'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी

भाग ४:
            भारत आणि पाकिस्तानमधल्या सामान्य जनतेच्या मनातील एकमेकांबद्दलचे असलेले संशय, गैरसमज दूर करून दोन्ही देशातील शांतता व लोकशाही सुदृढ करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसीचे काम गेल्या २२ वर्षात अनेक पटीने वाढले व त्यांनी इतर विषयांना हात घालण्यास सुरुवात केली. मच्छीमारांच्या अटकेचा प्रश्न, सियाचीन याचबरोबर काश्मीर मधील होत असेलेले मानवी हक्कांचे उल्लंघन याविषयी फोरमने अनेकदा ठाम भूमिका घेण्यासोबतच जनजागृती करण्याचे कामही केले आहे.
            याचसोबत दोन्ही देशातील नागरिक एकत्र येण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यापैकी एक कार्यक्रम म्हणजे दर वर्षी १४ व १५ ऑगस्टच्या मधील रात्रीत वाघा बोर्डरवर एकत्र केले जाणारे सेलिब्रेशन. दर वर्षी १५ ऑगस्टच्या रात्री वाघा बोर्डरपाशी दोन्ही देशातील सामान्य लोक एकत्र येतात यावेळी सुरुवातील फाळणीच्या वेळी जीव गमवाव्या लागलेल्या असंख्य लोकांना मेणबत्त्या लावून श्रद्धांजली दिली जाते. यानंतर दोन्ही देशातील लोक परस्परांना स्वतंत्रतेच्या शुभेच्छा देतात. यावेळी हिंद-पाक दोस्ती जिंदाबादचे नारे दिले जातात. या कार्यक्रमां च्या संयोजनात पंजाब फोक्लोर मंचसोबतच फोरम देखील पुढाकार घेते.
            भारत पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांमध्ये सतत तेढ राहावी म्हणून दोन्ही देशात सुरुवातीपासूनच जाणून बुजून प्रयत्न केले गेले. याचेच एक उदाहरण द्यायचे झाले तर फोरमचे एक जुने भारतीय सदस्य, फोरमच्या एका Joint-Convention ला ते पाकिस्तानला गेले असता एके दिवशी ते सहज बाहेर पडले. त्यादिवशी रविवार नसून सुद्धा सर्व दुकाने, शाळा, ऑफिसेस बंद होते त्यांना प्रश्न पडला; म्हणून त्यांनी एका पाकिस्तानी सहकार्याला याचे कारण विचारले. त्याने सांगितले,” भारतासोबत झालेल्या एका युद्धात याच दिवशी आमचा विजय झाला होता तेव्हा पासून हा दिवस विजय दिनम्हणून साजरा केला जातो.यांच्या चेहऱ्यावर एकदम प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ते म्हणाले, “अहो आम्हाला तर अस सांगितल जातं की त्या युद्धात भारताचा विजय झाला होता!”. दोघांनाही कळेना नेमकं काय झालं आणि याचवेळी शेजारी उभा असेलेला एक म्हातारा या दोघांना उद्देशून म्हणाला, “उस जंग मे ना भारत जिता था, ना पाकिस्तान. जिते वो लोग थे जो हथियार बनाते हे.
            हे एक वाक्य, हा एक संवादच सगळं सांगून जातो. युद्धात कोणत्याही देशाची हार-जीत होतच नाही. जिंकतात फक्त ते लोक जे हे युद्ध इतरांवर आणि पर्यायाने देशावर लादतात. जिंकतो तो हटवादीपणा, आणि हरते ती माणुसकी. पण दुर्दैव असे की जे लोक हे युद्ध लादतात ते मात्र प्रत्यक्षात युद्धात कधी भाग घेतच नाहीत. ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसून फक्त बघ्याची भूमिका घेत असतात आणि त्यांच्या एका निर्णयामुळे हजारो-लाखो लोक मात्र हकनाक स्वतःचा जीव गमावतात. हे लोक जेव्हा स्वतःच्या घरात शांतपणे T.V. वर युद्धाचे News Bulletins / War Stories मोठ्या हौसेने बघत असतात, त्याचवेळी हजारो लोक स्वतःचा जीव पणाला लावून देशासाठी रक्त सांडत असतात. स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या ह्या लोकांना त्यांच्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतायेत ह्याच्याशी देणंघेणं नसतं.
            पाकिस्तानशी युद्ध छेडा, टाकून द्या एक अणुबॉम आणि संपवून द्या सगळ; असं म्हणणं खूप सोपं असत, पण ज्यांचे नातलग त्यांच्यापासून हजारो किलोमीटर दूर स्वतःच्या प्राणांची बाजी या देशासाठी लावत असतात ना, त्यांना जाऊन एकदा विचार युद्ध म्हणजे काय असत ते? शहीदांचे फोटो फेसबुकवरून शेअर करणं सोपं असतं, पण ते वास्तव जगणं किती कठीण असतं ते तेच जाणू शकतात ज्यांनी त्यांचा मुलगा, भाऊ, पती या युद्धात गमावलाय.
            हिंसेला उत्तर हिंसेने दिल्याने प्रश्न सुटत नाहीत!
            काश्मीरमध्ये असताना, युद्धाचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या मिलिटंट्सना जेव्हा आम्ही विचारलं की ‘तुम्हाला हिंसा सोडून शांततेचा मार्ग स्वीकारावा असं का वाटलं?’ तेव्हा त्यांनी खूप मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, “कितीही लढलो तरी लढा संपवताना टेबलवर बसून समोरच्याशी चर्चाच करावी लागते, मग जर शेवट चर्चेनेच होत असेल तर सुरुवातीची हिंसा तरी कशाला करायची? त्या हिंसेला काही अर्थच उरत नाही”.
            हिंसा, युद्ध हे कधीच कुठल्या प्रश्नांचे उत्तर असू शकत नाहीत. पण हिंसा थांबवून अहिंसेचा मार्ग स्विकारायला खूप मोठ धाडस लागतं. आज पाकिस्तानमध्ये प्रचंड अशांतता आहे. धर्मांध संघटना सतत सरकारला आव्हान देत आहेत. हिंसेच्या बळावर सामान्य नागरिकांचे जगणे असह्य करत आहेत. पाकिस्तानमधील लोकशाही बळकट होण्यासाठी पाकिस्तानला मदत करणं गरजेचं आहे. कारण तुमचा शेजारी जर जळत असेल तर त्या आगीची झळ तुमच्या घरालादेखील लागल्यापासून राहणार नाही, आणि याचवेळी आपल्याला पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी सारख्या फोरमच महत्व कळतं.
             पुढील काळात दोन्ही देशातील संबंध सुधारावेत म्हणून PIPFPD, ‘अमन की आशा’ सारखे अनेक मंच काम
करत आहेत. पण भविष्यात अश्या अनेक संस्था, संघटना आणि उपक्रमांची गरज अधिकाधिक लागणार आहे याबद्दल दुमत नसावे. ६८ वर्षाचे वैर, संशय, गैरसमज इतक्या सहजासहजी दूर होणार नाहीत हे जरी खरे असले तरी ६८ वर्षे वेगळे असण्याचा काळ २००० वर्षांच्या एकत्रित इतिहासावर नक्कीच जड होणार नाही हेदेखील तितकेच खरे. मात्र हे इतके सहज सोपे नाही यासाठी ठोस उपक्रमांची आणि अनेक लोकांच्या मदतीची, सहकार्याची, पाठबळाची गरज कायम राहणार आहे. हे अस होईल का? याला उत्तर एकच. करके देखो!
समाप्त.


स्रोत: अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a Comment