'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

आदिवासी गाव समजावून घेण्यासाठी ९ आठवडे

          निर्माण ४ चा मयूर सरोदे गेल्या वर्षापासून CTARA (Center for Technology Alternatives for Rural Areas), IIT मुंबई मध्ये M. Tech. चं शिक्षण घेत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून मयूरला ९ आठवड्यांसाठी एका गावात राहून अभ्यास करावा लागला. त्यासाठी तो आणि त्याचा मित्र संगीत शंकर, गडचिरोली मधल्या महावाडा या आदिवासी गावात गेले होते. मयूरचा गावामधील अनुभव आणि त्यातून झालेलं शिक्षण या बद्दलचा हा वृतांत त्याच्याच शब्दात.
            “महावाडा मध्ये रिसर्च म्हणून आम्ही सर्च च्या मदतीने दोन विषयांवर अभ्यास करायचं ठरवलं होतं. मलेरिया आणि वीज. सर्व्हे प्रमाणे गावात मलेरिया चं प्रमाण खूप जास्त होतं आणि फक्त ५० टक्के घरांमध्ये वीज कनेक्शन होतं. त्यामुळे हे दोन विषय ठरवले गेले. महावाड्या मध्ये मलेरिया चं प्रमाण जवळपास ७५ टक्के पेक्षा जास्त घरांमध्ये आहे. त्याप्रमाणे आरोग्य दुताकडून नक्की काय अडचण आहे ते समजून घेतले. तेव्हा आरोग्य शिक्षण हवं हे लक्षात आलं.
            विजेचा प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही पुरुष आणि स्त्रीयांच्या गटचर्चा घेतल्या गेल्या. त्यातून हे लक्षात आल कि दिवसातून ४ ५ वेळा पाणी विहिरीतून काढून वाहून न्यावे लागते हा मोठा प्रश्न आहे. सोलर पंप च्या साहाय्याने नळाद्वारे सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करता येते. तसा एक प्रोजेक्ट जवळच्याच परसवाडी गावामध्ये शासनातर्फे झाला आहे. तसा प्रोजेक्ट महावाड्याच्या लोकांना हवा आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकतो. शासनाचा हा प्रोजेक्ट गावाकडे कसा आणायचा याबद्दल मला आणि गावाला दोघांनाही मार्गदर्शनाची गरज आहे.
            मी स्वतः गावामध्ये सोलर बद्दल काहीतरी करावं या उद्देशाने तिथे गेलो होतो. पण महावाड्याने मला खूप काही शिकवलं. सोलर ही गावाची गरज तर नक्कीच आहे पण ती एक दुय्यम गरज आहे. तिथे खरी गरज आहे ती पैसे कमवण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची, Livelihood ची! “Nice to have” आणि “Must have” मधला तो एक फरक आहे. महावाड्यामधले Livelihood चे वेगवेगळे पर्याय बघत असतांना माझ्या असं लक्षात आलं की, गावकर्यांनी जाणून बुजून असे पर्याय निवडले आहेत की ज्यामध्ये गावातला प्रत्येक व्यक्ती हा काम करू शकतो उदा. शेती, रोजगार हमी, तेंदू पत्ता, लाकूडतोड, मोहाची फळ आणि फुलं वेचणे, इ. काही काही गावकर्यांकडे काही विशिष्ट गुण आहेत, पण ग्रामसभेने ठरवल्यामुळे तो माणूस त्यातून व्यवसाय करू शकत नव्हता. जर काही गोष्टी बनवून गावाबाहेर विकायच्या असल्या तर त्या ग्रामसभे मार्फतचं विकता येतील. म्हणजे स्वतःच्या आर्थिक विकासाबरोबरच गावाचाही आर्थिक विकास झाला पाहिजे असा त्यामागचा विचार आहे.
            गावाच्या आजूबाजूचे ५ ६ डोंगर हे महावाड्याच्या हद्दीमध्ये येतात. या डोंगरांवर बांबू बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. गावामध्ये काही जणांना बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची कला अवगत आहे. जर आदिवासी लोकांच्या या कलेचा वापर करून आणि बांबूच्या चांगल्या वस्तू बनवून मार्केट उपलब्ध करून देता आले तर या लोकांना एक चांगला अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध होईल. सध्या मी IIT मध्ये याच संकल्पनेवर M. Tech. प्रोजेक्ट घेवून मी काम करतो आहे. या प्रोजेक्ट मध्ये कुणाला रस असल्यास मला नक्की संपर्क करा.
स्रोत: मयूर सरोदे, mayursarode17@gmail.com

No comments:

Post a comment