'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 30 October 2015

‘शिक्षक मित्र’ विकास

विकास वाघमोडे हा मूळचा इस्लामपूरचा (जि. सांगली) इंजिनियर. शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना त्याने सर्च आणि निर्माण विषयी वाचलं. निर्माणच्या पहिल्या शिबिरानंतर 'झुंज दुष्काळाशी' या उपक्रमात तो सहभागी झाला. त्यात काम करत असताना त्याला ग्रामीण भागातले बरेच प्रश्न दिसले. तो खूप अस्वस्थ झाला. आणि याच अस्वस्थतेतून त्याला स्वतःच्या कामाचा एक मार्ग सापडला. शिक्षण विषयात काम केलं तर समाजातले इतर प्रश्न सोडवणं सुकर होईल. तेव्हा शिक्षणातून ग्रामीण विकास हे आपल्या कामाचं सूत्र असावं असं त्याने ठरवलं.
            मग विकासने निर्माणच्या काही मित्र मैत्रिणींसोबत चर्चा केली. त्यातच त्याला पालघर जिल्ह्यातील क्वेस्ट (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) या संस्थेविषयी माहिती मिळाली, तो तिथे गेला आणि रीड अलायन्स या प्रोजेक्टसाठी त्याची निवडही झाली. या प्रोजेक्टमध्ये विकास 'शिक्षक मित्र' म्हणून काम करतोय.
            आश्रम शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या भाषेची गुणवत्ता सुधारणं, त्यासाठी शाळेतील शिक्षकांना मदत करणं, प्रशिक्षण देणं असं त्याच्या कामाचं स्वरूप आहे. या कामाविषयी सांगताना विकास म्हणतो ''मला आधीपासून शिकवायला खूप आवडायचं, आता तेच काम करायला मिळतंय, मुलांसोबत काम करताना खूप मजा येते. माझं ऑफिस वाडा शहरात आहे. मला आदिवासी जीवनशैली जवळून अनुभवायची आहे म्हणून मी मुद्दाम गावात राहतो. त्यामुळे रोज बराच प्रवास करावा लागतो. इथलं वातावरण शहरापेक्षा खूप वेगळं आहे, ते नवीन असूनही मला कधी त्याचं ओझं वाटत नाही. जरी मी शाळेतल्या मुलांना शिकवायचं काम करत असलो तरी मलाच त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात"
            विकासला त्याच्या या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा!

स्त्रोतः विकास वाघमोडे, waghmodevikas@gmail.com

No comments:

Post a Comment