'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

गणेश बिराजदारचे धरामित्र सोबत काम सुरु

“आपल्याला सर्वांना प्रश्न पडतात. पुस्तक वाचताना, लोकांशी बोलताना व सभोवतालची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पाहताना मला एक गोष्ट जाणवली - आपण प्रश्न कसे समजून घेतो ह्यावरच आपण ते कसे सोडवतो हे ठरते. कित्येकदा एखादा प्रश्न वर्षानुवर्षे न सुटण्याचे कारण हे संसाधनांची चणचण नसून, तो प्रश्न समजून घेण्यात झालेली चूक असते." हे विचार आहेत निर्माण ३ च्या गणेश बिराजदारचे.
            गणेशने मॉडर्न कॉलेज मधून सायकोलॉजी मध्ये बी. ए. पुर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्याने अलाहबाद विद्यापीठातील Center of Behavioural and Cognitive Sciences येथे प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण घेताना व त्यांनतरही, 'विविध लोक एखाद्या प्रश्नाकडे कसे बघतात व त्यांच्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा, ते सोडविण्यासाठी शोधलेल्या उपायांवर कसा परिणाम होतो' हा गणेशच्या अभ्यासाचा विषय होता. पदव्युत्तर शिक्षण झाल्यावरही ह्याच विषयावर अभ्यास करण्याचे गणेशने ठरविले. मात्र ह्याबद्दल पूर्वी झालेला रिसर्च बघत असता त्याला असे लक्षात आले की ह्या विषयाबद्दलचे साहित्य पर्यावरण, अर्थशास्त्र, शेती अशा विविध विषयांमध्ये विखुरले गेले आहे. कुठल्यातरी एका समस्येच्या संदर्भात हा अभ्यास करावा असे त्याला वाटले. शेतीतील समस्येंच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास करण्याचे गणेशने ठरविले. ह्यासाठी गणेशने चार महिने बीड येथे जाऊन अभ्यास केला. तेथील शेतकऱ्यांना भेटून, त्यांचे अनुभव जाणुन घेतले. हाच अभ्यास पुढे नेण्यासाठी व त्याला नेमकी दिशा देण्यासाठी, गणेश नोव्हेंबरपासून वर्ध्यातील धरामित्र संस्थेत रुजू झाला आहे.
            सेंद्रीय शेती पद्धती किंवा शाश्वत शेती पद्धतींवर बरेच संशोधन झाले असूनही त्यांना हवा तसा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळत नाही. ह्यामागे काय कारणे असावीत? सेंद्रिय शेती पद्धत अवलंबिण्यात शेतकऱ्यांना काय प्रश्न जाणवतात? शेतकरी ह्या प्रश्नांकडे कुठल्या दृष्टीकोनाने बघतात? ह्याचा अभ्यास गणेश पुढील दोन वर्षे करणार आहे. हा अभ्यास करताना तो participatory पद्धतीने व्हावा ह्यावर गणेशचा भर आहे. ह्या अभ्यासासाठी त्याला धरामित्रचे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ मार्गदर्शन करीत आहेत.
            गणेशला त्याच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !
स्रोत: गणेश बिराजदार,  gsbirajdar516@gmail.com


No comments:

Post a Comment