'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 2 July 2015

नमस्कार मित्र मैत्रिणींनोगेल्या दोन महिन्यांत झालेल्या काही ठळक घडामोडींचा हा आढावा...
निर्माण ६.२ अ शिबीर संपन्न


            “Life is too short to regret ! निर्माण शिबिरात मकरंद सहस्त्रबुद्धे शिबिरार्थ्यांशी संवाद साधत होते. सामाजिक क्षेत्रात काम सुरू करताना अपयशाची भीती आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. ही भीती व इतर अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने शिबिरार्थ्यांना मदत करणे ही या शिबिराची प्रमुख थीम होती. आपला स्वधर्म (कर्तव्य) आणि आपला स्वभाव ठरवण्यासाठी चिंतन व नायनांसोबत प्रश्नोत्तरी झाली. सामाजिक क्षेत्रात काम करताना स्थळ, काळ, आर्थिक आधार, कामाचे मार्ग, त्यासाठी मिळवावी लागणारी कौशल्ये इ. बाबत विविध पर्याय अमृतने उलगडून दाखवले. सामाजिक समस्यांना सामोरे जाऊन त्या सोडवण्यासाठी काही उपयुक्त मूर्तिमंत उदाहरणे संजय पाटील, मकरंद सहस्त्रबुद्धे, आनंद बंग यांनी सादर केली. आर्थिक असुरक्षिततेबद्दलच्या भीतीला तोंड देण्यासाठी आपली आर्थिक गरज मोजून एका नेमक्या आकड्यावर येण्यासाठी exercise घेण्यात आला. पुरेशी आर्थिक सुबत्ता नसतानाही सर्चच्या आरोग्यदूत अंजनाबाई उईकेंचे आरोग्यसेवेचे काम व कोंदावाही गावाचे कार्यकर्ते देवाजी पदा (निर्माण १) यांचे ग्रामविकासाचे काम खूप प्रेरणा देऊन गेले. तसेच सामाजिक काम करायचे असेल तर जोडीदार कसा असावा याविषयी प्रश्नोत्तरी झाली. नुकतेच सामाजिक काम सुरू केलेले निर्माणचेच काही मित्र – आकाश भोर, निरंजन तोरडमल, विक्रम सहाने, मयूर सरोदे, अजय होले, प्रताप मारोडे शिबिरार्थ्यांसोबत आपले अनुभव शेअर करण्यासाठी उपलब्ध होते.
शिबिरार्थ्यांनी आपले पुढील ५ वर्षे, २ वर्षे व ६ महिन्यांच्या नियोजनाचे सादरीकरण केले. अनेक जणांनी पुढील दोन वर्षांत सामाजिक काम सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. शिबिराचा अनुभव निर्माण कार्यकारी गटासाठी खूप प्रेरणादायी होता
.
निरंजन तोरडमल पहिला ‘कर के देखो’ फेलो
उचललेल्या ओझ्याचा हमालांवर कमीत कमी भार पडावा यासाठी उपकरण बनवू पाहणाऱ्या निरंजनला पहिली ‘कर के देखो’ फेलोशिप मिळाली आहे. लहानपणापासूनच विज्ञानाचे प्रोजेक्ट करण्याचा छंद असणाऱ्या निरंजनने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. आपली तंत्रज्ञानाची कौशल्ये आयुष्यातले खरेखुरे प्रश्न सोडवण्यासाठी वापरण्याचे निरंजनने ठरवले. हमालांना ओझे उचलताना होणाऱ्या पाठदुखीच्या गंभीर त्रासाने त्याला अस्वस्थ केले. हमालांच्या पाठीवर / खांद्यावर कमीत कमी भार पडावा यादृष्टीने त्याने उपकरण विकसित करत असून सध्या तो या उपकरणाचा प्रोटोटाईप बनवत आहे. फेलोशिपच्या कालखंडात त्याचा हमालांसोबत उपकरणाची चाचणी, सुधारणा, मोठ्या प्रमाणात उपकरणाचे उत्पादन आणि मार्केटिंग इ. वर भर असेल.

निरंजन हे उपकरण नोव्हेंबर २०१४ पासून बनवत असून, फेलोशिपच्या निमित्ताने त्याला एक वर्ष आर्थिक आधार मिळणार आहे.

No comments:

Post a Comment