'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

दुष्काळाशी बालझुंज

मराठवाड्यातील आपल्या गावात दुष्काळाचा सामना करण्यासाठी अतुल गव्हाणे (निर्माण ६), त्याची मित्रमंडळी व शाळेतली मुले यांनी एक छोटं पाउल उचललं. त्यातून शिकायला तर मिळालंच, शिवाय आनंदही मिळाला. अतुलचा अनुभव त्याच्याच शब्दांत...
            जवळपास १२०० लोकवस्तीचं आमचं गाव. गावात पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ३ विहिरी आणि १ ट्यूबवेल आहेत पण त्यानांही पाणी जेमतेमच. तर खासगी विहिरींची संख्या २०० च्या वर आहे. तरी पण उन्हाळा लागला की टँकर सुरु. गावाला जणू काही टँकरची सवयच लागलेली. ह्या वर्षी मात्र संपूर्ण मराठ्वादाच दुष्काळात होरपळत असल्याने आमच्या गावाच्या वाट्याला टँकर मिळण्याची शक्यता कमी होती. उन्हाळ्याच्या सुरवातीला गावच्या एका हापस्याला पाणी होतं. जवळपास संपूर्ण गावाची तहानच तो हापसा भागवत होता. गावातील महिला हापस्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणून धुनी-भांडी करत. त्यामुळे पाणी जमिनीत न मुरता त्याच बाष्पीभवनचं जास्त होत असे. असच जर होत राहिलं तर हापश्याचे पाणी देखील काही दिवसात संपून जाईल असं आमच्या लक्षात आलं. आणि मग आम्ही दुष्काळाला प्रत्त्युत्तर म्हणून हे वाया जाणारं पाणी आम्ही जमिनीत मुरावायचं ठरवलं.हे जलपुनर्भरणाच काम श्रमदानातून करायच ठरलं. हपाश्याजवळ ७ फूट x ७ फूट x १० फूट खड्डा खोदला. कपडे धुण्यासाठी व्यवस्थित दगड मांडून जागा तयार केली. दुसऱ्या दिवशी कपडे धुण्यासाठी येणाऱ्या बायांना याच महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनाही ते पटलं. आता वाया जाणारे पाणी तिथेच मुरायला लागले. याचा फायदा असा झाला की संपूर्ण उन्हाळा भर आम्हाला हे पाणी पुरलं.
            
आपण शाळेत जे शिक्षण घेतो त्याचा प्रत्यक्ष वापर मात्र खूप कमी वेळा करतो. आम्ही शाळेतील मुलांना सोबत घेऊन केलेल्या कामाचे मोजमाप केले, आणि ह्या कामासाठी आपल्याला किती पैसे मिळाले असते हा हिशोब केला. आपण केलेल्या कामासाठी २०,००० रु. लागले असते हे कळल्यावर आपण हे काम केल्याचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून झळकत होता. हा हिशोब इथेच संपत नाही. आपण निसर्गाला जे काही देतो निसर्ग त्याच्या अनंतपटीने आपल्याला परत देत असतो. पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, श्रमदानाचं महत्त्व, सामाजिक बांधिलकी, शाळेतील संज्ञांचा दैनंदिन जीवनातील अर्थ अशा अनेक गोष्टीचं बीजारोपण बाल दोस्तांच्या मनात झाले आहे. आमच्या गावातील पाण्याचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटला नाही पण तो सोडवण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकलं गेलं एवढं मात्र नक्की.
स्त्रोत: अतुल गव्हाणे, atulsg4131@gmail.com

No comments:

Post a Comment