'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

शाश्वत शेती चळवळीच्या वर्धा, नागपूर आणि अमरावतीमधील कामांचा धावता आढावा

वर्ध्यात सुरू असलेल्या शाश्वत शेती चळवळ व ग्राम स्वावलंबनाच्या कामाशी जोडून घेण्याच्या उद्देशाने एप्रिल २०१५ मध्ये तन्मय जोशी (निर्माण ३) वर्ध्यात स्थलांतरित झाला. एप्रिल, मे व जून महिन्यांदरम्यान झालेल्या काही कामांचे इतिवृत्त..
१.      बिजोत्सव –
            आज बियाण्याबाबत शेतकऱ्याला पूर्ण परावलंबित्व आले आहे. बीज स्वावलंबनाकडे जाणे व त्याद्वारे शाश्वत शेती चळवळ मजबूत करणे या उद्देशाने बिजोत्सावाची सुरवात झाली. यात स्थानिक बियाण्यांचा वापर व संवर्धन करणारे शेतकरी एकत्र येतात आणि आपली बिजाई इतर शेतकऱ्यांसमोर मांडतात. गेली तीन वर्षे असा उपक्रम नागपूर शहरात होतच आहे. हा उत्सव गावात घेण्याची संकल्पना २५ एप्रिल रोजी सेवाग्राम जवळील करंजी भोगे या गावी राबविण्यात आली.

  कार्यक्रम होता एका आगळ्यावेगळ्या भजन संमेलनाचा! सेवाग्राम इस्पितळाचे ज्येष्ठ डॉक्टर उल्हास जाजुंना असे लक्षात आले की तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या गुरुदेव सेवा मंडळांचे गावोगावी जाळे आहे. परंतु ग्राम स्वावलंबनाचे काम सोडून ही मंडळे केवळ भजन स्पर्धांपुरती मर्यादित राहिली आहेत. या सर्व मंडळांना पुन्हा एकदा ग्राम स्वावलंबनाच्या कामात सक्रीय करण्यासाठी लोक सहभागातून एका मोठ्या भजन संमेलनाचे (स्पर्धेचे नव्हे) आयोजन करण्यात आले. या संमेलनात भाग घेणाऱ्या मंडळांना अट मात्र एक होती, ती म्हणजे - ते जे काम हाती घेणार त्यासंबंधीच भजन म्हणण्यास त्यांना परवानगी असेल. या निमित्ताने गावोगावचे जे शेतकरी तेथे जमतील त्यांच्यापर्यंत बीज स्वावलंबनाचा महत्वाचा संदेश पोहोचावा म्हणून या संमेलनाला जोडून घेतला गेला बिजोत्सव.
२.      सेंद्रिय शेती प्रबोधन –
            कीर्तन हे एक प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत एखादा विषय पोहचविण्याचे. सुरगाव (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी प्रवीण भाऊ देशमुख हे एक सेंद्रिय शेतकरी व कीर्तनकार आहेत. १९ एप्रिलला कचारी सावगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथे त्यांचे “आधी पोटोबा” या विषयावर कीर्तन ठेवण्यात आले. यात त्यांनी सेंद्रिय शेती व पाणलोट नियोजन या विषयावर गावकऱ्यांचे प्रबोधन केले. त्याचसोबत सेंद्रिय शेती विषयावर रवाळा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील सेंद्रिय शेतकरी व शाश्वत शेती चळवळीचे खंदे कार्यकर्ते वसंत फुटणे यांनी देखील गावकऱ्यांशी संवाद साधला. पाणलोट नियोजनाविषयी बोलायला यवतमाळला काम करणारे शंकर अमिलकंठवार देखील होते. प्रबोधनाच्या जोडीला या कार्यक्रमात देशी बियाण्यांचे प्रदर्शन देखील मांडले होते.
३.      पाणलोटाची कामे
            पाणलोटाची कामे म्हटली की आपल्या डोळ्यासमोर डोंगर, टेकड्यांवरील CCT, वनराई बंधारे अशी कामे येतात. परंतु सूक्ष्म पातळीवर म्हणजेच शेतकऱ्यांच्या शेतातील पाणलोट नियोजनाचा विशेष विचार होताना कोठे दिसत नाही. त्यात शेतीची दृष्टी असलेले व पाणलोटाचे तंत्रज्ञान जाणणारे तज्ञ तर आज अगदी बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत. यात अजून एक मोठी अडचण म्हणजे शेतकरी आपल्या शेतीचे वेडेवाकडे तुकडे पडण्यास राजी होत नाहीत. अशी परिस्थिती असताना गेल्या काही वर्षांच्या सततच्या कामाचे फलित म्हणून काही शेतकरी आपल्या शेताचे पाणलोट नियोजन व कंटूर आखणी करण्यास तयार झाले. एप्रिल ते जून पर्यंत वर्धा व नागपूर मधील एकूण सहा विविध गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर ही कामे करण्यात आली. यातून आखणी केलेली शेतेच पाणलोटाच्या कामाच्या प्रचाराचे माध्यम बनतील अशी अपेक्षा आहे. ही कामे करताना ज्या शेतकऱ्यांकडे ही कामे झाली त्यांना या बाबतचे प्रशिक्षण देखील देण्यात आले.
४.      सेंद्रिय शेती अभ्यास गट
            शेतकऱ्यांतील हा संवाद गाव पातळीवर, पंचक्रोशी स्तरावर पुन्हा सुरु करण्याच्या हेतूने विदर्भात सेंद्रिय शेती अभ्यास गट घेण्याची शृंखला चालू झाली आहे. यात चर्चा करण्यासोबत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सामूहिकपणे सर्वांनी निरीक्षणे करणे हा देखील भाग जोडण्यात आला आहे.
            सुरगावला हे काम चांगले रुप घेत आहे. येथे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या काही भागात सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतलाय. या शेतकऱ्यांच्या शेतांवर शिवार फेरी व त्यानंतर गावात महिला व पुरुषांची मिळून सामूहिक बैठक ३० एप्रिल रोजी घेण्यात आली. त्याचा पुढील टप्पा पेरण्या उरकल्यानंतर घेण्याचा बेत आहे. या सोबतच कार्यकर्त्यांच्या पातळीवरील नियमित बैठका होणे गरजेचे आहे. याची गरज आहे आपल्या क्षेत्रात व सामूहिकपणे कामाची दिशा काय असावी व पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी. अशा दोन बैठका झाल्या. एक गोपुरी, वर्धेला विदर्भ पातळीवरील कामांसंधर्भात व दुसरी अमरावतीला अमरावती पातळीवरील कामांसंधर्भात. यातून जे कृती कार्यक्रम निघाले, त्यांचा पाठपुरावा पुढे होत आहे.
५.      जी.एम. बियाणे व शुद्ध अन्नासंबंधी जनजागृती
जी.एम. (जनुकीय परिवर्तीत / Genetically Modified) पिके व अन्न यालाच धरून एकदरा (ता. वरुड, जि. अमरावती) व अमरावती येथे बैठका झाल्या.
ज्यांना यातील कोणत्याही कामाशी जोडून घ्यायचे आहे, त्यांनी संपर्क साधावा:
 गणेश बिराजदार, gsbirajdar516@gmail.com  
आणि तन्मय जोशी,  tanmay_sj@yahoo.com

No comments:

Post a Comment