators/2632105/living_with_gmos_a_letter_from_america.html
अनुवाद- श्री.वसंत फुटाणे
‘संवाद’ रवाळा
पोस्ट-सातनूर, तहसील-वरुड
जिल्हा-अमरावती
पिन- ४४४९०७
मोबाईल क्र.- ९४२२९५८७६७
अधिक माहितीसाठी :
स्रोत: तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com

आणि तेजश्री कांबळे, tejashri2211@gmail.com

No comments:

Post a comment